विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी?

By यदू जोशी | Published: June 17, 2022 08:40 AM2022-06-17T08:40:03+5:302022-06-17T08:41:05+5:30

राज्यसभा हा अजित पवार-फडणवीस मैत्रीचा ‘पहिला टप्पा’ मानला तर विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘टप्पा दोन’ बघायला मिळू शकतो.

Legislative Council election 2022 Who will loss the seat bhi Jagtap prasad Lad or someone else | विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी?

विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी?

Next

यदु जोशी
वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत

राज्यसभा हा अजित पवार-फडणवीस मैत्रीचा ‘पहिला टप्पा’ मानला तर विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘टप्पा दोन’ बघायला मिळू शकतो.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार हरले, बाकी सगळे सहा जण नेते होते ते जिंकले. पवार कार्यकर्ते होते. विधान परिषदेच्या निवडणुकीतील दहा उमेदवार हे नेते आहेत, शिवसेनेचे एकटे आमशा पाडवी हे कार्यकर्ता “कॅटेगिरी”तील आहेत. अर्थात गेल्या वेळी शिवसेनेला मते मागावी लागली, यावेळी त्यांच्याकडे जादाची मतं आहेत, पण आकड्यांचा खेळ विचित्र असतो. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून ज्यांनी नियोजन केलं होतं त्यांच्या एव्हाना हे लक्षात आलं असेल की सगळीकडे सारखीच टक्केवारी चालत नाही. कंत्राटातील टक्केवारी वेगळी; निवडणुकीचं अंकगणित वेगळं !
 
राज्यसभेत फडणवीसांनी पीयूष गोयल, अनिल बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते देऊन धनंजय महाडिकांना जिंकवलं. गेल्या वेळी त्यांच्या फॉर्म्युल्याचा अंदाज कुणालाही आला नाही, यावेळी त्यांचा फॉर्म्युला आधीच माहिती करवून घेण्यासाठी गुप्तहेर कामाला लागले आहेत, पण फडणवीस पोटातलं पाणी हलू देत नाहीत. त्यांची सिक्रेट्स त्यांच्याच दुसऱ्या कानाला माहिती नसतात, अमृतावहिनी दूरच राहिल्या ! पाचपंचवीस वर्षांनी ते आत्मचरित्र लिहितील, त्यात कदाचित काही रहस्यांचा उलगडा होईल.

फडणवीस-पवार मैत्री ! 
यावेळी मतदान गुप्त आहे, त्यामुळे कोणाची गुप्त मैत्री कोणाच्या कामाला येईल हे सांगता येत नाही. राज्यसभेला मतदान खुलं असतानाही अजित पवारांची मैत्री फडणवीसांच्या मदतीला धावून गेली, असा तर्क संजय राऊत यांच्या आरोपाच्या आधारे करता येऊ शकतो. ज्या तीन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला मतदान केलं नसल्याचा आरोप राऊत यांनी केला ते तिघेही अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. अजित पवार-फडणवीस मैत्रीचा हा पहिला टप्पा मानला तर विधान परिषदेत टप्पा दोन बघायला मिळू शकतो. संजय राऊत यांनी आमदारांची नावं घेणं, शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रारी केल्याच्या बातम्या, सुप्रियाताईंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्यासाठी देवीला साकडं घालणं हा सगळा घटनाक्रम शिवसेना व राष्ट्रवादीत कुठेतरी काहीतरी धुमसत असल्याचं लक्षण आहे. मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या पक्षासह सर्व पक्ष-अपक्ष आमदार नाराज असल्याचं जे चित्र निर्माण करण्यात आलं आहे त्यातून मुख्यमंत्री बदलले तर सरकार मजबुतीनं चालेल हे सांगण्याचा छुपा अजेंडा दिसतो. 

गेल्या अडीच वर्षांत शिवसेना-राष्ट्रवादीची घट्ट असलेली मैत्री पहिल्यांदाच कुठेतरी सैल होताना दिसत आहे. सव्वादोन वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले, तरी सरकार राष्ट्रवादी चालवित असल्याचं बोललं गेलं. गेल्या दोनअडीच महिन्यांत शिवसेनेच्या आमदारांनीच जोरदार तक्रारी केल्यानंतर ठाकरेंनी अधिकार दाखवायला केलेली सुरुवात हेही मित्रपक्षाच्या अस्वस्थतेचं एक कारण असू शकतं. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतील परस्पर अविश्वासाचे तयार झालेले ढग विधान परिषद निवडणुकीत अधिक गडद होऊ शकतात. भाजप त्याचा फायदा घेईल. भावनांवर पक्ष चालतो; सरकार नाही, हे शिवसेनेच्या नेतृत्वाला लवकर कळलं तर बरं! विधान परिषदेत पाचही जागा निवडून आणल्या तर फडणवीसांचं वजन (राजकीय) आणखी वाढेल. सरकार लगेच जाईल असं नाही, पण कटकटी, कुरबुरी वाढत जातील. त्यातून पुढे मोठा स्फोट होऊ शकेल.

विकेट कोणाची जाईल? 
२० तारखेच्या निवडणुकीत गुप्त मतदानाचा फायदा घेत काही जण आपले जुने हिशेब काढू शकतात. काही जण परपक्षातील दोस्ती निभावतील. काही जणांची जुन्या पक्षाशी नाळ अजून पूर्णपणे तुटलेली नाही. कोणी कोणाचा जावई असतो, कोणाचा जीव ऐनवेळी जातवाल्यासाठीही तुटू शकतो.  प्रत्येक पक्षात असे आमदार आहेत की जे इकडून तिकडे जाऊ शकतात. त्यांच्यावर कॅमेरे लागलेले आहेत. अर्थात गुप्त मतदानात मतपेटीत मत टाकण्याच्या आधीपर्यंतच नजर ठेवता येते. नंतरचं कोणी पाहिलं? एका मोठ्या पक्षातील खासदार त्यांच्याच पक्षातील दोनचार मतं दुसरीकडे वळविण्याच्या हालचाली करीत असल्याची चर्चा आहे. लोक म्हणतात की काँग्रेसचे भाई जगताप अन् भाजपचे प्रसाद लाड या दोन मुंबईकर धनवंतांमध्ये सामना आहे, बाकीच्या नऊ जागांचे निकाल ठरलेले आहेत... पण असं छातीठोकपणे कसं सांगणार? लाड-जगताप डेंजर झोनमध्ये आहेत हे खरं, पण एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मोठं होऊ द्यायचं नाही असा काही जणांनी विचार केला अन् त्यांना अडचणीत आणलं तर? भाजपच्या मदतीनं तसं होऊ शकतं अशी शंका काही जणांना आहे. ‘अर्थ’पूर्ण ताकदीच्या आधारे भाई जगताप जिंकतील अन् चंद्रकांत हंडोरेंचा गेम तर नाही होणार? 

काँग्रेसनं एकच जागा लढवावी अन् निवडणूक बिनविरोध करावी, असा दबाव शिवसेना अन् राष्ट्रवादीनंही आणला होता, पण काँग्रेसनं ऐकलं नाही. याचा राग म्हणून काँग्रेसला एकटं तर पाडलं नाही जाणार? गेल्या वेळी बाहेरच्या मतांची गरज शिवसेनेला अन् भाजपला होती. यावेळी ती भाजप अन् काँग्रेसला जास्त आहे. राज्यसभेत भाजपला केवळ अपक्ष अन् लहान पक्षांचीच मतं घेण्यास वाव होता, यावेळी सर्वपक्षीय वाव आहे. ‘भाजपमध्ये आमचे काही पूर्वीचे लोक आहेत’ असं सूचक वक्तव्य राज्यसभेच्या निकालानंतर शरद पवार यांनी केलं होतं. इतर पक्षांतील आमदार खेचून आणताना आपले सुरक्षित राहतील याची काळजी प्रत्येकच पक्षाला घ्यावी लागणार आहे; भाजपही त्याला अपवाद नाही.

Web Title: Legislative Council election 2022 Who will loss the seat bhi Jagtap prasad Lad or someone else

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.