लका नागराज... वाड्यावर या!

By admin | Published: May 13, 2016 03:11 AM2016-05-13T03:11:49+5:302016-05-13T03:11:49+5:30

‘बाई जरा वाड्यावर या...’ निळू फुलेंच्या या संवादाची नक्कल बघितली, ऐकली की आपण खळखळून हसतो आणि आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो इरसाल

Laka Nagraj ... at the wad! | लका नागराज... वाड्यावर या!

लका नागराज... वाड्यावर या!

Next

‘बाई जरा वाड्यावर या...’ निळू फुलेंच्या या संवादाची नक्कल बघितली, ऐकली की आपण खळखळून हसतो आणि आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो इरसाल, रंगेल आणि आतल्या गाठीचा गाव पुढारी ! मराठी सिनेमातील हा खुनशी पुढारी गेल्या पाच-सहा दशकात पाटीलच असतो. अगदी सांगते ऐका, एक गाव बारा भानगडीपासून ते थेट नागराज मंजुळेच्या ‘सैराट’पर्यंत सिनेमातील पाटलाची ही परंपरा चालूच आहे. एका जमान्यात मराठी सिनेमा तमाशाशिवाय पूर्णच होत नसायचा. बदलत्या जमान्याने सिनेमातील तमाशाला मागे टाकले. पण गावाकडचा विषय म्हटला की, पडद्यावर पाटील असणारच ! सैराट झळकला, गाजला. सैराटच्या टीमला डोक्यावर घेतले. सोशल मीडियावर कौतुकाचे असंख्य सूर उमटले. त्या सुरांच्या गर्दीतही एक वेगळा सूर अनेकांचे लक्ष विचलित करून गेला आणि त्या सुराचा सवाल होता, ‘पाटीलच का?’ जुन्या जमान्यातील ‘सामना’मध्येही ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ याचा जाबही पाटलांनाच विचारला गेला. मराठी पडद्यावरील अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील.
एकूणच गावचा पाटील आणि मराठी सिनेपडद्याचे अतूट नाते आहे. तरीही सैराटच्या निमित्ताने सोशल मीडियावर जी चर्चा झाली, त्याची किमान नोंद तरी घ्यायला हवी. गावची पाटीलकी हा विषय सर्वांच्या परिचयाचा आहे. केवळ मराठा समाजच पाटील असतात असेही नाही. असंख्य गावांमध्ये धनगर, जैन, मुस्लीम आणि इतर जातीधर्मांचेही पाटील असल्याची उदाहरणे आहेत. ग्रामीण भागात गावगाडा सांभाळणाऱ्या व्यक्ती आणि त्याच्या सभोवतालचे वातावरण याचा वेध घेतल्याशिवाय त्या विषयाला न्याय कसा मिळणार? लेखक असो वा कलावंत त्याचे अनुभव विश्व अथवा कल्पना विश्व जसे असेल तसेच चित्र तो रेखाटणार. त्या चित्राला सामाजिक जबाबदारी आणि समाजहिताचा आधार देण्याचे कौशल्यही व्यक्तिपरत्वे बदलणार हेदेखील नैसर्गिकच आहे. त्याच कारणाने सैराटकडे कलाकृती म्हणूनच पहायला हवे. वास्तववाद हा नागराज मंजुळे याच्या आजवरच्या प्रत्येक कलाकृतीचा गाभा राहिलेला आहे. तो अबाधित राखून थेट न बोलताही समाजाला काहीतरी चांगले सांगण्याचा त्याने पिस्तुल्या, फॅन्ड्री आणि आताच्या सैराटच्या माध्यमातून प्रयत्न केला. कलाकाराला जात नसते आणि अभिजात कला ही विश्वव्यापी असते, हाच नियम नागराज मंजुळे याला लागू पडतो. राष्ट्रीय पातळीवरील त्याला मिळालेले अनेक पुरस्कार महाराष्ट्राची मान उंच करतात. प्रादेशिक सिनेविश्वात गुणवत्ता, कला, प्रायोगिकता आणि नव्या जमान्याचे व्यावसायिक भान राखल्यास आपण इतिहास घडवू शकतो हा संदेशच त्याने देशाला दिला आहे.
सर्वसामान्य माणसाला सोलापूर जिल्ह्यातील अनेक सौंदर्यस्थळे दाखविण्याचे काम सैराटने केले याचा आनंद आज जिल्ह्याला होत आहे. छायाचित्रकार सुधाकर रेड्डी यांनीही नागराजच्या मनात आणि दृष्टीत जे होते ते उजनी धरण परिसर, करमाळा-जेऊरमधील गल्लीबोळ, शेतं आणि करमाळ्याच्या कमलादेवी मंदिरात अचूक टिपले. सिनेमाच्या यशात अजय-अतुल यांचा जसा मोठा वाटा आहे तसाच रेड्डी आणि संकलक कुतुब इनामदार यांचादेखील मोठा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही. नागराजच्या कथेला संवादाच्या रूपाने त्याने स्वत: आणि भारत मंजुळे यांनी सोलापुरी अस्सल ग्रामीण बाजाच्या भाषेचा जो साज चढविला तोही सर्वांना भावला. आज ती रांगडी पण निर्मळ भाषा तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनत असल्याचा अनुभव येतो. या सर्व बलस्थानाचा विचार केला तर राज्यातील कुठल्याही जातीचा पाटील ‘बाई, वाड्यावर या...’ असे म्हणण्याऐवजी खास नागराजच्याच शैलीत म्हणेल, ‘काय लका नागराज... सैराटच्या टीमला घेऊन या की वाड्यावर...’ आणि तेही केवळ प्रेम, आपुलकी आणि पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठीच !
- राजा माने

Web Title: Laka Nagraj ... at the wad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.