साऱ्या एकचालकानुवर्ती संस्थांनी शिकावयाचा धडा

By admin | Published: October 28, 2016 04:53 AM2016-10-28T04:53:57+5:302016-10-28T04:53:57+5:30

उत्तर प्रदेशातील २०१२ मधल्या निवडणूक काळात मी अखिलेश यादव यांच्या प्रचार दौऱ्यात सामील होतो. एके दिवशी सकाळी जिथे नाष्टापाणी आणि मुलाखतीच्या चित्रीकरणाची सोय

The lesson is to be learned by one of the leading agencies | साऱ्या एकचालकानुवर्ती संस्थांनी शिकावयाचा धडा

साऱ्या एकचालकानुवर्ती संस्थांनी शिकावयाचा धडा

Next

- राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)

उत्तर प्रदेशातील २०१२ मधल्या निवडणूक काळात मी अखिलेश यादव यांच्या प्रचार दौऱ्यात सामील होतो. एके दिवशी सकाळी जिथे नाष्टापाणी आणि मुलाखतीच्या चित्रीकरणाची सोय केली होती, तिथे काही ज्येष्ठ समाजवादी नेत्यांची छायाचित्रे लावलेली होती. त्यात मला मधू दंडवते यांचे चित्र दिसले नाही. ते असायला हवे असे मी अखिलेश यादव यांना म्हणालो व त्यांनी तसे वचनही दिले. त्या घटनेला आता पाच वर्ष झाली. पण दंडवतेचे चित्र तिथे लावले गेले असेल हे मी ठामपणे सांगू शकत नाही.पण लखनौमध्ये सध्या जी यादवी माजली आहे ती पाहाता असे वाटते की, मधू दंडवते यांच्यासारख्या अभ्यासू आणि सत्शील व्यक्तीचे चित्र तिथे नसलेलेच बरे.
मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीला समाजवादी-लोहियावादी विचारसरणीचा केव्हांच विसर पडला आहे. कधी काळी हा पक्ष ‘नेहरुवादाच्या’ विरोधात ठाम उभा होता पण आता तो यादव परिवाराच्या नियंत्रणात कैद झाला आहे. पक्षाची वैचारिक बैठक कधीचीच विस्कटली असून तिची जागा केवळ एका परिवाराभोवती फिरणाऱ्या हितसंबंधी लोकांनी घेतली आहे. त्यात आझमखान आणि अमरसिंह यांच्यासारख्या परिवाराबाहेरील प्रभावी व्यक्तीदेखील आहेत. हे दोघे त्यांच्या जागी प्रबळ आहेत. खान रामपूर पट्ट्यात प्रभाव राखून आहेत तर दोघेही बऱ्याचदा खासगी उद्योग समूह व परिवारांच्या मदतीला धाऊन जाताना दिसले आहेत. अमरसिंह दिल्ली आणि मुलायमसिंह यांना जोडणारा दुवा आहे. अमरसिंह यांनीच मुलायम यांना तुरुंगात जाण्यापासून वाचविल्याची बाब एव्हाना पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनीही मान्य केली आहे.
एखाद्या परिवाराकडून नियंत्रित केला जाणारा पक्ष त्याचा सर्वोच्च नेता वा परिवार प्रमुख जिवंत असेपर्यंतच टिकून राहातो आणि आपला प्रभाव पाडीत असतो. साहजिकच जेव्हां केव्हां त्याची पक्षावरील पकड ढिली होऊ लागते, तेव्हां सारे पक्षांतर्गत नियोजनच कोलमडून पडते. विशेषत: परिवारातील अन्य सदस्य त्यांचा प्रभाव पाडू लागतात तेव्हां असेच घडते. अखिलेश यादव यांना पक्षातच शत्रू निर्माण झाले आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे त्यांचे काका शिवपाल यादव. अखिलेश तरुण आहेत, मतदारांना आकर्षित करु शकतात पण पक्षाचे नियंत्रण मात्र त्यांच्या काकांसारख्या जुन्या पिढीतल्या लोकांकडे आहे. अखिलेश यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे व खरे तर हीच बाब निवडणुकीत अनुकूल ठरत असते. पण पक्षाच्या उमेदवारांची निवड आणि अन्य पक्षांशी युती करण्याचे निर्णय मात्र त्यांच्या काकांच्या हातात आहेत. एरवी मुलायम यांचा निर्णय अंतिम ठरलाही असता. पण जेव्हां राजा वृद्ध होतो तेव्हा त्याची पकड ढिली होते आणिे युद्धकाळात तो हतबल होतो.
शिवसेना आणि बाळ ठाकरे यांच्या बाबतीत असेच झाले होते. एका बाजूला पुत्रप्रेम तर दुसऱ्या बाजूला प्रभावी व्यक्तिमत्वाचा महत्वाकांक्षी पुतण्या. दोहोत निवड करतांना त्यांनी पुत्राला प्राधान्य दिले. परिणामी राज डावलले गेले होते, सामान्य शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राज यांच्याविषयी प्रचंड आकर्षण होते. काकांच्या निर्णयामुळे धक्का बसलेल्या राज यांच्यासमोर दोन पर्याय होते. एकतर उद्धव यांचे नेतृत्व मान्य करायचे किंवा स्वत:चा वेगळा पक्ष निर्माण करायचा. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. निवडणुकीच्या मैदानात जरी त्यांच्या हाती फार यश लागले नाही तरी त्यांनी शिवसेनेच्या पारंपरिक मराठी मतदारांमध्ये मात्र फूट पाडली.
ज्याचा फार गाजावाजा झाला नाही असा कौटुंबिक कलह म्हणून कदाचित नेहरू-गांधी परिवाराकडे पाहावे लागेल. संजय गांधींचा अपघाती मृत्यू झाला, तोपर्यंत त्यांनाच आपला उत्तराधिकारी नेमण्याचे इंदिरा गांधींच्या मनात असल्याचे वाटत होते. पण त्यात अडचण निर्माण झाली. दरम्यान संजयपत्नी मनेका गांधी यांनी वारसा हक्क सांगितला व संजय विचार मंच स्थापन केला. पण रक्ताच्या नात्याला अधिक महत्व देऊन इंदिराजींनी राजीव गांधींना त्यांची वैमानिकाची नोकरी सोडायला लावून राजकारणात येण्यास बाध्य केले. त्यातून हेही स्पष्ट झाले की मनेका भविष्यात कधीही काँग्रेसच्या पंतप्रधान होऊ शकत नाहीत, कारण त्यांना इंदिराजींचा पाठिंबा नाही.
मुलायम प्रकरणात मात्र असे दिसून येते की त्यांनाच आपल्या मुलाला वारस म्हणून घोषित करण्याची इच्छा नाही. त्यामुळे अखिलेश यांना समाजवादी पार्टीचे शाश्वत नेते म्हटले जाऊ शकत नाही. त्यांनी गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्रिपदाचा कारभार अत्यंत व्यविस्थतपणे सांभाळला असून ते यशस्वी मुख्यमंत्री ठरले आहेत. पण अखेर मुलायम यांचे वारस म्हणूनच लोक त्यांच्याकडे पाहातात. हे सर्व लक्षात घेता त्यांच्यासमोरदेखील राज ठाकरेंनी निवडलेला पर्यायच खुला आहे. आपल्या समर्थकांसह त्यांनी पक्षातून बाहेर पडावे किंवा काकांसोबत सत्तेची विभागणी मान्य करावी.
पण निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना पक्ष तोडणे ही मोठी जोखीम ठरु शकते. अखिलेश यांना त्यांच्या काकांच्या तुलनेत कार्यकर्त्यांचे अधिक समर्थन प्राप्त आहे. त्यांना दक्षिणेतील एक उदाहरण प्रेरणादायी ठरू शकते. १९९५ साली चंद्राबाबू नायडू त्यांनी त्यांचे सासरे प्रसिद्ध सिने अभिनेते एन.टी.रामाराव यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होण्यापासून वंचित केले होते. मी त्यावेळी रामराव यांची जी मुलाखत घेतली, तिच्यात रामाराव यांनी जावयावर घातकीपणाचा आरोप केला होता. जेव्हा रामराव यांना त्यांचा वारसदार कोण असेल असे विचारले, तेव्हा त्यांनी त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी लक्ष्मीपार्वती यांच्याकडे बघितले होते. त्यातून हे जाणवले की तेलगू देसम पक्षाचे नेतृत्व लक्ष्मीपार्वती यांच्याचकडे जाईल. मुलायम यांच्याप्रमाणेच एनटीआर तेव्हां सत्तरीत होते. मी जेव्हा नायडूंना विचारले की ते पक्ष संस्थापकाच्या विरोधात का गेले, तेव्हा त्यांचे उत्तर होते, ‘पक्ष वाचविण्यासाठी’!
अखिलेश चंद्राबाबूंप्रमाणे काही करतील हे सांगता येत नाही. शिवपाल यादव लक्ष्मीपार्वती यांच्या प्रमाणे राजकारणात कच्चे नाहीत. शिवाय त्याकाळी तेलगू देसम पक्षाची अवस्था आजच्या समाजवादी पार्टीइतकी विभागलेली नव्हती. सध्या समाजवादी पार्टीत ज्या काही घडामोडी होत आहेत त्या बघता केवळ एका परिवाराकडून चालवल्या जाणाऱ्या पक्षांना हा इशाराच आहे की जोवर पक्ष संघटना परिवाराच्या कह्यात गेलेली असते, तोवर नेतृत्वातील बदल सहजपणे होणे अशक्य असते. विशेषत: जेव्हा परिवार यादवांप्रमाणे प्रचंड मोठा असतो तेव्हा.
ताजा कलम: हा तर निव्वळ एक योगायोगच म्हणायचा. एकाच काळात समाजवादी पार्टीत आणि देशातील सर्वात जुन्या व मोठ्या औद्योगिक घराण्यात वादाची अभूतपूर्व ठिणगी पडली आहे. आजच्या जगातील स्पर्धा अगदी जीवघेणी ठरत चालली आहे. त्यामुळे या घडामोडी कदाचित हेच सूचित करीत असतील की वंश परंपरेने वारसदार ठरवण्याच्या पद्धतीला आता ‘टाटा’ केले जाऊन पारदर्शकतेला प्राधान्य दिले गेले पाहिजे. नेतृत्व निवडतांना गुणवत्ता बघितली गेली पाहिजे. मग क्षेत्र राजकारणाचे असो की उद्योगाचे.

Web Title: The lesson is to be learned by one of the leading agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.