कमी झोपाल, तर संसर्गाचा धोका मोठा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 09:24 AM2021-07-09T09:24:36+5:302021-07-09T09:25:19+5:30
आपल्या शरीरामध्ये संध्याकाळी ७ वाजता आणि पहाटे ५ वाजता IL-6 सगळ्यात उच्च पातळीवर असते. झोपेचा परिणाम या रसायनांच्या पातळीवर होतो.
आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पहिल्या फळीत मोनोसाइट, मॅक्रोफाज अशा पेशींचा समावेश असतो. या पेशी आपल्या शरीरामध्ये गस्त घालत असतात. कुठलाही वेगळा जीव (विषाणू / जीवाणू) आढळला तर त्याला नेस्तनाबूत करणे, गिळून टाकणे हे यांचे काम असते. परकीय जीव ओळखण्यासाठी या पेशींच्या पृष्ठभागावर रिसेप्टर असतो. परका जीव ओळखताच या पेशींमधील जनुके वेगवेगळ्या प्रकारची रसायने बनवू लागतात. काही रसायने त्याच भागातील इतर पेशींना सावध करतात तर काही अंतर्दाह (Inflammation) निर्माण करतात. यामुळे त्या भागाचा रक्तपुरवठा वाढतो, नसांवर परिणाम होऊन वेदना झाली की सर्व शरीराचे लक्ष त्या भागाकडे वेधले जाते. अंतर्दाह वाढवण्यात IL-6 आणि TNF या दोन रसायनांचा विशेष वाटा असतो.
आपल्या शरीरामध्ये संध्याकाळी ७ वाजता आणि पहाटे ५ वाजता IL-6 सगळ्यात उच्च पातळीवर असते. झोपेचा परिणाम या रसायनांच्या पातळीवर होतो. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून ‘कमी झोपेचे’ परिणाम ही रसायने वाढवण्यामध्ये म्हणजेच पर्यायाने शरीरातील अंतर्दाह अनेक पटीने वाढवण्यामध्ये होतो हे सिद्ध केले आहे. एखादा माणूस सातत्याने कमी झोप घेत असेल आणि त्याने एक रात्र झोप घेतली नाही, तर त्याच्यामध्ये या रसायनाची पातळी कैक पटींनी वाढलेली आढळते.
कॅरॉल या शास्त्रज्ञाने २०१५ साली वयोमानाचा परिणाम आणि कमी झोपल्याने झालेला अंतर्दाह याचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की पौगंडावस्थेतील मुले (वय १३ ते १८) यांच्यामध्ये कमी झोपेमुळे सर्वाधिक अंतर्दाह निर्माण होतो. कमी झोपेमुळे या पेशी (मोप्नोसाईट) अधिक बहकल्यासारखे करू लागतात म्हणजे कुणी परकीय जीवाणू नसला तरीही ही रसायने स्रवू लागतात.
तुम्हाला वाटेल, जर या पेशी अधिक रसायने तयार करीत असतील तर त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही का? दुर्दैवाने याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. तुम्ही “लांडगा आला रे..” ही गोष्ट ऐकली असेलच. त्या गोष्टीत जसे सारखा लांडगा आला रे असे ओरडल्यामुळे एक प्रकारची गाफीलता येते आणि लांडगा खरेच आल्यावर काही प्रतिसाद मिळत नाही, तसेच शरीरातही होते.
कमी झोपेमुळे होणाऱ्या सततच्या अंतर्दाहामुळे जेंव्हा विषाणूंचा हल्ला होतो तेव्हा ऐन वेळेला या रसायनांची फार वाढ होत नाही; म्हणजेच कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते!
- डॉ. अभिजित देशपांडे,
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस
iissreports@gmail.com