बेजबाबदारपणा सोडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:27 PM2020-09-07T23:27:46+5:302020-09-07T23:28:54+5:30
देशातील ३५ जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि मृत्यूदराचे प्रमाण गंभीर
मिलिंद कुलकर्णी
देशातील ३५ जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि मृत्यूदराचे प्रमाण गंभीर असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केले आहे. खान्देशच्यादृष्टीने चिंतेची गोष्ट म्हणजे या ३५ जिल्ह्यांमध्ये जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने व्यक्त केलेल्या चिंतेचे गांभीर्य आम्हाला खरोखर पटणार आहे काय, असे विचारण्याची वेळ आली आहे. अनलॉक ४ सुरु झाल्यानंतर जळगाव शहरासाठी जिल्हा प्रशासनाने सम - विषम पध्दत बंद करुन सरसकट ५ दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु ठेवण्याची मुभा दिली. प्रशासनाच्या या निर्णयाचे व्यापारी वर्गाने स्वागत केले. परंतु, शनिवारी बाजारपेठ बंद ठेवण्याची वेळ आल्यावर काहींनी नाराजी व्यक्त केली. काहींनी सर्रास उघडली. काहींनी तर आम्हाला नियम लागू नाही, असा दावा केला. प्रशासनाने केवळ हीच कामे करायची काय? कारवाई केली तर पुन्हा नाराजी, ओरड होते. अनलॉक असताना थोडे आत्मसंयमन केले तर बिघडले कोठे?
नागरिकांचीही तीच स्थिती आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर रस्त्यांवर पुन्हा तेवढीच गर्दी दिसू लागली आहे. शारीरिक अंतर पाळण्याचा नियम जणू आम्ही विसरुन गेलो. मास्क लावण्यात आम्हाला कमीपणा वाटू लागला. त्यात आघाडीवर आहे, तरुण मंडळी. एकीकडे याच तरुणांना परीक्षा द्यावी लागू नये म्हणून राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेत आहे. केद्र सरकारशी पंगा घेत आहे. तरुणाईचा जीव वाचावा, हा त्यामागे उद्देश आहे. पण ही तरुणाई, एका मोटारसायकलवर चार जण घेऊन गावभर हिंडते आहे, मास्क न लावता चौकात गप्पा ठोकत आहे, हा कसला बेजबाबदारपणा. पालिका किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून नियमभंग करणाºया व्यापारी, व्यावसायिक, तरुण यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याची अपेक्षा आहे काय?
कोरोनाची स्थिती, वाढते रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी वृध्दांचे होणारे मृत्यू याकडे डोळसपणे बघा, म्हणजे तुम्हाला गांभीर्य लक्षात येईल, हे सांगण्याची वेळ आली आहे. सोमवारी, ७ सप्टेबर रोजी जळगाव जिल्ह्यात उच्चांकी ११८५ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ६१८ वर पोहोचली आहे. २३ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. परंतु, ९३३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जळगाव शहरात सर्वाधिक ७ हजार ६०१ रुग्ण आहेत, तर सर्वात कमी बोदवड या लहान तालुक्यात ४७८ रुग्ण आहेत. मुक्ताईनगर येथे ९२० रुग्ण आहेत, बाकी ८ तालुक्यांमध्ये एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आहेत. अमळनेर, चोपडा, जामनेर, चाळीसगाव या ४ तालुक्यांमध्ये दोन हजारापेक्षा अधिक रुग्ण आहेत. कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घ्यायची असेल तर ४० लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात १० लाख ३३ हजार ७४३ लोक प्रतिबंधित क्षेत्रात राहत आहेत. दोन लाख ३८ हजार ४२० घरांवर कोरोनाचे सावट आहे. ८७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४२३ लोकांना इतर आजारदेखील होते, त्यात कोरोनाचा घाव बसला. उर्वरित ४५४ लोक हे कोरोनाचे बळी आहेत. ७५५ मृत्यू पावलेले लोक हे ५० वयापेक्षा अधिक होते.
ही आकडेवारी काळजीपूर्वक लक्षात घेतली तर कोरोनाचे भय आपल्याला जाणवेल. प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्याचे सोडून आम्ही बेजबाबदारपणे वागलो, तर स्वत: संकटात येऊ , त्यासोबत भोवतालच्या इतरांनाही प्रसाद देऊ.
केद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे प्रशासनानेदेखील गांभीर्याने पालन करायला हवे. राज्याच्या तुलनेत जळगाव जिल्हा हा कोरोना चाचणीत सहा हजाराने मागे आहे. प्रति १० लाख लोकसंख्येच्या मागे राज्यात २८ हजार ०८५ चाचण्या होतात. जळगावात मात्र २२ हजार १७४ होत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात चाचण्या ११ हजार ४६५ झाल्या. त्यापैकी ३ हजार २५७ बाधित रुग्ण आढळले. पण याठिकाणी काँटॅक्ट ट्रेसिंग कमी होत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नमूद केले आहे.
धुळे जिल्ह्यात २० हजार चाचण्या झाल्या आहेत. बाधित रुग्णांची संख्या १० हजार आहे. १७८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरु लागला आहे. जनता कर्फ्यूसारखे उपाय नंदुरबार व धुळे जिल्ह्यात गावा - गावात होत आहे. एकमद लॉकडाऊन नाही तर नियम धाब्यावर असे दोनच पर्याय आमच्याकडे आहे काय? मध्यममार्ग नाहीच का? नियम पाळून जगायला आम्ही कधी शिकणार?