हे तर विनाशाचे नेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:43 AM2017-12-13T01:43:23+5:302017-12-13T01:43:33+5:30
नरेंद्र मोदी चेकाळले आहेत. औरंगजेबाच्या फौजांना पाण्यातही संताजी आणि धनाजी दिसावे तसे त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी राहुल, मनमोहनसिंग, सोनिया आणि काँग्रेस दिसू लागली आहे. ‘गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत आहे आणि तो करण्याविषयी त्याच्या लष्करी अधिका-यांची काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या या बैठकीला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हजर होते’ असा बिनबुडाचा आरोप मोदींनी केला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर अहमद पटेल यांना आणावे असे त्यावेळी पाकिस्तानने सुचविल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. मनमोहनसिंग या स्वच्छ व धवल प्रतिमेच्या नेत्यावर असा आरोप करणे हीच देशाचा संताप वाढविणारी बाब आहे. मनमोहनसिंग हे केवळ जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञच नाहीत, देशातील सर्व जातीधर्मांच्या व वर्गांच्या लोकांना कमालीचे आदरणीय वाटणारे नेते आहेत. हा नेता गुजरात या राज्यातील निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी पाकिस्तानची मदत घेईल व त्यासाठी तो मणिशंकर यांच्या घरी जाईल हा आरोप नुसता हास्यास्पदच नाही तर मोदींच्या अकलेची कीव करावी असा आहे. तशीही त्यांची जीभ सैल असून संयम सुटला आहे. ज्या बैठकीत हे झाल्याचे मोदी म्हणतात तिला देशाचे सेनाप्रमुख दीपक कपूर, माजी उच्चायुक्त राघवन, परराष्टÑ मंत्री नटवरसिंग यांच्यासह परराष्टÑ विभागाचे अनेक अधिकारीही उपस्थितीत होते. देशाचे नेतृत्व करणाºया व्यक्तीला शत्रूशी बोलणी करावी लागतच असतात. (मोदीही शरीफ यांच्या घरच्या लग्नात वºहाडी म्हणून सामील होतेच) देशाचे संरक्षण व परराष्टÑ व्यवहार या संदर्भात उभय देशांच्या नेत्यांना परस्परांशी बोलावेच लागते. मात्र मनमोहनसिंगांच्या उंचीचा नेता अशावेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची गोष्ट काढून त्यात पाकिस्तानची साथ मागेल असे म्हणणे हा शुद्ध वेडाचाराचा पुरावा आहे. मनमोहनसिंग हे कधीही न संतापणारे पुढारी आहेत. मात्र या आरोपाने त्यांच्याही अंगाचा तीळपापड झाला आहे. त्यांनी मोदींना फार धुवून टाकून त्यांचे पुरते वस्त्रहरण केले आहे. मोदींसारखी माणसे देशाच्या पंतप्रधानपदावर येतात हाच मुळी देशाचा अपमान आहे असे ते म्हणाले आहेत. वास्तव हे की मोदींजवळ सांगण्यासारखे काही उरले नाही. गेली २२ वर्षे गुजरातच्या जनतेला तेच ते ऐकविल्याने तेथील जनताही त्यांच्या भाषणांना कंटाळली आहे. त्यांनी सांगितलेला विकास लोकांना दिसत नाही आणि धर्म व प्रभू रामचंद्र यांच्या कथा मोदींनी व त्यांच्या संघ परिवाराने नुसत्या पांचटच नव्हे तर कंटाळवाण्या बनविल्या आहेत. या स्थितीत कोणतीही खोटीनाटी वक्तव्ये करणे व काँग्रेसला बदनाम करणे एवढेच त्यांच्या हाती उरले आहे. त्यांना हार्दिकला नावे ठेवता येत नाही. जिग्नेशविषयी ते बोलत नाहीत आणि इतरांचीही नावे ते घेत नाही. राहुल त्यांना पुरून उरले आहेत आणि सोनियाजींवर आरोप केला तर तो आपल्यावरच उलटेल याची मोदींना भीती आहे. मनमोहनसिंगांची प्रतिमा एका सभ्य, सोज्वळ मितभाषी व संयमी नेत्याची आहे. त्यामुळेच मोदींना मनमोहनसिंगांना आपले लक्ष्य बनवावेसे वाटले असणार. पण मनमोहनसिंग हे एकटेच नव्हे तर देशातील सामान्य माणसेही त्यांच्या या अक्षम्य आरोपामुळे जशी संतापलेली दिसली ते पाहता लोकांनीच मोदींच्या वेडाचारावर शिक्कामोर्तब केल्याचे वाटू लागले आहे. लोकशाही हे सभ्यपणाचे व विवेकाचे राजकारण आहे. मात्र मोदींसारखी माणसे ते कलंकित करण्याचा चंग बांधायला निघाली असतील तर त्याची संभावना देशाचे नेते म्हणून न करता विनाशाचे नेते म्हणूनच केली पाहिजे. सोनिया गांधी, राहुल गांधी व डॉ. मनमोहनसिंग यासारख्या नेत्यांवर कोणताही आरोप लावता येत नाही आणि लावला तरी तो त्यांना चिकटत नाही. असे आरोप करणारी माणसेच मग लोकांना वाचाळ वाटू लागतात.