‘देवाची करणी’?

By admin | Published: April 2, 2016 03:52 AM2016-04-02T03:52:31+5:302016-04-02T03:52:31+5:30

धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील

'The law of God'? | ‘देवाची करणी’?

‘देवाची करणी’?

Next

धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील भागात अपूर्णावस्थेत असलेला एक उड्डाण पूल गुरुवारी भर माध्यान्ही कोसळला आणि त्यात जबर मनुष्य तसेच वित्त हानी झाली. अत्यंत गजबजलेल्या भागात या पुलाचे काम सुरु असल्याने पुलाच्या कोसळलेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली काही बसगाड्या, मोटारी आणि मालमोटारी दबल्या गेल्या व काही लोक अक्षरश: चिरडले जाऊन अनेकजण जखमी झाले. परिणामी दोन्ही प्रकारच्या हानीचा निश्चित अंदाज लगेचच येऊ शकलेला नाही. २००९साली सुरु झालेले या पुलाचे बांधकाम सात वर्षे झाली तरी अजून अपूर्णच असावे हे त्या राज्यातील आधीच्या डाव्या आघाडीच्या आणि नंतर सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या कार्यक्षमतेचे द्योतकच मानले पाहिजे. आंध्र प्रदेशातील कोणा बांधकाम कंपनीला या पुलाचे काम देण्यात आले होते. साहजिकच अर्धवट अवस्थेतील पूल कोसळणे ही प्राय: त्याच कंपनीची जबाबदारी असताना तिने तत्काळ आपली जबाबदारी झटकून टाकताना जे काही घडले ते ‘अ‍ॅक्ट आॅफ गॉड’ म्हणजे देवाची करणी असल्याचे निर्लज्जपणे सांगून टाकले. ‘ओ माय गॉड’ या सिनेमामधून संबंधित ठेकेदार इतके बरीक शिकून गेला! पण केवळ या ठेकेदाराला एकट्याला तरी दोष का द्यायचा? या दुर्घटनेवरुन लगेच जी राजकीय सुंदोपसुंदी सुरु झाली ती तरी कोणती संवदनशीलतेचा प्रत्यय आणून देणारी आहे? ममतांच्या कारकिर्दीत पूल कोसळल्यामुळे डाव्या आघाडीने ममता सरकारच्या विरोधात तोफा डागल्या आणि लगेचच पुलाचे काम डाव्या आघाडीच्या सत्ताकाळात मंजूर केले गेले म्हणून तेच जबाबदार असा प्रत्त्यारोप ममतांनी केला. याबाबत त्यांनी केलेले प्रतिपादन तर मोठे औरच म्हणावे लागेल. संबंधित ठेकेदाराला सरकारने वारंवार स्मरणपत्रे देऊनदेखील त्याने शेवटपर्यंत पुलाचा आराखडा सादर केला नाही. सरकारला आणि विशेषत: ममतांनाही जो जुमानायला तयार नाही त्याला इतके दिवस त्यांनी जे सहन केले त्याची किंमत अकारण काही निष्पापांना मात्र चुकवावी लागली.

Web Title: 'The law of God'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.