सर्वश्रेष्ठ जर्मनाला अखेरचा निरोप

By admin | Published: July 3, 2017 12:20 AM2017-07-03T00:20:21+5:302017-07-03T00:20:21+5:30

विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ जर्मन’ असा ज्यांचा गौरव झाला ते जर्मनीचे पूर्व चॅन्सेलर (पंतप्रधान) हेल्मुट कोल यांना मागल्या आठवड्यात जगाने साश्रू

Last reply to best jaman | सर्वश्रेष्ठ जर्मनाला अखेरचा निरोप

सर्वश्रेष्ठ जर्मनाला अखेरचा निरोप

Next

विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ जर्मन’ असा ज्यांचा गौरव झाला ते जर्मनीचे पूर्व चॅन्सेलर (पंतप्रधान) हेल्मुट कोल यांना मागल्या आठवड्यात जगाने साश्रू नयनांनी पण कमालीच्या देखण्या थाटात अखेरचा निरोप दिला. १९८२ ते ९८ अशी तब्बल १६ वर्षे जर्मनीचे नेतृत्व केलेल्या कोल यांनी पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकीकरण केले. बर्लिन शहराची झालेली विभागणी त्यातील भिंत पाडून संपविली आणि आजच्या युरोपीय कॉमन मार्केटची संस्थापना, फ्रान्सचे अध्यक्ष मितरॉँ यांच्या साहाय्याने केली. दोन शहरे, दोन देश आणि युरोपसारखा सबंध खंड एकत्र आणण्याचे आणि त्याला एका राष्ट्रीय व आर्थिक सूत्रात गोवण्याचे त्यांनी केलेले काम जेवढे अभूतपूर्व तेवढेच ते साऱ्या जगाच्या राजकारणाला एक कायमचे वळण देऊन गेले आहे. त्याचमुळे त्यांना अखेरचा निरोप द्यायला रशियाचे पुतीन, फ्रान्सचे मॅक्रॉन आणि अमेरिकेचे बिल क्लिंटन स्ट्रॉसबर्गला आले आणि युरोपला एक बाजारपेठ व एक चलन देण्याच्या त्यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव करून गेले. दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे बेचिराख झालेला व दोन तुकड्यांत विभागला गेलेला जर्मनी हा देश स्थिर करण्याचे काम प्रथम कोनरॉड अ‍ॅडेनॉर या चॅन्सेलरांनी कमालीच्या शिस्तबद्धपणे व राजकारणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून केले. त्यांच्यावर त्यासाठी कठोरपणाचा आरोपही अनेकांनी केला. मात्र त्याकडे लक्ष न देता ते त्यांच्या अपेक्षित साध्यावर लक्ष केंद्रीत करून १९४९ ते ६३ या त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत निष्ठेने काम करीत राहिले. १९६९ ते ७४ या काळात त्या पदावर आलेल्या विली ब्रँड यांनी दोन जर्मनींच्या एकीकरणासाठी जीवाचे रान केले. त्यांच्या त्या प्रयत्नांसाठीच त्यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. ब्रँड हे समाजवादी होते आणि हिटलरच्या कार्यकाळात त्याच्या तुरुंगात राहून त्यांनी नाझींनी केलेल्या छळाचा अनुभवही घेतला होता. साऱ्या जगाला त्यांनी दिलेला एक धडाही येथे नोंदवावा असा आहे. ‘माणसेच वेडी होतात असे नाही. कधीकधी सारा समाजही वेडा होतो. जर्मनीतील हिटलरचा काळ आमच्या सामूहिक वेडसरपणाचा होता’ असे सांगणाऱ्या ब्रँड यांनी साऱ्या जाणकारांनी समाजाच्या अशा घसरणीबाबत सावध राहिले पाहिजे असे म्हटले. त्यांच्या पश्चात त्या पदावर आलेले हेल्मुट श्मिड हे कुशल प्रशासक होते. एक अबोल राजकारणी अशी त्यांची ओळख होती. फारशी भाषणे नाहीत, मुलाखती वा वक्तव्य नाहीत आणि कोणत्या वादात सहभाग नाही. कार्यालय, काम आणि ते अशीच त्यांची ओळख होती. मात्र त्यांच्याच काळात जर्मनीने आर्थिक यशाची मोठी शिखरे गाठली व देशाला एक मोठी अर्थसत्ता म्हणून जगात उभे केले. राजकीय विचारसरणीहून विकास महत्त्वाचा आणि सत्तेपेक्षा सामान्य माणसांच्या जीवनाकडे लक्ष पुरविणे अधिक गरजेचे अशी मनोभूमिका असणारे जे थोडे नेते विसाव्या शतकाने पाहिले त्यात या श्मिड यांचा नंबर फार वर लागणारा आहे. १९८२ मध्ये त्यांच्या हातून सत्तासूत्रे स्वीकारलेल्या हेल्मुट कोल यांनी राजकारणाएवढाच जर्मनीचा चेहरामोहरा बदलला. युरोपच्या स्वरूपात बदल करण्याचेही काम त्यांच्या हातून झाले. त्या काळात स्वतंत्र झालेल्या बोस्निया, हर्जेगोनिया यासारख्या युरोपातील लहान देशांना त्यांनी प्रथम मान्यता दिली. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात दोन महायुद्धे झाली. कोल यांनी त्यांच्यातील परंपरागत वैर संपविले आणि त्यांच्या व्यापारउदिमासह नवे व चांगले संबंध प्रस्थापित केले. वैरावर मैत्रीने मात करण्याची त्यांची क्षमता तेव्हा साऱ्या जगाचे डोळे दीपवून गेली. कोल यांनी इंग्लंडशीही व्यापार आणि मैत्रीचे संबंध वाढविले. जर्मनी हा एकेकाळी ज्यू धर्माच्या लोकांचा छळ करणारा देश म्हणून जगात बदनाम होता. ज्यूंना रस्त्यावर जाऊन मारण्याचे पोग्रोम्सच त्या देशात एकेकाळी व्हायचे. हिटलरने ६० लक्ष ज्यूंना जिवंत जाळले आणि मारले. परिणामी साऱ्या जगात जर्मनीची एक खुनी देश अशी प्रतिमा तयार झाली. कोल यांनी ती प्रतिमा स्वच्छ केली आणि आज जर्मनी हा जगभरच्या निर्वासितांना आश्रय देणारा पालक देश अशी त्याची प्रतिमा तयार झाली आहे. ती तयार करण्यात कोल यांच्यासोबतच आताच्या जर्मनीच्या चॅन्सेलर अ‍ॅन्जेला मेर्केल यांचा वाटा फार मोठा आहे. कोल यांनी ज्यूंना अभय दिले आणि इस्रायल या त्यांच्या देशालाही भरघोस अर्थसाहाय्य केले. वृत्तीने कर्मठ ख्रिश्चन असलेल्या या नेत्याचे ज्यूंविषयीचे हे औदार्य जगभरच्या ज्यूवि२ोधी ख्रिश्चनांसमोरही एक आदर्श उभा करून गेले. पूर्व जर्मनी हा एकेकाळी रशियन साम्राज्यात राहिलेला प्रदेश. तो जर्मनीत सामील करून घेतल्यानंतरही कोल यांनी रशियाशी चांगले संबंध राखले. आताच्या जर्मनीच्या चॅन्सेलर अ‍ॅन्जेला मेर्केल या त्यांच्याच अनुयायी आहेत आणि कोल यांच्या सगळ््या स्मृती जतन करण्याची त्यांची इच्छा आहे. युरोपीयन कॉमन मार्केटमधून इंग्लंडने बाहेर पडणे हा त्यांना त्याचमुळे बसलेला जबर धक्का आहे. उरलेला युरोप एकत्र राखण्यासाठी त्यांनी आता प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. कोल यांना अखेरचा निरोप देण्याचा समारंभ त्यांनी स्ट्रॉसबर्ग या युरोपीयन कॉमन मार्केटच्या मुख्यालयी केला त्याचेही कारण हेच होते. कोलसारखी माणसे जगाला दिलासा देतात. युद्धखोर पुढाऱ्यांपेक्षा त्यांचाच प्रभाव जगावर अधिक राहतो.

Web Title: Last reply to best jaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.