लताबाई गेल्या, म्हणजे आपल्या आयुष्यातले नेमके काय हरवले?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 10:02 AM2022-02-07T10:02:04+5:302022-02-07T10:03:22+5:30
आपल्या गुणवत्तेने आणि वर्तनाने आपला मूक धाक निर्माण करणारी माणसे संस्कृतीचा तोल सांभाळण्यासाठी फार आवश्यक असतात! अशा माणसांना निरोप देण्याची वेळ येते, तेव्हा मग खूप असहाय आणि निराश वाटू लागते... जसे आत्ता लताबाईंना निरोप देताना वाटते आहे...!
वंदना अत्रे, शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
देशातील माणसांना त्यांची जात, धर्म, भाषेचा अभिनिवेश, प्रांताच्या सीमारेषा अशा कित्येक गोष्टी विसरायला लावून आपल्या मधुर स्वराच्या सूत्रात एकत्र गुंफणारी ती गायिका होती. लता मंगेशकर नावाची. सीमेवरचा एकाकी जवान जेव्हा रात्रीच्या अंधारात तिच्या स्वरांची सोबत घेत असायचा तेव्हा डोंगराच्या आडोशाने झापाखाली राहणारी एखादी आई वीतभर चिरगुटावर झोपत असलेल्या आपल्या बाळाला तिनेच गायलेली एखादी अंगाई आपल्या आवाजात ऐकवत असायची. पानाच्या ठेल्यावरचा दिवस तिच्याच गाण्याने सुरु व्हायचा आणि गणपतीच्या दहा दिवसांमध्ये तिने गायलेली गणेश गीते ऐकल्याशिवाय बाप्पालासुद्धा झोप यायची नाही. खरे म्हणजे आपल्या अवतीभवती नेहमी असणारा हा सूर एका मर्त्य व्यक्तीचा आहे, असा विचार कदाचित त्या सुरासह जन्माला आलेल्या, वाढलेल्या माझ्यासारख्या पिढ्यांच्या मनातसुद्धा आला नसावा इतका तो चहू अंगांनी आयुष्याशी जोडलेला होता.
वाहत्या पाण्याची झुळझुळ, पावसाचा आवाज, पक्ष्यांची किलबिल, झाडांची सळसळ, रात्रीच्या निवांत अंधारात ऐकू येणारा अनाहत नाद तसाच हाही निसर्गाचाच स्वर असावा, याची खात्री वाटावी इतकी या स्वरांची सोबत होती. संगीतावर जीव जडलेल्या माणसांचे तो वारंवार लक्ष वेधून घ्यायचा. संगीत अजिबात न जाणणाऱ्या लोकांना त्या स्वरांविना निराधार, सुनेसुने वाटायचे.
वाढत्या वयाबरोबर या स्वराच्या मालकिणीची ओळख होऊ लागली. मग समजू लागला लहान वयात सुरु झालेला त्यांचा संघर्ष, कच्च्या कोवळ्या खांद्यांवर पडलेली घर चालविण्याची जबाबदारी, वडिलांकडून लाभलेली संगीताकडे बघण्याची दृष्टी आणि समज, त्यांनी गळ्यावर पक्क्या चढवलेल्या काही बंदिशी हे सगळे कितीदातरी निमित्ता-निमित्ताने कानावर पडत गेले.
याच ओघात या संघर्षातील एका ओझरत्या उल्लेखाने लक्ष वेधून घेतले. तो होता आजी येसूबाई हिचा. दीनानाथांना संगीताचा वारसा मिळाला तो अव्वल गायिका आणि संगीताची उपजत खोलवर समज असलेली त्यांची आई येसूबाई यांच्याकडून. अतिशय निकोप, चढा आणि तजेलदार सूर, पक्की स्वरस्थाने आणि भिंगरीसारखी सहज फिरणारी तान ही आईकडे असलेली गुणवत्ता घेऊनच जन्माला आले होते ते. पण गोव्यामधील मंदिरात देवापुढे सेवा देणाऱ्या प्रत्येकच स्त्रीकडे समाजाने कायम अवहेलनेच्या आणि हेटाळणीच्या नजरेनेच बघितले आणि येसूबाईची गुणवत्ता मंगेशीच्या गाभाऱ्यापुरती मर्यादित राहिली. एका गुणी स्त्रीला समाजाकडून मिळालेल्या या वागणुकीचे, अवहेलनेचे आणि त्यामुळे तिला मनोमन झालेल्या दुःखाचे काही धूसर तपशील लहान लताच्या नक्कीच कानावर आले असतील. त्याबद्दलची अस्पष्ट वेदना कुठेतरी लताबाईंच्या मनात खोलवर असेल? त्यातूनच त्यांच्या स्वरांना धार, वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्याच्या प्रयोगांना भिडण्याची जिद्द निर्माण झाली असेल का? पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पुरुषांना हेवा वाटावा, असे निर्विवाद स्थान मिळविण्याच्या एका मोठ्या पल्ल्याच्या प्रवासाची बीजे या जाणिवेत असतील का? - असे कितीतरी प्रश्न यानंतर मग पडत गेले.
निव्वळ वारशाने मिळालेल्या गुणवत्तेच्या भरवशावर फार दूरवरचा प्रवास करता येत नाही, हे लताबाईंना वयाच्या कोणत्या टप्प्यावर उमगले, याचा उल्लेख फारसा वाचायला मिळत नाही. पण संगीतासारख्या अतिशय बेभरवशाच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी अंगभूत गुणवत्तेला सततच्या मेहनतीची जोड देणे फार गरजेचे असते, हे जाणण्याची हुशारी आणि दूरदर्शीपणा नक्कीच त्यांच्यात होता. कदाचित परिस्थितीनेही त्यांना तो धडा दिला असावा. शिवाय लताबाईंच्या रूपाने शास्त्रीय संगीताची समज आणि शिक्षण घेतलेली एक गायिका प्रथमच संगीतकारांना त्यांच्या मनात असलेले प्रयोग करण्यासाठी मिळाली. मग मदन मोहन, अनिल विश्वास, नौशाद, रोशन, सचिनदेव बर्मन, वसंत देसाई, सी. रामचंद्र अशा तत्कालीन संगीतकारांना शास्त्रीय संगीतातील अनेक बंदिशी, ठुमरी, अनवट राग रागिण्या, कर्नाटक संगीतातील अप्रचलित राग हे खुणावू लागले. लताबाई पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वीची चित्रपट गीते आणि त्यांची कारकीर्द सुरु झाल्यानंतरची गाणी यामध्ये कोण्याही जाणत्या रसिकाला फरक दिसतो तो त्यामुळेच. ती ऐकताना प्रश्न पडतो : तीन किंवा पाच मिनिटांच्या एखाद्या चित्रपट गीतात रागमाला किंवा तराणा म्हणण्याचे आव्हान सुखरूप पेलण्यासाठी कशी तयारी करत असतील लताबाई?
‘हमदर्द’ चित्रपटात महमद रफी यांच्या साथीने गायलेली ‘ऋतू आये’ ही रागमाला गाणाऱ्या लताबाईंचे वय अवघे अठरा वर्ष होते, असे काही तपशील ऐकले की, रियाझाशिवाय हे साध्य नाही याबाबत नक्कीच खात्री पटते. अम्मान अली खां यांच्याकडे काही काळ कसून केलेल्या शिक्षणाचे आणि तालमीचे स्पष्ट प्रतिबिंब त्यात दिसते. पण लताबाईंनी ज्या तयारीने आणि आत्मविश्वासाने ही शास्त्रीय बैठकीची गाणी गायली आहेत, त्यातून जाणवणारी एक गोष्ट म्हणजे, शास्त्रीय संगीत हा त्यांच्या चिंतनाचा विषय असणारच ! रेकॉर्डिंग नसेल तेव्हा त्यांच्या घरात बडे गुलाम अली खां, निसार हुसेन खां, रोशन अरा बेगम यांच्या रेकॉर्डस् वाजत असायच्या. बडे गुलाम अली खां यांनी त्यांच्यावर मुलीसारखे प्रेम केलेच पण १९५६ साली कोलकात्यात (तेव्हा कलकत्ता) झालेल्या संगीत संमेलनात त्यांच्यासमवेत लताबाईंनी सहगायन केल्याची आणि रसिकांनी त्याला कडाडून टाळी दिल्याची नोंद आहे. या घटना लताबाईंच्या फारशा चर्चेत न आलेल्या मेहनतीच्या पैलूवर प्रकाश टाकतात...!
- आणि मग, शास्त्रीय संगीत आणि सिनेसंगीत यांच्या सीमारेषा पुसून टाकणारी त्यांची कितीतरी मधूर, कधीही न कोमेजणारी गीते आठवू लागतात. कानाला त्यातील स्वरांच्या सूक्ष्म जागा, दोन शब्दांच्या दरम्यानचा अवकाश भरून काढणारा सूर आणि त्या स्वरांवर असलेली त्यांची घट्ट पकड जाणवू लागते. पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या बुजूर्ग गायकासोबत ‘राम श्याम गुण गान’ अल्बम गाण्यासाठी उभे राहण्याचे बळ त्यांना कुठून मिळाले, त्याचे उत्तर मिळते.
लताबाई पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आल्या तेव्हा या क्षेत्रावर राज्य करीत असलेल्या आणि त्यांच्या स्पर्धक मानल्या गेलेल्या गायिकांचे अनुकरण करण्याचा मोह त्यांना नक्की झालाच होता; पण शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाने आपल्याला बहाल केलेले एक दुर्मीळ वेगळेपण त्यांना लवकरच जाणवत गेले आणि मग त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. बघितले असेलच तर त्या काळाकडे, जेव्हा त्यांच्या कानावर वडिलांनी गायलेल्या पहाडी आणि जयजयवंती, बहादुरी तोडी आणि बसंतच्या दुर्मीळ बंदिशी पडत होत्या!
लताबाई ज्या काळात आपली कर्तबगारी सिद्ध करीत होत्या त्यातील पहिली अनेक वर्षे समाजात स्त्रिया दुय्यम वागणूक सोसत मन मारून जगत होत्या. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या लताबाईंनी मात्र कधीच या स्त्रीवादाचा किंवा समानतेचा उल्लेख केलेला सापडत नाही; पण स्त्रियांना संधी मिळाल्यावर त्यांनी आपल्या स्त्रीत्वाचा बाऊ न करता त्या संधीचे सोने कसे करायचे हे मात्र आपल्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. तो धडा फार, फार महत्त्वाचा आहे.
आता लताबाई नाहीत; पण त्यांनी गायलेली हजारो गाणी आपल्यासोबत आहेत. वाढत्या वयाबरोबर माणसाची सर्जनशीलता कदाचित क्षीण होत असेलही; पण त्यापेक्षा क्षीण होते ते शरीर! निधनापूर्वी काही महिने आधी पंडित बिरजू महाराज यांची भेट झाली तेव्हा त्यांच्याभोवती मोठ्या कागदावर अनेक स्केचेस पडलेली दिसत होती. महाराजजी सांगत होते, रात्री झोप येत नाही तेव्हा नृत्याचे कितीतरी नवे विचार, मुद्रा, हस्तक सुचत असतात, पण शरीर साथ देत नाही म्हणून मी ते चित्रांमधून मांडत असतो! लताबाईंना अखेरीस अशा कुठल्या स्वराकृती साद घालत असतील आणि गळा साथ देत नाही म्हणून त्या बेचैन होत असतील?
‘वय झाले माझे, कधीतरी निरोप घ्यावाच लागणार..’ असे एका मुलाखतीत आशा भोसले म्हणत असल्याचे अगदी आत्ता-आत्ता ऐकले. त्यांच्या तोंडून अशी निरवानिरवीची वाक्ये ऐकताना एकदम चरचरून चटका बसावा तशी माणसाच्या मर्त्य असण्याची जाणीव झाली... का बसला असा चटका, असा प्रश्न स्वतःलाच विचारला आणि हसू आले. आयुष्यातील सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणाला नेहमी जे अगदी सहज नकळत बरोबर असते त्याची साथ सुटते तेव्हा दुःख होणारच ना! करोडो सर्वसामान्य माणसांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी वेळोवेळी जिच्या गाण्याची उधार उसनवारी केली त्या गाण्यांची मालकीण अशी कधीही न परतण्याच्या प्रवासाला निघून गेल्यावर अनाथ आणि पोरकेपणाची भावना दाटून येणारच!
एखादा माणूस जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याच्याबरोबर काय-काय जात असते, त्या व्यक्तीचा आपल्या आसपासचा जिवंत वावर तर जातोच; पण त्याच्या आणि आपल्या एकत्र जगण्यातून विणल्या जात असलेल्या नात्याच्या रंगीबेरंगी गोफाचे धागे सैरभैर होतात, विखरून जातात. लता मंगेशकर यांच्यासारखी माणसे जेव्हा निघून जातात तेव्हा मात्र त्यांच्याबरोबर अनेक वैविध्यपूर्ण आठवणी आणि इतरांना शहाणे करू शकेल असे त्यांच्या विषयातील अनुभव संचित जात असते, आणि संस्कृतीचे एक अंग दुबळे होते!
आपल्या गुणवत्तेने आणि वर्तनाने आपला मूक धाक निर्माण करणारी काही माणसे समाजात असतात, असावी लागतात. संस्कृतीचा तोल सांभाळण्यासाठी फार आवश्यक असतात ती. अशा माणसांना निरोप देण्याची वेळ येते तेव्हा मग खूप असहाय आणि निराश वाटू लागते... जसे आत्ता लताबाईंना निरोप देताना वाटते आहे!
vratre@gmail.com