कायद्याच्या वेशीवर बेपर्वाईची लक्तरे

By admin | Published: February 13, 2015 12:09 AM2015-02-13T00:09:28+5:302015-02-13T00:09:28+5:30

वाळूच्या तस्करीत सोकावलेल्यांच्या पाठिंब्यावर गुंडगिरीचे दुकान मांडणाऱ्या पिन्या कापसे या अट्टल बदमाशाने भर सायंकाळी पोलीस नाईक दीपक कोलते

Lack of neutrality to law gate | कायद्याच्या वेशीवर बेपर्वाईची लक्तरे

कायद्याच्या वेशीवर बेपर्वाईची लक्तरे

Next

अनंत पाटील -

वाळूच्या तस्करीत सोकावलेल्यांच्या पाठिंब्यावर गुंडगिरीचे दुकान मांडणा-या पिन्या कापसे या अट्टल बदमाशाने भर सायंकाळी पोलीस नाईक दीपक कोलते यांची हत्त्या केली आणि नगर-मराठवाड्याच्या सीमेवरील गोदापात्र रक्ताने माखले गेले. यानंतरही पोलीस दल आणि सरकार अतिशय ढिम्मपणे पावले टाकत आहे. एकूणच सोकावलेल्यांची हिंमत वाढविणाऱ्या या प्रकाराने नगर जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे अद्याप वेशीलाच टांगलेली आहेत, याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली.
शेवगाव तालुक्यातील मुंगी परिसरातील वाळू तस्करी अन् अनुषंगिक गुन्हेगारी कारनाम्यांच्या नोंदीची डायरी एव्हाना ओसंडून वाहते आहे. अहमदनगर, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील हा भूभाग ‘बिहार’सदृश म्हणावा लागेल. त्यावर शासनाचे नियंत्रण नाहीच. पोलीस असो वा महसूल, या यंत्रणांवर वाळू तस्कर आणि त्यांच्या टोळीचे अप्रत्यक्ष वर्चस्व. काही तस्करांना राजकीय टिळा लागल्याने, त्यांच्यासाठी हा अधिकृत परवानाच! सामान्य जनतेला जीव मुठीत घेऊनच जगावे लागते. आवाज केलाच तर मुस्कटदाबी करण्यासाठी शासकीय यंत्रणाच सरसावतात. याची धास्ती सामान्य जनता तर घेणारच. त्यांना अद्याप आशेचा किरण गवसलेला नाही.
३ फेब्रुवारीला झालेल्या हत्त्याकांडानंतर पोलिसांना मुख्य संशयित पिन्या कापसे अद्याप सापडलेला नाही. पिन्या कापसे आणि भाजपातील संबंधही पुढे आले आहेत. त्याचे वडील भारत कापसे शेवगाव तालुक्यातील आंतरवाली बुद्रुक या गावाचे सरपंच आहेत. तेही भाजपाचे! त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी दाखविलेली ढिलाई संशयाच्या भोवऱ्यात आहे. एका दुय्यम संशयिताला पकडणे आणि शेवगावचा पोलीस निरीक्षक अजित लकडे यास तपासात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित करणे हीच काय ती तपासातील ‘कामगिरी’! यातील लकडेचे निलंबन हलगर्जीपणा केला म्हणून झाले, असा दावा पोलीस दलाकडून होत आहे. याच लकडेवर मयताच्या नातेवाइकांनी गुन्हेगारांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या आरोपांशीही हे निलंबन जोडून पाहिले जात आहे. तसे असेल तर गुन्हेगारांशी असलेल्या संबंधांचा त्यांनी अप्रत्यक्ष पुरावाच दिला, असे म्हटले पाहिजे. नगर-नाशिक जिल्ह्यातील गोदावरी-मुळा, तर खान्देशातील तापी, गिरणा, पांझरा नदीपात्रे वाळू तस्कर आणि त्यांच्या पैशातून फोफावलेल्या गुंडगिरीच्या उच्छादाने कायम तप्त असतात. निर्ढावलेल्या या टोळ्यांनी आजवर कायद्याचा खून पाडला, सामान्य जनतेला भीतीच्या खाईत लोटले. आता तर ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी त्यांचेच खून पडत आहेत. या खाईतून जनतेला बाहेर कोण काढणार?
राळेगणची लगबग
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांचे राळेगणसिद्धी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. म्हणजे मध्यंतरी त्यांच्याकडे चुकूनही न पाहणाऱ्या टीव्हीवाल्यांचे लाईट अन् कॅमेरे पुन्हा एकदा या परिसरात लकाकत आहेत. प्रसन्न चेहऱ्यानिशी अण्णांचे दर्शन पुन्हा एकवार देशाला होत आहे. त्यात पूर्वशिष्योत्तम अरविंद केजरीवालांनी दिल्लीत अटकेपार झेंडा रोवल्याने एक कळी अधिकची खुलली आहे. नऊ महिन्यांच्या नरेंद्र मोदी सरकारची लक्षणे ठीक नाहीत, हे अण्णांना आता उमगले आहे. त्यांना कधी काय उमगेल याचा काही नेम नसतो. म्हणजे कालपर्यंत मोदींना कारभार करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे, असे म्हणणाऱ्या अण्णांनी आता ‘मोदींनी जनतेला फसवले’ असे सांगत ‘पुन्हा चलो दिल्ली’चा नारा देऊन टाकला आहे. जनलोकपाल करत नाही, काळे धन भारतात आणले नाही, गरिबांऐवजी धनाढ्य उद्योजकांचे भले केले, असे अण्णांचे मोदींवरील आक्षेप. याच मुद्द्यांवर अण्णा दिल्लीत आंदोलन उभारणार आहेत. आंदोलनाची घोषणा होताच नव्या ‘टीम अण्णा’ची चर्चा सुरू झाली आहे. आपणही त्यात असावे, या अपेक्षेने हौश्या-नवश्यांनी सध्या राळेगणकडे धाव घेतली आहे.

Web Title: Lack of neutrality to law gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.