दीप्तेशच्या ‘हॅकिंग’ने शिकवलेला धडा!
By Admin | Published: July 6, 2017 09:03 AM2017-07-06T09:03:43+5:302017-07-06T09:03:43+5:30
कोणतीही बाब मोफत वा सहजासहजी उपलब्ध झाली की तिची ‘किंमत’ राहात नाही, असे नेहमी म्हटले जाते. आता काळानुरूप त्यात किंचितसा बदल करायला हवा.
- किरण अग्रवाल
कोणतीही बाब मोफत वा सहजासहजी उपलब्ध झाली की तिची ‘किंमत’ राहात नाही, असे नेहमी म्हटले जाते. आता काळानुरूप त्यात किंचितसा बदल करायला हवा. कारण, सहज हाताळता येणाऱ्या तंत्राचा गैरवापर केला गेला तर त्याची मोठी ‘किंमत’ चुकवावी लागण्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. यात ‘किंमत’ हा फॅक्टर कॉमन असला तरी, एकात त्याचे मोल नसल्याचा अर्थ गृहीत आहे, तर दुसऱ्यात तो बऱ्या-वाईट परिणामांच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. मोबाइल चॅटिंग व व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या माध्यमातून ‘नसते’ उद्योग करून बसलेल्या राजस्थानातील दीप्तेश सालेचा या तरुणावर दुसऱ्या संदर्भाने अशीच किंमत मोजण्याची वेळ आली आहे.
तरुणाई हल्ली ‘मोबाइल’मध्ये गुंतली आहे. घरी असो, दारी असो, शाळा-महाविद्यालयात असो, की नोकरी-धंद्याच्या ठिकाणी; प्रत्येकजण ‘मोबाइल’मध्ये डोके घालून बसलेला आढळून येतो. मोबाइल वेडाची उपमा देता यावी, इतके वा असे तरुणांचे गुरफटलेपण त्यातून आकारास आले आहे. तरुणांचेच काय, रांगता न येणारी बाळं जेव्हा मोबाइल खेळताना दिसतात, तेव्हा त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलण्याची जणू अहमहमिकाच त्यांच्या माता-पित्यात वा आजी-आजोबात लागलेलीही दिसून येते, इतका काळ गतीने पुढे सरकला आहे. अर्थातच, ही ‘गती’मानता राखण्यासाठी, ती अधिकाधिक ग्राहकात बिंबवण्यापासून जोपासण्याची पराकाष्ठा संबंधित कंपन्यांकडून केली जाणे स्वाभाविक आहे, कारण तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. त्यातूनच त्यांच्यात स्पर्धा होऊन कमीत कमी किमतीत नेट, डाटा अगर ‘वाय-फाय’सारख्या बाबी उपलब्ध करून देण्याची होड लागली आहे. या कमी किमतीत व प्रसंगी मोफतही मिळणाऱ्या सदर सेवांच्या आहारी जाणारी पिढी फावल्या वेळेतच काय, कामाच्या वा शिक्षणाच्याही वेळेत मोबाइल खेळताना नसत्या उपद्व्यापात अडकली की मग ‘किमती’ने कमी असलेली ही सेवा किती जबर ‘किंमत’ मोजायला कारणीभूत ठरते हेच दीप्तेशच्या प्रकरणावरून लक्षात घेता यावे.
(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)