अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:24 AM2018-05-21T00:24:47+5:302018-05-21T00:24:47+5:30
धर्मापासून राजकारणापर्यंत नेता लागतो आपल्याला जय म्हणायला.
किशोर पाठक|
माणसं जास्तीत जास्त विरोधी वागताहेत म्हणजे एकीकडे ते कट्टर धर्म, जातीचे अभिमानी होत आहेत आणि दुसरीकडे देव, मंदिरं नाकारत आहेत. धर्म, देव, आस्तिकता, पूजा या सर्वच व्यवहारात गल्लत होतीय असं वाटतं. आता अधिक महिन्यात तर हे कट्टरत्व फार वाढत आहे. एका मित्राकडे नवी सून घरात आली. मुलीचा बाबा म्हणाला, अधिकात मुलीने नवऱ्याचं तोंड पाहू नये. निदान पहिले तीन दिवस. सगळे गप्प. म्हटलं घेऊन जा. आता मुलं-मुली लग्नाच्या आधीच खूप पोझेसचे फोटो घेतात. तसे ते एकमेकांचे असतात. मग आपण नक्की काय नाकारतो. हे विधी अध्यात्म्याच्या आड येतात. प्रत्येकाने धर्माचे स्वत:चे अधिष्ठान केले आहे. हा माझा मार्ग. पटला तर बघा. म्हणजे सगळे एकाच परमेश्वराकडे जातात. पण प्रत्येकाचा रस्ता वेगळा. मग माझाच मार्ग खरा हा एक प्रकारचा अहंगंड तयार होतो. मग तो वारकरी, दासपंथी, साधूपंथी, विरागी, योगी, स्वामी प्रत्येकाचा मार्ग वेगळा त्याची शिकवण वेगळी. मग ‘सर्वदेव नमस्कार: केशवं प्रति गच्छति’ हे जर खरे तर तो सगळ्यातच आहे. म्हणजे नास्तिक, देव न मानणाºयातही आहे. देहाचे विभ्रम दूर करून आत्मस्वरूपी लीन होणे म्हणजे अध्यात्म.
आता हा प्रत्येकाचा मार्ग वेगळा म्हणून रस्ता वेगळा, पंथ वेगळा. मग याचे अनुयायी वेगळे, त्याचे वेगळे. त्यांची भांडणे होणार. एखाद्या माणसाला फितवायचे असेल तर त्याची धार्मिक भावना जागवायला हवी, त्याला कट्टर जातीयवादी बनवायला हवं. म्हणजे तो राम, बुद्ध, येशूला मानत असेल तर इतर धर्मांबाबत त्याला द्वेषच वाटायला हवा. एकदा प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी मिळालं की तो निवांत. मग तो कशाला भांडेल. म्हणून त्याला कायम अभावात जगवायला पाहिजे. तुला काही तरी कमी आहे ही भावना त्याच्यात रुजवली आणि ती कमी अमूकमुळे आहे हे सांगितलं की तो युद्धाला तयार, खरा संत शांती, दया, क्षमाच सांगतो. भांडतात आणि भांडवतात अनुयायीच.
धर्मापासून राजकारणापर्यंत नेता लागतो आपल्याला जय म्हणायला. याबाबत आपण अंध आहोत. सत्यासाठी लढणारे, बलिदान देणारे वेगळे पण सत्तेसाठी कलह करणारे वेगळे. त्याचा अभाव कायम वाढवत राहिला तर तो कायम लढायला तयार. नेत्यांनी तो अभावच जगवला, वाढविला म्हणून भगतगण वाढले. अभाव नसतोच. तो निर्माण केला जातो. सांगा काय नाही आपल्याकडे सगळंच आहे. नीट बघा.