कोण, कुठे उभे राहणार? - आधी बसा तरी!

By अतुल कुलकर्णी | Published: May 9, 2023 07:25 AM2023-05-09T07:25:31+5:302023-05-09T07:30:23+5:30

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि (उद्धव) शिवसेनेचे नेते एकमेकांना बोचकारण्याची एकही संधी सोडत नाहीत; नुसते सकारात्मक वातावरण असून उपयोग काय?

Leaders of NCP, Congress and Shiv Sena are criticizing each other | कोण, कुठे उभे राहणार? - आधी बसा तरी!

कोण, कुठे उभे राहणार? - आधी बसा तरी!

googlenewsNext

अतुल कुलकर्णी संपादक, लोकमत, मुंबई

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी लोकसभेचे जागावाटप तरी किमान लवकरात लवकर झाले पाहिजे. त्यासाठी चर्चेला बसले पाहिजे, असे म्हटले आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीची वज्रमूठ फक्त जाहीर सभा घेण्यापुरतीच आहे. सगळ्यांनी एकत्र बसून ही मूठ कशी मजबूत करावी, यावर अजून चर्चाच सुरू केलेली नाही. अर्थात, प्रत्येक गोष्ट जाहीरपणे माध्यमात सांगण्याची गरज नसते. तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन बसायला हवे. कोणत्या जागा कोण जिंकू शकतो, कोणाची ताकद कुठे आहे, याचा अंदाज घेतला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे होतील, असे आजचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला लोकसभेत एकी दाखवता आली तर त्याचा फायदा विधानसभेत होऊ शकतो. मात्र त्यासाठी सगळ्या नेत्यांनी एकदिलाने, एकत्र बसून चर्चेची सुरुवात केली पाहिजे. जी आज होताना दिसत नाही.

ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत मुखपत्राच्या अग्रलेखातून कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना तर कधी काँग्रेसच्या नेत्यांना चिमटे काढण्याची संधी सोडत नाहीत. अशी टीका झाली की लगेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही पलटवार होत आहेत. हे एकीचे लक्षण नव्हे. नाना पटोले, संजय राऊत या नेतेमंडळींनी किरीट सोमय्या यांचा कित्ता गिरवू नये, असे तिन्ही पक्षातल्या नेत्यांना वाटते. पण समोरचा काही बोलल्यावर आपण बोललो नाही तर आपण कमी पडलो किंवा माघार घेतली असा “समज” तयार होईल, या भावनेने प्रत्येक जण एकमेकांच्या विरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाही. 

राजकारणात जर तर ला महत्त्व नसते. मात्र असे जर आणि तरच राजकीय वातावरण चांगले किंवा वाईट करण्याचे काम करत असतात. उद्या महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अजित पवार मुख्यमंत्री झाले तर ठाकरे गटाचे आमदार आणि काँग्रेसचे आमदार आपल्याकडे ज्या पद्धतीची कामे घेऊन येतील ती आपण करू शकणार नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची आपली वृत्ती नाही, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये झाल्याचे वृत्त आहे. याचा दुसरा अर्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपल्या बाजूने पोषक वातावरण आहे याची जाणीव होऊ लागली आहे. ही जाणीव वेळेच्या आधीच झाल्यामुळे कदाचित तिघांमध्ये आपण २०० जागा जिंकू शकतो, असा नको तेवढा आत्मविश्वास वाढीला लागला तर महाविकास आघाडीचा बंगला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल. 

वातावरण आपल्या बाजूने आहे, सहानुभूती आपल्यालाच आहे, असे उद्धव ठाकरे गटाला वाटते. त्यामुळे ठाकरेंच्या गटातले नेते जिथे त्यांच्याकडे उमेदवारही नाही अशा जागांसाठी आतापासूनच हट्ट करू लागले आहेत. कर्नाटकात आपलीच सत्ता येणार आहे, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे महाराष्ट्रातही आपणच सत्ता काबीज करू शकतो, अशी स्वप्ने काँग्रेसला दिवसाढवळ्या पडू लागली आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष जागा वाटपासाठी एकत्र  बसायला तयार नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजीनामानाट्य झाल्यानंतर महाराष्ट्रातला राष्ट्रवादी पक्ष ढवळून निघाला आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये शरद पवार यांच्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. एका दिशेने शरद पवार तर दुसऱ्या दिशेने अजित पवार यांनी वेगवेगळ्या भागांचे दौरेदेखील सुरू केले आहेत. याचा सरळ अर्थ काँग्रेस आणि शिवसेना ऐकण्याच्या मन:स्थितीत आली नाही, तर आपण आपल्या मार्गाने जायला मोकळे; असा होतो.

काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वागण्यावरून सुप्त नाराजी आहे.  ती नाराजी ते खासगीत बोलूनही दाखवतात. वज्रमूठ सभेच्या वेळी दोन्ही काँग्रेसचे नेते स्टेजवर असतात. त्यांची भाषणे सुरू असतात. मात्र उद्धव ठाकरे सुरुवातीपासून स्टेजवर येत नाहीत. त्यांच्या भाषणाच्या काहीवेळ आधी येतात, ते आल्यानंतर सगळ्यांनी उठून उभे राहणे शिष्टाचाराला धरून झाले, पण  उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आहेत का, असा प्रश्न आता कार्यकर्ते विचारू लागले आहेत. महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे, तर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित सगळ्या गोष्टी करायला हव्यात. उद्धव ठाकरे निश्चित मोठे नेते आहेत. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. मात्र त्यांनी आमच्या नेत्यांना अशी दुय्यम वागणूक का द्यावी, असा सवालही काही नेते बोलून दाखवतात. हाच प्रकार राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, जयंत पाटील यांच्या सुप्त संघर्षातून पुढे येत आहे. 

नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण झाल्याचा निष्कर्ष आघाडीतील नेत्यांनी काढला आहे. मात्र हा निष्कर्ष क्षणभंगुर ठरू शकतो. तिन्ही पक्षात कमी जास्त प्रमाणात वातावरणात कटुता आहे. केवळ भावनिक वातावरण आहे म्हणून त्याच्या आधारावर विजय मिळतो असे नव्हे, जमिनीवर उतरून काम करावे लागते. कार्यकर्त्यांना काम द्यावे लागते. ते  झाले नाही, तर चांगले वातावरण कामी येणार नाही! 
 

Web Title: Leaders of NCP, Congress and Shiv Sena are criticizing each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.