ऑनलाइन लोकमत
शोषित-पीडितांच्या हक्कासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आठवतं ते नर्मदा आंदोलन. सरदार सरोवर आणि नर्मदा आंदोलनातील त्यांचं योगदान अनन्यसाधारण. पण हा आलेख तिथेच थांबत नाही. ज्याच्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचा ज्याचा हक्कही नाकारला जातोय, ज्यांना कुणीच वाली नाही, अशांचा ‘आवाज’ आणि हा आवाज आणखी बुलंद करणारी प्रेरणा म्हणून मेधा पाटकरांकडे पाहिलं जातंय. फाटक्या, दरिद्री म्हणवल्या जाणाऱ्या याच कफल्लक लोकांना हाताशी धरून त्या अनेक लढे लढल्या. सत्तास्थानांना मुळापासून हादरे दिले. एका विचारवंतातून जागा झालेला त्यांच्यातला कार्यकर्ता अजूनही जागोजागी निखारे पेटवतो आहे, लोकाना ‘जागवतो’ आहे.
सामाजिक लढ्याला आशयगर्भ परिमाण देण्याचे काम करताना हक्काच्या लढाईचे नवे मापदंड यांनी तयार केले. पर्यावरणवादी व नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रणेत्या ही त्यांची लौकिक ओळख म्हटले तर पुरेशी आणि म्हटले तर फारच अपुरी. स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात जन्माला आल्याने लहान वयातच लोक चळवळीशी संबंध आलेल्या मेधा पाटकर राष्ट्र सेवा दलाच्या कामात सहभागी झाल्या. वैद्यक व्यवसायात जाण्याची इच्छा बाजूला ठेवून समाजकार्यातच पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. १९८५ साली नर्मदेवर अनेक छोटी-मोठी धरणे बांधण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याने नर्मदेच्या खोऱ्यातील अनेक आदिवासी विस्थापित होणे अटळ होते. प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाशी हा प्रश्न निगडीत होता. आधी पुनर्वसन मगच प्रकल्प अशी भूमिका घेत मेधा पाटकरांनी सामाजिक न्यायाची नवी लढाई सुरू केली.
त्याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प रद्द करा, असा आग्रह धरला. त्यातून ही चळवळ वेगाने फोफावली. नर्मदा बचाओ आंदोलनाची व्याप्ती अफाट वाढली. विस्थापितांच्या हक्कासाठी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी उपोषणाद्वारे अहिंसात्मक सत्याग्रह केला. नर्मदेच्या पाण्यात आत्मसमर्पण करण्याचे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मेधा पाटकरांच्या शब्दाला त्यानंतर नैतिक वजन लाभले. एकीकडे हा असा तळागाळातला लढा आणि दुसरीकडे कायदेशीर लढाई अशी दुधारी किमया त्या साधू शकल्या. त्यातून त्यांना बऱ्यापैकी यशही लाभले. त्यापेक्षाही, आधी पुनर्वसन मगच प्रकल्प हे त्यांचे सूत्र देशभरात रुजले. अव्याहत सुरू असलेल्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांना देशातले आणि परदेशातले अनेक पुरस्कार मिळाले. अर्थात अत्यंत प्रतिष्ठेच्या मॅगसेसे पुरस्काराने त्यांच्या लढ्यावर शिक्कामोर्तब झाले आणि मेधा पाटकर या नावाभोवती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वलयही निर्माण झाले.
Web Title: Learn about Medha Patkar directly challenging Narendra Modi ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.