पुढाऱ्यांनो, जरा लवचिक व्हा..
By admin | Published: December 29, 2016 03:41 AM2016-12-29T03:41:24+5:302016-12-29T03:41:24+5:30
देशात विरोधी पक्षनेत्यांची वानवा नाही. प्रत्येक राज्यागणिक, भाषेगणिक आणि जातीगणिक असणाऱ्या त्या थोरांची संख्या मोठी आहे. दुर्दैव हे की त्यांच्यातील अनेकांना जाती
देशात विरोधी पक्षनेत्यांची वानवा नाही. प्रत्येक राज्यागणिक, भाषेगणिक आणि जातीगणिक असणाऱ्या त्या थोरांची संख्या मोठी आहे. दुर्दैव हे की त्यांच्यातील अनेकांना जाती, पंथ, धर्म वा राज्य आणि भाषेच्या मर्यादा ओलांडता येत नाहीत. ती कुंपणे अडवीत असल्याने त्यांना राष्ट्रीय होता येत नाही. शरद पवार एवढी वर्षे देशाच्या राजकारणात राहूनही ‘मराठा पुढारी’च राहिले आणि लालूंना बिहारबाहेर जाता आले नाही. शिवसेना मुंबईची आणि मनसे त्यातल्या काही प्रभागांचे प्रतिनिधित्व करणारी. मायावतींना उत्तर प्रदेशाबाहेर स्थान नाही आणि ममताही बंगालीच राहिल्या आहेत. दक्षिणेतले करुणानिधी वा जयललिताही आजतागायत दाक्षिणात्य म्हणूनच ओळखल्या गेल्या. आपल्या अशा मर्यादांची चांगली जाण असतानाही या नेत्यांना भाजपा विरोधी एकजूट करता न येणे वा तसे प्रयत्न कुणी करीत असल्यास त्याला साथ न देणे हा त्यांच्या याच कुंपणक्षेत्री अहंतेचा परिणाम आहे. कुणी मान्य करो वा न करो काँग्रेस पक्षाला सव्वाशेहून अधिक वर्षांची दीर्घ परंपरा आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्त्वाची त्याची थोरवी उज्ज्वल आहे आणि राजकारणात अपरिहार्यपणे वाट्याला येणाऱ्या जय-पराजयाएवढीच त्याच्या चांगल्या व वाईट बाजूंची क्षेत्रेही बरीच आहेत. मात्र तरीही त्याच्या चाहत्यांचा वर्ग गावखेड्यात अजून शाबूत आहे. (आंबेडकरी पुढारी विखुरले तरी आंबेडकरी जनता ठाम राहिली तसेच) या वर्गाला अजून गांधी-नेहरू या नेत्यांच्या दीर्घ सेवेविषयीची कृतज्ञता वाटणारी आहे. काँग्रेस पक्षाची लोकसभेतील सदस्यसंख्या ४४ पर्यंत घसरली असली तरी भाजपाची अशी संख्या एकेकाळी अवघ्या दोनवर आली होती हे येथे लक्षात घ्यायचे. आताचा प्रश्न नरेंद्र मोदींशी समोरासमोरचा व बरोबरीचा सामना राहुल गांधींखेरीज दुसरे कोणी करताना दिसत नाही हा आहे. मुलायम नाहीत, नितीश नाहीत, लालू-ममता नाही, करुणानिधी नाही आणि डाव्यातलेही तसे कोणी पुढे दिसत नाहीत. शरद पवारांचे वागणे नित्याप्रमाणे संशयास्पद राहिल्याने त्यांच्या भूमिकेविषयीचा भरवसा त्यांच्याही पक्षातल्या कोणाला वाटत नाही. या स्थितीत राहुल गांधींनी समोरासमोरच्या सामन्यात, मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत कोणत्या तारखेला कोणाकडून किती कोटी रुपये घेतले हे जाहीर केले आहे. या आरोपांची शहानिशा पुढे रीतसर होईल. आज राहुल काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत व आताच्या सर्व विरोधी पक्ष पुढाऱ्यांत तरुण आहेत. भाजपाच्या सगळ््या प्रवक्त्यांची ताकदही त्यांना बदनाम करण्यात खर्ची पडताना दिसत आहे. मोदींवरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी घेऊन राष्ट्रपतींना भेटण्याचा राहुल गांधींनी विरोधकांकडे धरलेला आग्रह या साऱ्या संदर्भात महत्त्वाचा आहे. राहुल गांधींचे वय, अनुभव आणि उत्साह यामुळे बिचकलेल्या विरोधी वृद्ध जनांना त्यांचे वागणे घाईचे व काहीसे आगाऊपणाचे वाटत असून त्यांच्यासोबत जायचे की नाही या प्रश्नाने त्यांना भंडावले आहे. नेहरूंनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा ते ३० वर्षांचे होते. सरदार पटेलांनी ते वयाच्या ६० व्या वर्षी तर मौलानांनी ते ३६ व्या वर्षी स्वीकारले. राजकारणात वयाहून जनाधार महत्त्वाचा व मोठा असतो अन्यथा शिवसेनेचे मनोहर जोशीच उद्धव ठाकऱ्यांच्या पुढे राहिले असते. दुर्दैव याचे की यासाठी लागणारे मनाचे मोठेपण आपली मोठी माणसेही पुष्कळदा दाखवीत नाहीत आणि नव्या पिढ्यांचे नवे दमदारपण हा त्यांना आजच्या काळातही बालिशपणाच वाटतो. आपले राजकारण आता उतरणीला लागले आहे याची जाणीवही मनाला शिवू न देण्याचा प्रयत्न करणारी ही कर्मठ माणसेच देशात प्रबळ विरोधी संघटन निर्माण होऊ देत नाहीत. मुलायम सिंहांना अखिलेशचे तरुणपण चालते मात्र राहुल गांधींच्या त्याच वयातील राष्ट्रीय नेतृत्वाला मान्यता देणे त्यांना अवघड जाते. नेमकी हीच स्थिती देशातील त्यांच्या वयाच्या म्हातारपणाकडे झुकलेल्या अनेक पुढाऱ्यांची आहे. राहुलऐवजी हे नेतृत्व आम्ही करू वा त्याचे स्वरुप सामुहिक ठेवू असे त्यांच्यातील कोणालाही म्हणता आले असते. पण ते म्हणण्याएवढे मोठेपणही त्यांच्यातल्या कोणी अद्याप दाखवले नाही. ही स्थिती नरेंद्र मोदींना अनुकूल आहे आणि एकेका पक्षाला व पुढाऱ्याला एकाकी गाठून निकालात काढणे तिच्यामुळे त्यांना शक्यही होणार आहे. त्यांनी ममताला एकाकी पाडले आहे, मायावतींना मित्रपक्ष मिळणार नाहीत याची व्यवस्था केली आहे, नितीश आणि लालू यांच्यात दुरावा उभा होईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दु:ख याचे की स्वत:ला अनुभवी समजणाऱ्या या नेत्यांना आपल्या एकजुटीचे महात्म्य अजूनही कळल्याचे दिसत नाही. राजकारणात अनुभवातून सारे शिकायचे असते. आपले राजकारण मात्र कर्मठ वृद्धांच्या खोट्या कवचांपुढे हतबल झाल्याचेच दिसत आहे. हे राजकारणी कधीतरी शहाणे आणि लवचिक होतील अशी आशा करणे एवढेच अशावेळी लोकांच्या हाती उरत असते.