घरमालकांना धडा

By Admin | Published: May 12, 2016 02:43 AM2016-05-12T02:43:14+5:302016-05-12T02:43:14+5:30

विश्वासाच्या बळावरच आजवर अनेक व्यवहार होत आले आहेत. परंतु त्या विश्वासाला जेव्हा तडा जातो तेव्हा पश्चात्तापाशिवाय आपल्या हातात काहीच नसते.

Lessons to Homeowners | घरमालकांना धडा

घरमालकांना धडा

googlenewsNext

विश्वासाच्या बळावरच आजवर अनेक व्यवहार होत आले आहेत. परंतु त्या विश्वासाला जेव्हा तडा जातो तेव्हा पश्चात्तापाशिवाय आपल्या हातात काहीच नसते. अशा विश्वासघाताच्या अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. तरीही त्यातून धडा न घेता प्रत्येक घरमालक केवळ माणुसकीपोटी आणि आपल्याला दोन पैसे उत्पन्न मिळण्याच्या हेतूने घर भाड्याने देतात. कोणता माणूस सद्प्रवृत्तीचा आहे वा खलप्रवृत्तीचा हे त्याच्या कपाळी गोंदलेले नसते. तो आपली गरज भागविण्यापुरता मी किती गरजू आहे असेच भासवित असतो. परंतु त्याच्या भोळसर चेहऱ्यामागे नेमके काय दडलेले आहे हे प्रत्यक्ष अनुभव आल्यावाचून कळत नसते. मालकाची दिशाभूल करण्याचा प्रकार नागपूरमध्ये नुकताच घडला. सहकुटुंब निवाऱ्याच्या शोधार्थ आलेल्या गरजू माणसावर विश्वास दर्शवून एका मालकाने त्यास घर भाड्याने दिले. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यातच पोलीस त्याचा माग घेत त्या घरापुढे उभे ठाकले. तेव्हा पोलीस दाराशी आल्यावर त्या घरमालकाला धक्का बसणे स्वाभाविकच होते. आपण ज्याला भाडेकरू म्हणून ठेवले तो चक्क फरार गुन्हेगार असल्याने घरमालकावरच तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. या प्रकरणामुळे घर भाड्याने देताना अतिदक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण ज्याला भाड्याने घर देत आहोत तो इसम कुठला आहे, त्याचा व्यवसाय काय, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय इतकी माहिती तर बहुतांशी घरमालक घेतातच; पण बऱ्याच गोष्टींची शहानिशा करीत नाहीत म्हणून कालांतराने पश्चात्तापाची वेळ येते. सध्या तर नोकरी मिळणे सोपे पण घर भाड्याने मिळणे मुश्किलीचे झाले आहे. नागपूर येथील या घटनेने आता कोणताच घरमालक हातात बेड्या पडण्याच्या भीतीने कोणालाही घर भाड्याने द्यायला धजावणार नाही. कोणत्याही भाडेकरूची कितीही शहानिशा केली आणि माणूस कितीही सद्वर्तनी दिसत असला तरी भविष्यात त्याच्या मनात वाईट विचार डोकावणार नाही याची हमी कोणालाच देता येत नाही. या जर-तरच्या गोष्टी असल्या तरी नागपूर येथील घटनेच्या निमित्ताने प्रत्येक घरमालकापुढे आता नव्याने डोकेदुखी उभी राहिली आहे, हे मात्र खरे.

Web Title: Lessons to Homeowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.