पठाणकोटचा धडा

By Admin | Published: January 5, 2016 12:09 AM2016-01-05T00:09:16+5:302016-01-05T00:09:16+5:30

पंतप्रधान मोदी यांच्या लाहोर भेटीमुळे भारत-पाक यांचे संबंध सुधारण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती प्रत्यक्षात येऊ नये, यासाठी दहशतवादी संघटना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार

Lesson Lesson | पठाणकोटचा धडा

पठाणकोटचा धडा

googlenewsNext

पंतप्रधान मोदी यांच्या लाहोर भेटीमुळे भारत-पाक यांचे संबंध सुधारण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती प्रत्यक्षात येऊ नये, यासाठी दहशतवादी संघटना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार, हे अपेक्षितच होते. त्यामुळे हवाई दलाच्या पठाणकोट तळावर दहशतवादी हल्ला झाला, त्याबद्दल आश्चर्य वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र या हल्ल्याला तोंड देताना भारतीय राज्यसंस्थेचा जो कमकुवतपणा दिसून आला आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रिया व सुरक्षा यंत्रणांची संरचना यांतील ज्या त्रुटी उघड होत आहेत, त्या निश्चितच अनपेक्षित होत्या. चर्चा कसली करता, असा सूर या हल्ल्यानंतर देशातून निघू लागला आहे. पण चर्चा करीत राहणे आवश्यकच आहे. जगभर जेथे जेथे असे संघर्ष सुरू असतात, तेथे चर्चा होतच असते. पण संघर्षात सहभागी असलेले परस्पर विरोधी देश निकराने लढतही असतात आणि त्यासाठी लागेल ती सर्व तयारी करीत राहिलेले असतात. अगदी व्हिएतनाम युद्धापासून ते सध्या गाजत असलेल्या सीरियातील संघर्षापर्यंत नुसती नजर टाकली, तरी हे स्पष्ट होते. व्हिएतनाम युद्धाचींंंंंं धुमश्चक्र ी उडालेली असताना अमेरिकेतर्फे हेन्री किसिंजर व उत्तर व्हिएतनामतर्फे ल-डक-थो पॅरिस येथे नियमितपणे चर्चा करीत राहिले होते. असाच प्रकार अमेरिका व सोविएत युनियन यांच्या शीतयुद्धाच्या काळात झाला होता. दोन्ही देश एकमेकाना नामोहरम करण्यासाठी सतत डावपेच लढवत असत. पण त्याचवेळी मध्यस्थांमार्फत चर्चाही करीत राहत. त्याचवेळी आपली लष्करी क्षमता वाढवत आणि जगभरातील इतर देश आपल्या पाठीशी कसे उभे राहतील, यासाठी रणनीतीही आखत राहत असत. आज सीरियातील संघर्ष इतका पराकोटीला गेला आहे, तरीही त्या देशाच्या प्रतिनिधींशी अमेरिका व इतर देश आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे चर्चा करीतच आहे. लक्षात घ्यायचा मुद्दा इतकाच की, अशी चर्चा करावीच लागते. पण चर्चा केली, म्हणजे सामर्थ्य व क्षमता वाढवत राहण्याला लगाम घालायचा किंवा आपली दक्षता वा सुरक्षा ढिली ठेवायची, असा होत नाही. नेमके येथेच आपण कमी पडत आलो आहोत. पठाणकोट हल्ल्याच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. होते आहे काय की, आपण फक्त वाचाळपणा करीत राहतो. भाषणे देत राहतो. शांततेची महती सांगत राहतो. पण शांतता हवी असेल व युद्ध नको असेल, तर तसे ते खेळावयास लावणाऱ्याला, ‘तुम्ही हरू शकता’, हे जाणवेल इतकी चोख तयारी करीत राहावे लागते. नुसते हवेत विरणारे शब्द काही कामी येत नाहीत. अटलबिहारी वाजपेयी लाहोरला बसने गेले. लगेच कारगील झाले. पाक सैन्याच्या तुकड्या कारगील भागात आल्याचे आपल्याला उशिराने कळले. मग कंदहारचे विमान अपहरण प्रकरण घडले. त्यावेळी सोडाव्या लागलेल्या मसूद अझर या दहशतवाद्याने स्थापन केलेल्या ‘जैश-ए--महमद’ या संघटनेनेच पठाणकोट येथे हल्ला केला आहे. पुढे संसदेवर हल्ला झाला. ‘अभी आर या पार की लढाई’, असे वाजपेयी यांनी जाहीर केले. मग मुंबईवर हल्ला झाला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची तीच भाषा व तसाच कमकुवत ढिला प्रतिसाद. आताही पठाणकोट येथे तेच घडत आहे. हल्ला होण्याआधी निदान २० तास दहशतवाद्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गाडी ताब्यात घेऊन त्याला व त्याच्या अंगरक्षकाला बांधून रस्त्यावर टाकून दिले होते आणि या अधिकाऱ्याच्या मित्राला सोबत नेऊन नंतर त्याचा गळा चिरून टाकला होता. हा मित्र जगला. पण ही माहिती त्याने व या अधिकाऱ्याने पोलिसांना दिली, तरी त्यावर सुरूवातीस विश्वास ठेवण्यात आला नाही; कारण म्हणे पंजाब पोलिसात तो अधिकारी रंगेल म्हणून ओळखला जातो. शिवाय दहशतवादी जेथून आले, तो भाग अमली पदर्थांच्या तस्करीचा म्हणून ओळखला जातो. पंजाबातील अनेक मंत्री व अकाली दलाचे नेते या तस्करीत अडकले असल्याचे आरोप सतत होत आले आहेत. या गोष्टी महत्वाच्या आहेत; कारण कायदा व सुव्यवस्था ही असे हल्ले रोखण्याची पूर्वअट असते. तीच जर पुरी होत नसेल, तर आपल्या सर्व सुरक्षा उपायात मोठीच त्रुटी राहणार. हल्ला हवाईदलाच्या तळावर झाला. पण ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’चे (एनएसजी) कमांडो पथक पाठवण्यात आले. वस्तुत: हे सगळे ‘आॅपरेशन’ लष्कराच्या हाती द्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे पंजाब पोलीस, एनएसजी आणि लष्कर व हवाईदल अशा चार यंत्रणा सुसूत्रतेच्या अभावात हल्ल्याला तोंड देत राहिल्या. त्यामुळे दहशतवादी किती होते, ते सर्व मारले गेले काय, येथपासून ते किती जवान व अधिकारी शहीद वा जखमी झाले, येथपर्यंत तपशील व माहिती यात गोंधळ उडत गेला. त्यात देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह काही ‘ट्विट’ करीत होते आणि इतर सरकारी यंत्रणा आणखी काही सांगत होत्या. इतका सगळा घोळ झाल्यावर दहशतवाद्यांना निपटण्यास वेळ लागत गेला, हे ओघानेच येते. शांततेसाठी युद्ध खेळण्याचे सामर्थ्य मिळवावे लागते आणि समाजमनाचीही त्यासाठी योग्य ती मशागत करावी लागते, हाच धडा पठाणकोट हल्ल्याने पुन्हा एकदा दिला आहे. तो आपण जितक्या लवकर अंगी बाणवू तेवढा पोकळ शब्दांपलीकडचा खरा ‘करारा’ जबाब पाकला आपण देऊ शकू.

Web Title: Lesson Lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.