सरकारी ‘निजामी’ अन् अमृतमहोत्सवाची ‘हास्य जत्रा !’
By नंदकिशोर पाटील | Published: September 21, 2023 08:48 AM2023-09-21T08:48:17+5:302023-09-21T08:48:33+5:30
तेरा महिने उशिराने स्वातंत्र्य मिळालेल्या मराठवाड्याच्या वाट्याला मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवात काय आले? नियोजनशून्यता आणि सरकारी उपेक्षा!
सरकारी पातळीवर गांभीर्याचा अभाव आणि नियोजनशून्यता असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच साजरा झालेला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा अमृतमहोत्सव वर्षपूर्ती समारंभ! मराठवाडा प्रांत निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला असला तरी सरकारी पातळीवर निजामी मानसिकता अद्याप कायम असल्याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. वर्षभरापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. केंद्र सरकारच्या पुढाकाराने अमृतवर्षात देशभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले. मात्र, तेरा महिने उशिराने स्वातंत्र्य मिळालेल्या मराठवाड्याच्या वाट्याला उपेक्षाच आली. अमृतवर्षात ना कुठले कार्यक्रम झाले, ना समारंभ!
सांस्कृतिक खात्याने वर्षभरापूर्वी विविध उपक्रम साजरे करण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हानिहाय समित्या कागदावरच राहिल्या. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली लावणी आणि हास्य जत्रेच्या कार्यक्रमांवर दौलत जादा करण्यात आली ! कार्यक्रमांची आखणी करताना मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य राखले गेले नाही. प्रबोधनाचा विसर पडलेले सांस्कृतिक खाते केवळ मनोरंजनासाठी आहे की काय, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
मराठवाडा आर्थिकदृष्ट्या भलेही मागास असेल, मात्र सांस्कृतिकदृष्ट्या तितकाच संपन्न असा प्रदेश आहे. इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत गोदावरी खोऱ्यातील समृद्ध अशा मराठवाड्यात अनेक राजसत्तांचा उदय झाला. सातवाहन वंशाच्या काळात पैठण ही दक्षिणेतील संपन्न राज्याची राजधानी होती. सातवाहनांच्या कालखंडात या प्रदेशात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य आणि कलाक्षेत्रात खूप प्रगती झाल्याचे दाखले इतिहासात मिळतात. सातवाहन, चालुक्य आणि राष्ट्रकुटांच्या काळातील अजिंठा, वेरूळ व पितळखोरे येथील लेणी या वैभवाची साक्ष आहेत. यादवकाळात तर येथील साहित्य, संगीत, नाट्यकला भरभराटीस आली. मराठी भाषेचा जन्म याच प्रदेशात झाला. आद्यकवी मुकुंदराज, भास्करभट्ट बोरीकर, वामन पंडित, मध्वमुनी, जनी जनार्दन, कृष्णदास ही कवी मंडळी याच भूमीतील! संत ज्ञानेश्वर, नामदेव, विसोबा खेचर, जनाबाई, भानुदास, एकनाथ यांच्यापासून ते समर्थ रामदासांपर्यंत संतांच्या या मांदियाळीने या भूमीला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ केले. वारकरी, नाथ, महानुभव संप्रदायाचा पाया याच मराठवाड्यात रचला गेला. या प्रदेशात मराठी, हिंदी, कानडी, तेलुगू आणि उर्दू अशा पाच भाषा अवगत असलेले अनेक लोक आहेत. अशा या कलागुण संपन्न प्रदेशातील लोकांच्या अभिरुचीचा विसर कदाचित सांस्कृतिक खात्याला पडला असावा, अथवा चटावरील श्राद्ध उरकण्याची घाई झाली असावी!
मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम रक्तरंजित होता. हैदराबाद संस्थानात १९४८ पर्यंत आसफजाही घराण्यातील मीर उस्मान अली खानबहादूर निजामुद्दीन नामक सातव्या निजामाची राजसत्ता होती. या उस्मान अलीचा वकील कासिम रझवीने स्थापन केलेल्या रझाकारी सैन्याने या प्रदेशातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संस्थानातील बावीस हजार खेडी बेचिराख केली. या प्रदेशातील हुतात्म्यांच्या शौर्यगाथा अंगावर रोमांच आणतात. हा लढा केवळ मूठभर पांढरपेशा वर्गापुरता मर्यादित नव्हता. स्वामी रामानंदतीर्थांच्या नेतृत्त्वात अठरापगड जाती - जमातींचे असंख्य लोक यात सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग हे या लढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य. बदनापूरच्या दगडाबाई शेळके तर मराठवाड्याच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जात. या रणरागिणीने निजामी सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. या मुक्तिलढ्यातील असंख्य अनामविरांच्या शौर्यगाथा अद्याप अप्रकाशित आहेत. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा समग्र इतिहास प्रकाशित करून ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या, स्वातंत्र्य सेनानींच्या शौर्यकथा नव्या पिढीसमोर आणण्याची नामी संधी होती.
मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची, पुरातन मंदिरांची आणि भुईकोट किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. वैश्विक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी धड रस्ता नाही. दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक येतात. रस्त्यांची दुरवस्था पाहून त्यांचा हिरमोड होतो. पर्यटनाची राजधानी केवळ आता नावापुरतीच उरली आहे. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने पर्यटन, सांस्कृतिक, क्रीडा खात्याने थोडी कल्पकता दाखवून कार्यक्रमांची आखणी करायला हवी होती. मुक्तिसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर मांडता आला असता. परंतु, कल्पकतेचा अभाव असलेल्या सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याने कोट्यवधी रुपये खर्चून अमृतमहोत्सवाची ‘हास्य जत्रा’ करून टाकली!
सहा वर्षाच्या खंडानंतर मराठवाड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रांताचा अनुशेष भरून काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्याच योजनांवर नवी कल्हई केलेला ४५ हजार कोटींचा संकल्प जाहीर करून सरकारने पाठ थोपटून घेतली. या निमित्ताने का होईना, पण मंत्री, संत्री अन् जंत्रीचा मोठा लवाजमा घेऊन आलेल्या सरकारचे मुंबईबाहेर दोन दिवस छान पर्यटन झाले. हेही नसे थोडके!
नंदकिशोर पाटील, संपादक,
लोकमत, छ. संभाजीनगर
nandu.patil@lokmat.com