स्वातंत्र्याची धग आपल्या धमन्यांतून वाहू द्या!

By विजय दर्डा | Published: March 15, 2021 03:02 AM2021-03-15T03:02:41+5:302021-03-15T06:50:28+5:30

भारताने जगातील पन्नासपेक्षा अधिक देशांना शांती आणि अहिंसेच्या मार्गाने आपले स्वातंत्र्य प्राप्त करण्याची प्रेरणा  व संघर्षाची दीक्षा दिली, हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे पृथक महत्त्व. आफ्रिकेतील अनेक देशांनी याच मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळवले.

Let the cloud of freedom flow through your arteries! | स्वातंत्र्याची धग आपल्या धमन्यांतून वाहू द्या!

स्वातंत्र्याची धग आपल्या धमन्यांतून वाहू द्या!

googlenewsNext

 विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

स्वातंत्र्याहून मोठे सौभाग्य असूच शकत नाही! भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या स्वातंत्र्याचे मोल आपल्याला कळायला हवे! 
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिवसाला ७५ सप्ताहांचा अवकाश असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती येथून सोहळ्याचा शुभारंभ केला. १९३० च्या दांडी यात्रेच्या स्मृती जागवत दुसरी एक दांडी यात्रा ३८६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी निघालेली आहे. ७५ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर हा महोत्सव १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालेल.

भारताने जगातील पन्नासपेक्षा अधिक देशांना शांती आणि अहिंसेच्या मार्गाने आपले स्वातंत्र्य प्राप्त करण्याची प्रेरणा  व संघर्षाची दीक्षा दिली, हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे पृथक महत्त्व. आफ्रिकेतील अनेक देशांनी याच मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळवले. दुर्दैवाने आजही अनेक देश परवशतेच्या पाशात अडकलेले आहेत. स्वातंत्र्यासाठीची आस उत्कटतेने प्रकट करणारे एका तिबेटी पत्रकाराचे कथन मी एका विदेशी वृत्तपत्रात वाचले आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. ऑलिम्पिकचे वृत्तांकन करणाऱ्या त्या पत्रकाराने लिहिले होते, ‘जगभरातील संघ आपल्या देशांचे ध्वज मिरवत समोरून निघाले आहेत. त्या त्या देशातील लोक टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करताहेत. टाळ्या मलाही वाजवाव्याशा वाटतात, पण कशा वाजवू? कुणासाठी वाजवू? माझा देश यात कुठेच नाही !’ 

खरेच, स्वातंत्र्य नसेल तर काय उरते हाताशी? आपल्या देशात बसून  स्वातंत्र्य ही किती मौल्यवान चीज आहे याचा अंदाज आपल्याला येत नाही, कारण आपण कधी स्वातंत्र्यसंग्रामात भागच घेतला नाही. जेव्हा मी चीनमध्ये प्रवास केला, पोलंडमध्ये गेलो, रशियात फिरलो;   तेव्हा  स्वातंत्र्य म्हणजे काय असते, याचा खरा पडताळा मला आला. त्या देशांत स्वातंत्र्य दूरच राहिले, तिथल्या जनतेच्या दैनंदिन जीवनातील सुख-सु‌विधाही नियंत्रित असतात. स्वातंत्र्याची अनुभूती घेण्यासाठी चिनी लोक हॉंगकॉंग, अमेरिका वा अन्य देशांची सफर करतात. रशियन लोक जिथे कुठे जातात, तेथेही त्यांच्या देशातल्या गुप्तहेर यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. एकाधिकारशाही असलेल्या देशात जनतेला पाण्याविना मासोळीसारखे तडफडत जगावे लागते. त्यांच्या कोशात एकच शब्द असतो- येस सर! आपल्या हुकूमशहा सरकारांसमोर आपले म्हणणेही कुणी मांडू शकत नाहीत.  म्यानमारमध्ये  तीस वर्षांच्या संघर्षानंतर सैन्याच्या हुकूमशाहीतून अर्धवट मुक्तता मिळाली खरी; पण सैन्याने पुन्हा सत्ता हाती घेतली आहे.  जनतेला पुन्हा संघर्ष करावा लागतो आहे. आपला शेजारी पाकिस्तानातली जनता लोकशाहीसाठी तळमळते आहे, आसुसलेली आहे. आपण भारतात असतो तर.. असा विचार ते करताहेत. आपल्यापाशी घामाकष्टांचा पैसा असणे आणि चोरीचे धन असणे यातला फरक किंवा स्वत:चे घर असणे आणि कुणा दुसऱ्याच्या घरात राहणे यात जो फरक असतो, तोच इथेही आहे.... स्वातंत्र्याला पर्याय नसतो! 

माझे बाबूजी जवाहरलाल दर्डा स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्याकडून मी स्वातंत्र्यलढ्यातल्या अनेक कहाण्या ऐकल्या, येणाऱ्या पिढ्यांनी गुलामगिरीत दिवस कंठू नयेत म्हणून लोकांनी आपल्या प्राणांची कशी आहुती दिली हे बाबूजी नेहमी सांगत  असत. मुळात आज आपल्याकडे जे काही आहे ते स्वातंत्र्यानेच आपल्याला दिलेले आहे. स्वातंत्र्य नसते तर तोंड उघडून बोलण्याचा अधिकारही आपल्याला नसता. आपल्याला ल्यायला कपडे नाहीत, रहायला घर नाही, खायला भाकरी नाही, बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, लिहिण्याची मोकळीक नाही आणि विरोध करण्याचाही अधिकार नाही; असे आपण उघडपणे म्हणू शकलो असतो का?  गुलामगिरीत असले अधिकार मिळत नसतात! ते स्वातंत्र्याच्या आसपासच वसत असतात.

...आणि, गांधीजींनी काय केले म्हणून विचारणारे आपल्यात आहेत, पंडित नेहरूंनी काय केले असेही लोक विचारतात, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी काय केले, हाही त्यांचा सवाल असतो. या प्रश्नांचे सुंदर उत्तर अटलबिहारी वाजपेयींनी दिले आहे. ते म्हणाले होते, ‘ सर्व काही आपणच करतो आहोत, असे जर कुणाला वाटत असेल तर ते असत्य आहे!’ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि त्यानंतर हा देश घडवण्यासाठी ज्यांनी आपली आहुती दिली त्यात सगळ्याच लोकांचे योगदान आहे. त्यात नेहरूंपासून अटलजी आणि आता मोदींचाही समावेश होतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  विकासाच्या मार्गाने आपल्याला घेऊन जाणाऱ्या प्रत्येक नेत्याचे- मग तो कोणत्याही पक्षाचा असो- ऋण आपल्याला मान्य करावेच लागेल. या तथ्याची मोडतोड करून विपर्यास आणि अपप्रचार होता कामा नये.   कोणत्याही राष्ट्राचा पाया सत्य, सभ्यता, संस्कृती आणि निष्ठेवर उभा असणे आवश्यक आहे. त्यात कोणत्याही प्रकारची मोडतोड करणे कोणत्याच संस्कृतीला मान्य नसते.

काँग्रेसने काय केले, असा प्रश्नही लोक करतात.  राजकीय पक्ष संपले पाहिजेत किंवा राजकीय मतप्रदर्शन बंद व्हावे असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वा अटलबिहारी वाजपेयी यांचा सिद्धांत कधीच नव्हता.    खुद्द पंडित नेहरू विरोधकांना निवडून आणायचे, असा काळ या देशाने पाहिलेला आहे.  लोकशाही जीवंत राहण्यासाठी विरोधी पक्ष अत्यावश्यक असल्याचे त्यांना पटले होते.  तुम्ही जरूर मंदिरे उभारा; पण या देशात मंदिरांत जायचा जितका हक्क हिंदूंना आहे तितकाच हक्क स्तुपात जाणाऱ्या बौद्धांना, गुरुद्वारात जाणाऱ्या शिखांना, मशिदीत जाणाऱ्या मुसलमानांना, चर्चमध्ये जाणाऱ्या ख्रिश्चनांना आणि जिनालयात जाणाऱ्या जैनांनाही आहे. भारतीय म्हणून त्यांना लाभलेल्या या हक्काचा संख्येशी काहीच संबंध नाही. 

विविधतेतली एकता हीच तर आपली खरी शक्ती. इतका मोठा देश, इतक्या सगळ्या भाषा, इतके विभिन्न रितीरिवाज तरीही देश एकसंध! या एकतेला छेद देऊ पाहणाऱ्या कट्टरपंथी शक्तींचा उदय होताना दिसतो, तेव्हा वाटते, यांना  चिरडण्यात विलंब लागला तर? सर्वकाही गमावल्यानंतर शुद्धीवर येण्याने काय हाती येईल? मित्रानो, विविधतेत असलेल्या एकतेतली ही ताकद आपण समजून घ्यायला हवी. आपण आतून कमजोर झालो तर शत्रूला संधी मिळेल. आपण ती संधी का म्हणून द्यायची? आणि हो, स्वातंत्र्याची धग आपल्या धमन्यांतून वाहू द्या, जय हिंद!
vijaydarda@lokmat.com
 

Web Title: Let the cloud of freedom flow through your arteries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.