ही तर फाळणीचीच भाषा
By admin | Published: October 18, 2015 11:32 PM2015-10-18T23:32:00+5:302015-10-18T23:32:00+5:30
मुसलमानांनी गोमांस खाणे थांबवावे अशी विनंती वा उपदेश त्यांना करायला कुणाची हरकत नाही. तसे करायला कायद्यानेही बंदी केली नाही. मात्र तसे करणार नसाल तर हा देश सोडून चालते व्हा
मुसलमानांनी गोमांस खाणे थांबवावे अशी विनंती वा उपदेश त्यांना करायला कुणाची हरकत नाही. तसे करायला कायद्यानेही बंदी केली नाही. मात्र तसे करणार नसाल तर हा देश सोडून चालते व्हा, असे म्हणणे नुसते समजण्याजोगेच नाही तर राष्ट्रविरोधी व अवैधही आहे. स्पष्टच सांगायचे तर ती फाळणीची भाषा आहे. १९४० मध्ये बॅरिस्टर जीना यांनी फाळणीसाठी ‘डायरेक्ट अॅक्शन’चा जो आदेश आपल्या अनुयायांना दिला त्याहून ही भाषा वेगळी नाही. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही भाषा वापरली आहे. हिंदू आणि मुसलमानच नव्हे, तर मुसलमान आणि ख्रिश्चन किंवा ज्यू आणि पारशी या धर्मांमध्येही परस्परांना मान्य न होणाऱ्या किंवा परस्परांच्या श्रद्धांना छेद देणाऱ्या अनेक गोष्टी व परंपरा आहेत. मात्र तेवढ्याखातर त्यातल्या एका वर्गाने दुसऱ्याला ‘चालते व्हा’ असे म्हणणे हे नुसते कालविसंगतच नाही तर समाजविरोधी व राष्ट्रविसंगतही आहे. जगातला कोणताही देश आता एकधर्मी वा एकपंथी राहिला नाही. एकवंशीय देश तर वर्तमानात शोधावे लागावे असेच आहेत. अमेरिका हे युरोप, आशिया, जपान, आफ्रिका व भारत अशा खंडांमधून व देशांमधून आलेल्या लोकांनी वसविलेले जगातले सर्वाधिक शक्तिशाली राष्ट्र आहे. परवा सिरियामधून जीव बचावून पळालेल्या अर्धा लाख मुसलमान निर्वासितांना प्रोटेस्टंट जर्मनीने आपल्या देशात सामावून घेतले. जगातले सगळेच देश, भारतासह असे धर्मबहुल, संस्कृतिबहुल व खाद्यसंस्कृतिबहुलही झाले आहेत. भारतातील १३० कोटी नागरिकांपैकी ३० टक्क्यांहून अधिक म्हणजे २६ कोटींएवढे लोक अल्पसंख्य आहेत. त्यांची संख्या अमेरिकी जनतेहून मोठी आहे. निम्म्या युरोपाहून, साऱ्या मध्य आशियाहून किंवा दक्षिणपूर्व आशियासह साऱ्या आॅस्ट्रेलियाहूनही मोठी आहे. वास्तव हे की भारतातील मुसलमानांची संख्याच पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. अशा संख्येला ‘चालते व्हा’ म्हणता येत नाही. त्याचे परिणाम आपण फाळणीच्या वेळी झालेल्या १० लाख लोकांच्या कत्तलीत पाहिले आहे. शिवाय ही माणसे गेली ६० वर्षे भारताच्या लोकशाहीसह इथल्या राजकारणात व समाजकारणात रुजलेली आहेत आणि सगळे हिंदू जसे कडवे, कर्मठ वा सनातनी नाहीत तसे देशातले सगळे मुसलमानही कडवे वा कर्मठ नाहीत. त्यांच्यातही सुधारणावादाच्या आणि सर्वधर्मसमभावाच्या परंपरा आहेत. खुद्द नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या मुसलमान मंत्र्यांची, लष्करात, हवाई दलात आणि आरमारात असलेल्या मुसलमान सैनिकांची व अधिकाऱ्यांची जाण अशावेळी बाळगणे गरजेचे आहे. कोणतीही सुधारणा वा बदल, मग तो कपड्यातला असो वा खाद्यसंस्कृतीतला, एका आज्ञेने घडवून आणता येत नाही. त्यासाठी दीर्घकाळचे परिश्रम व हृदयपरिवर्तन लागत असते. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, महाराष्ट्रानेही आपल्या तीन जिल्ह्यांत ती कायद्याने लागू केली आहे. तिचा खरा परिणाम एवढाच की त्या प्रदेशात दारूची अवैध विक्री वाढली आहे आणि त्या बेकायदा धंद्याने तेथील हजारो मुलांना एक नवा व किफायतशीर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या गंभीर संस्थाही अशा न पेलणाऱ्या सुधारणांबाबत वा बदलांबाबत आस्तेकदम चालताना आढळतात. अशावेळी स्वत:ला जनतेचे पुढारी म्हणविणाऱ्यांचे वर्तन कसे असावे? सुधींद्र कुळकर्णी यांच्यावर शाई ओतणाऱ्यांसारखे, गुलाम अलींचे कार्यक्रम मोडायला निघालेल्यांसारखे की दादरीतल्या अहमद इकलाखला दगडांनी ठेचून ठार मारणाऱ्यांसारखे? सरकारांनाही जेथे आपले कायदे अमलात आणता येत नाहीत तेथे अशा लहरी जाहीर करून खट्टरांसारखी सत्ताबाज माणसे काय साधत असतात? देशाच्या दुर्दैवाने त्यांच्यासारखी भाषा बोलणारी आणखीही काही माणसे आपल्यात आहेत. ‘रामजादे’ आणि ‘हरामजादे’ अशी जनतेची फाळणी करणारी निरांजना, ‘मोदींना मत न देणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे’ असे सांगणारा गिरिराज सिंह किंवा मुस्लीम भारतीयांचा उल्लेख ‘लांडे’ असा करणारी शिवसेना हे त्याचेच नमुने आहेत. सुदैव हे की ही माणसे साऱ्या हिंदूंचे वा देशाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. मोदींना मिळालेली मते ही या साऱ्यांनी व त्यांच्या पाठीशी असलेल्या संघासारख्या संघटनांनी त्यांना मिळवून दिली असे मानले तरी ती ३१ टक्क्यांच्या पुढे जात नाहीत हे ध्यानात घ्यावे लागते. ही माणसे देशातला सर्वधर्मसमभाव वाढवितात की त्याला मूठमाती देतात? सर्वसमावेशक लोकशाहीला बळ देतात की तिचे खच्चीकरण करतात? अशांंच्या बोलण्याने सुखावणाऱ्या झेंडेकऱ्यांचाही एक वर्ग असतो. लहान असला तरी तो दुर्लक्षिता येत नाही. जगातल्या सगळ्याच अतिकर्मठांएवढाच तो अल्पसंख्येत असतो. तालिबानीही स्वत:ला धर्मश्रद्ध म्हणवितात, अल कायदावालेही धर्मश्रद्धच असतात आणि इसिसवाल्यांचा तर धर्मावर एकाधिकारच असतो. मात्र त्यांचे प्राक्तन हे की त्यांना स्वधर्मीयांशीच लढावे लागत असते. मध्य आशियातली अंतर्गत लढाई ही कर्मठ विरुद्ध सौम्य धर्मनिष्ठांमधील आहे, हे या खट्टरांसारख्या माणसांनीही कधीतरी लक्षात घ्यायला हवे.