कोपर्डीचा धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:50 AM2017-11-30T00:50:01+5:302017-11-30T04:46:06+5:30
कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय केला.
कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय केला. मुख्य आरोपीसह त्याला साथ करणाºया दोघांनाही तितकेच दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. गुन्हेगारांना होणाºया शिक्षेबाबत विधिवेत्ता जॉन सालमंड एक महत्त्वपूर्ण तत्त्व मांडतो. ‘शिक्षा ही फक्त गुन्हेगाराला नसते, तर असे गुन्हे करण्यास पुन्हा कोणी धजावू नये, त्यापासून परावृत्त व्हावेत’ हाही शिक्षेचा मुख्य उद्देश असतो, हे ते तत्त्व आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणाने तो धडा आज संपूर्ण महाराष्ट्राला दिला. यातील मुख्य आरोपीने अत्याचार व खुनाचे अत्यंत घृणास्पद कृत्य केले. इतर दोन आरोपींचा या गुन्ह्यांत प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. मात्र, कटात सहभाग असल्याचा दोष ठेवत त्यांनाही फाशी सुनावली. एखाद्या गुन्हेगाराला साथ करण्याची प्रवृत्ती आपणाला थेट फाशीच्या दोरापर्यंत घेऊन जाऊ शकते, हा एक मोठा धडा न्यायालयाने या निवाड्यातून दिला. स्त्रिया आणि मुलींना उपभोगाची वस्तू मानण्याची प्रवृत्ती सनातन आहे. हा रोग पुरुषी मनातून निघायला तयार नाही. बहुधा तो रक्ताचाच एक घटक असावा. या रोगावर अशीच कायदेशीर सर्जरी हवी. कोपर्डी खटला सत्र न्यायालयात चालला. पण, तरीही एक वर्षे चार महिन्यात निकाल हाती आला.गंभीर गुन्ह्यांचा असाच जलद निकाल लागला तर कायद्याचा धाक वाढेल. आरोपी आपल्या बचावासाठी कदाचित उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जातील. तेथेही लवकर निपटारा होणे आवश्यक आहे. कोपर्डी घटना ही राज्यावरील कलंक आहे. घटना जितकी वाईट, तितकीच त्यानंतर निर्माण झालेली सामाजिक तेढही. खरे तर कुठल्याही गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. माणसाची जात त्याला गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करीत नसते. पण, या घटनेला अकारण दलित-सवर्ण वादाचे रूप मिळाले. नगर जिल्ह्यात घडलेल्या दलित हत्याकांडाच्या प्रकरणात काही उत्साही नेतेगणांनी संपूर्ण मराठा समाजालाच दोषी धरले. याउलट कोपर्डी प्रकरणात झाले. या सर्वच घटनांमुळे सामाजिक विसंवाद निर्माण झाला. कोपर्डीतील पीडितेला न्याय मागण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. मराठा समाज पुढारलेला मानला जातो. पण या समाजाचेही काही मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रथमच इतक्या व्यापक प्रमाणात व संघटितपणे समोर आले. यानिमित्ताने लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. या शिस्तबद्ध मोर्चांनीही इतिहास निर्माण केला. त्यानंतर इतरही समाजांच्या मोर्चांची मालिका दिसू लागली. प्रत्येक समाजाला आपले प्रश्न मांडण्याचा हक्क आहे. मात्र, सामाजिक विसंवाद निर्माण होणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळेच पुन्हा कोपर्डी घडू नये. कुठल्याही जातीधर्माची निर्भया ही महाराष्टÑाची लेक आहे. ही लेक सुरक्षित हवी म्हणून संपूर्ण राज्यानेच कोपर्डीतून धडा घ्यावा. कोपर्डीच्या निकालाची नगरमधीलच खर्ड्याच्या निकालाशी तुलना सुरू झाली आहे. खर्डा हे दलित अत्याचाराचे प्रकरण आहे. त्यात आरोपी निर्दोष सुटणे हे सरकारचे व सर्वच समाजाचे अपयश आहे. त्याचा दोष कुठल्या जातीला नको. कोपर्डी खटल्याचा निकाल हा कुठल्याही जातीचा विजय नाही, तसा कुठल्याही जातीचा पराभवदेखील नाही. कोपर्डीतील अत्याचार ही विकृती होती. न्यायालयाने तिला फाशीची वाट दाखवली. या व्यापक अर्थानेच या निकालाकडे पाहिले पाहिजे. न्यायमनानेच या निकालाचे स्वागत केले पाहिजे.