साहेबांच्या जखमेवर लिंबू
By संदीप प्रधान | Published: January 20, 2018 04:30 AM2018-01-20T04:30:15+5:302018-01-20T04:30:15+5:30
सूर्योदय झाल्यावर राजसाहेबांना जाग आली तीच मुळी कोबी पचास रुपया किलो और टमाटर साठ रुपया किलो... बढीया टमाटर लेना बहेनजी... कोबी... कोबी... कोबी... पचास का कोबी अशा हाळ्यांनी.
सूर्योदय झाल्यावर राजसाहेबांना जाग आली तीच मुळी कोबी पचास रुपया किलो और टमाटर साठ रुपया किलो... बढीया टमाटर लेना बहेनजी... कोबी... कोबी... कोबी... पचास का कोबी अशा हाळ्यांनी. साहेबांनी घराच्या खिडकीकडे धाव घेत खाली पाहिलं तर १५ ते २० फेरीवाले भाज्या, कांदे-बटाटे, फळफळावळ घेऊन बसले होते. कुणी आपल्या लालचुटुक सफरचंदांचे मार्केटिंग करीत होता, तर कुणी कांद्यावरून उच्चरवात घासाघीस करीत होता. साहेबांनी आपल्या केसात बोटं खुपसून डोकं गच्च दाबून धरलं. पाकिटातून सिगारेट काढून पेटवली आणि खोलवर कश घेतला. क्षणार्धात धुरांच्या लोटात समोरील दृश्य दिसेनासे झाले.
मात्र, टमाटर... कोबी... गवार... कांदा... लेलोचे कर्कश स्वर कानांत घुमू लागले. तेवढ्यात, संदीप देशपांडे दाखल झाले. अरे काय रे हे... साहेब कपाळावर आठ्या चढवत बोलले. साहेब, महापालिकेनं हॉकिंग आणि नॉन-हॉकिंग झोन जाहीर केले काल-परवा. त्यामध्ये नेमके आपल्याच घरासमोर आणि मागं हॉकिंग झोन टाकले. मग, तुम्ही सगळे झोपले होता का रे, साहेबांनी पुन्हा दीर्घ कश मारला आणि हलकेच धुराची वेटोळी हवेत सोडली. तशी कुणकुण लागली होती. मात्र, इतक्या झटपट फेरीवाले आणून बसवतील, याचा अंदाज नव्हता आला... देशपांडे डोकं खाजवत बोल्ले. तेवढ्यात, देशपांडे यांचा फोन वाजला. पलीकडून सौ. देशपांडे यांचा शब्दन्शब्द स्पष्ट ऐकू येत होता. अहो ऐकलं का, तिकडं कृष्णकुंजवर असाल तर येताना चांगली ताजी भाजी घेऊन या. आपल्या घरासमोरचे फेरीवाले कुठे गेल्येत देव जाणे. पण, हल्ली तिकडे बसू लागल्येत. बरं मला आजच भाजी करायची आहे, याच भान ठेवा.
नाहीतर तिकडेच बसाल आणि मी घरात भाजी येण्याची वाट पाहत बसेन. देशपांडे यांनी इकडून केवळ हूं...हूं... केलं. साहेबांनी हे ऐकलं तर लफडं होईल, असा विचार देशपांडे करीत असताना पुन्हा फोन वाजला. पुन्हा सौ. देशपांडे पलीकडून बोलू लागल्या. बरं का कालच वांगी झाल्येत आणि मला ती पचपचीत भेंडी आवडत नाहीत. त्यामुळे या दोन भाज्या सोडून बाकी कुठलीही आणा. आपल्या शेजारच्या तावडेकाकूंना भेंडी आणली तरी चालतील. तुम्ही अजून तिकडेच आहात की, भाजी घेऊन निघालात. माझी खोटी करू नका. देशपांडे अचानक शॉक लागल्यासारखे उठले अन् पटकन ‘जरा भाजी घेऊन येतो’, असं पुटपुटले. साहेबांच्या डोळ्यांत निखारे फुलले आणि खोलीत धूरफवारणी झाली. तेवढ्यात, बाळा नांदगावकर दाखल झाले. त्यांच्या हातात दोन पिशव्या भरून भाजी होती.
दमलेल्या नांदगावकरांनी ओशाळ हसत साहेब, काय करणार बायकोनं बळेबळे पिशव्या हातात कोंबल्यानं नाइलाज झाल्याची तक्रार केली. चला, निघा तुमच्या घरी चुली खोळंबल्यात तुमच्या भाजीसाठी, असं साहेब बोल्ले आणि पडत्या फळाची आज्ञा मानून ते बाहेर पडले. तेवढ्यात, समोरचा इंटरकॉम वाजला. अहो, घरातली लिंब संपल्येत, जरा पप्याला आणायला सांगता का? फोन ठेवून साहेबांनी पप्या...पप्या... अशा हाका मारल्या. तेवढ्यात, आपणच त्याला पाकीट आणायला पाठवलंय, हे आठवलं. साहेब स्वत:च लिंबं आणायला उठले.
- संदीप प्रधान