अमृत महोत्सवी वर्ष: स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या घरावरही तळपू द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 01:15 PM2022-08-14T13:15:45+5:302022-08-14T13:16:29+5:30
शेतकरी आत्महत्या कितीही वाईट असली तरी त्या मागील भावना किंवा समाज काय म्हणेल ही आत्मीयता फार मोलाची आहे. लाखो, कोटी रुपये बुडवून युरोपच्या बारमध्ये बसून पेग रिचविणारे ते नाहीत. याची तरी नोंद घ्यायला हवी.
वसंत भोसले
भ्रष्ट व्यवस्था अधिक बळकट करण्याचे कटकारस्थान करणारे हर घर तिरंगा लावण्याचे आवाहन करीत आहेत. हेतू शुद्ध असेल तर वर्तन अशुद्ध कसे? हा लाखमोलाचा सवाल उपस्थित होतो. तरीदेखील स्वातंत्र्याचा आदर्श ही आपली परंपरा आहे. भ्रष्ट व्यवस्थेची नाही. हा काळही जाईल, अनेक लोक उभे राहतील. शेतकरी आत्महत्या कितीही वाईट असली तरी त्या मागील भावना किंवा समाज काय म्हणेल ही आत्मीयता फार मोलाची आहे. लाखो, कोटी रुपये बुडवून युरोपच्या बारमध्ये बसून पेग रिचविणारे ते नाहीत. याची तरी नोंद घ्यायला हवी.
पंच्याहत्तर वर्षांनंतर तरी स्वातंत्र्याची सूर्यकिरणे दूरवर गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचली का, असा लाखमोलाचा सवाल अनेक विचारवंत वक्ते आपल्या भाषणात कडाकडा टाळ्या घेत करतात. टाळ्या थांबल्या की, श्रोत्यांना वाटतं की, ही सोनपावलांची सूर्याची कोवळी किरणे आमच्या घरात राहू द्या, घरावर तरी कशी पडतील, हे हा विचारवंत पुढे सांगेल. पण काही सांगतच नाही. चोहोबाजूने भ्रष्टाचाराच्या काळ्या ढगांनी वेढले असताना ती स्वातंत्र्याची सोनकिरणे तुमच्या-आमच्या झोपडीपर्यंत पोहोचणार कशी? परवाचा शपथविधी टी.व्ही. चॅनेलवर पाहत असताना दीड डझनापैकी एकासाठी तरी टाळ्या वाजवाव्यात असे वाटले का? हा सवाल स्वत:लाच विचारुन पहा. हा भाजपचा, मूळचा राष्ट्रवादीचा होता. हा शिंदे गटाचा मूळचा भाजपचा होता. त्याला एका प्रकरणात पकडला गेला होता. तो पक्षांतराने शुद्ध झाला. अशीच भावना मना-मनांमध्ये तुमच्या-आमच्या उमटत असणार याची खात्री आहे. हा सर्व विरोधाभास एक प्रतीकात्मक उदाहरणाने मांडून पहा. कारण महाराष्ट्रातील बारा कोटी जनता मानते की, सुरतचा बाजार कसा होता? गुवाहाटीचा सौदा कसा झाला ? आणि त्याचा आनंद गोव्यात कसा लुटला? येवढ्या मलिद्यानंतरही मुंबईत आल्यावर अजून गुर्रगुर्रने चालू आहे. ठाकरे सरकार उलथून टाकण्याचे सामर्थ्य आत्मसात करणारे बाहुबली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या सौदेबाजांना शांत करता येईना.
अशा सत्तांतराची पावले एक-दोन नव्हे, अनेक पडत आली आहेत. त्याचे आपण साक्षीदार आणि आता भागीदारही होत आलो आहोत. जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या सूर्याच्या किरणांच्या उबेची अपेक्षा करतो तेव्हा आपलीदेखील काही जबाबदारी येते. जेवणावळी आणि दारु, पैसा वाटून निवडून येणाऱ्यांविषयी तिरस्कार वाटण्याऐवजी हे घेणाऱ्यांची चूक आपण ओळखतच नाही. एखाद्याने पैसा वाटप केला,असा प्रचार जरी झाला तर त्याचा मतदारांनी पराभव करायला हवा. ऑपरेशन लोटस नावाची नवी सत्तांतर चळवळ (आपल्याला राष्ट्रीय चळवळ, शेतकरी चळवळ किंवा स्वातंत्र्य चळवळ एवढीच माहीत होती.) भाजपने विविध राज्यांत सुरू केली. फोडाफोडीच्या राजकारणाचा तिरस्कार आपण काळ्याकुट्ट घरात बसून करणार नाही आणि यासाठी पक्षांतर करून पुन्हा समोर आलेल्यालाच पुन्हा मतांचे दान करून टाकणार ! वास्तविक मताचा अधिकार वापरून अशांना घरी बसविण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळालेली असते. पक्षांतर केल्याचे मतदाराला आवडत नाही, असा संदेश एकदा का गेला तर आयुष्यात पुन्हा पक्षांतर हा शब्दही उच्चारणार नाहीत. एवढे मतदारांच्या पुढे नतमस्तक असतात. आपणही ताकदवार असतो. याची जाणीवच नाही. संभाजीराजे आणि लोकांना गृहीत धरणारे उदयनराजेंना मागील दाराने संसदेत जावे लागले ही ताकद तुम्हा (मतदारांची) होती. आपण मताचा अधिकार नीट वापरतो कोठे? मताचे दान करून टाकतो. एखाद्या देवाला गाय दान दिल्यावर त्या बिचारीचे काय हाल होतात, याची जाणीव कोठे असते? ती कचरा खाऊन जगते. तिच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या ! तसाच हा प्रकार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हे सर्व काही घडत होते. हर घर तिरंगा उभा करायचा. मात्र, त्या तिरंग्याचा उद्देश, इतिहास, आदर, परंपरा याची काही जाणीव कोणी करून देणार नाही. कारण तो आपणही फडकविणार, तसा तो यवतमाळमध्ये मंत्रीमहोदय देखील फडकविणार! केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगातील ती शक्ती-भक्ती आणि निसर्गाची उर्जा उलगडून सांगणारी उक्ती आपणास प्रेरणा देणारी आहे. सुख, समाधान, भाईचारा आणि शांतीची प्रेरणा देणारा संदेश घेऊन अशोकचक्र फडफडते आहे. त्या पंधरा ऑगस्टच्या रात्री नियतीशी केलेल्या कराराचा संबंध आजही आहे. म्हणून ते पंडित होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्याचा उल्लेख करून उद्याची पहाट ही तुमची-आमची असणार असाच संदेश दिला होता. त्याहून अधिक स्पष्ट शब्दांत भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद करून ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना स्वीकारल्यावर केलेल्या समाराेपाच्या भाषणात म्हटले होते, “राजकीय समता-स्वातंत्र्य देण्याची तरतूद या घटनेच्या पाना-पानांत आहे. मात्र, सामाजिक आणि आर्थिक समता-स्वातंत्र्य देण्याचे निर्णय या राजकीय स्वातंत्र्यातून समोर आलेल्या सत्तेने घेतले नाहीत तर हे स्वातंत्र्य व्यर्थ जाईल.” बाबासाहेब आंबेडकर यांचा हा इशारा केवळ निवडून येऊन सत्तासंपादन करण्यापुरता नव्हता. त्या राजकीय स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी त्याचा संबंध आहे. जात, पात, पंथ, धार्मिक ध्रुवीकरण, आदी साऱ्याचा वापर करून सत्ता हस्तगत करता येते. याला पक्ष किंवा नेते कारणीभूत नाहीत. आपण मताचे दान देणारे कारणीभूत आहोत.
भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा इतिहासच सूर्यप्रकाशाएवढा प्रखर आहे की, त्यातून अंधार हद्दपार झालाच पाहिजे. त्यासाठी आपण साऱ्यांनी पुन्हा एकदा त्या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. महात्मा गांधी, भगतसिंग, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी, मौलाना आझाद अशा स्वातंत्र्यलढ्यातील हजारो सेनानींना नव्याने समजून घेतले पाहिजे. हा सर्व उपद्व्याप करण्याऐवजी देश सोडून निघून जाण्याची टूमही निघाली आहे. त्यात त्यांचा दोष नाही. त्यांना या व्यवस्थेशी लढाई करायची नाही. यात बदल होणार नाही, असे त्यांना ठाम वाटते आहे. कारण देवस्थानाच्या दानपेटीपर्यंत भ्रष्टाचार पोहोचला आहे. तो संरक्षण दलाच्या सामग्रीपर्यंत गेला आहे. मुलांच्या मध्यान्ह भोजनापर्यंत सापडतो आहे. चिक्कीसुद्धा सोडली नाही, असे म्हणतात. हा सर्व गैरव्यवहार राज्यकर्त्यांपर्यंत सीमित नाही. पैसा असणाऱ्या, उद्योग करणाऱ्या वर्गापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना अकरा लाख कोटी रुपयांच्या चुन्याच्या खाईत लोटून त्यापैकी बरेचजण पळूनही गेले. हा सुंदर देश सोडूनही गेले. स्वामी विवेकानंदांची, छत्रपती शिवरायांची, महात्मा गांधी, आणि पार मागे गेलो तर प्रभू रामचंद्रांची भूमी म्हणतो. तिचा त्याग करताना एकाक्षणाचाही त्यांनी विचार केला नाही. आपला शेतकरी हजार-लाखासाठी स्वत:च्या आयुष्याला फास लावून घेतो आहे. त्यालाच अब्रू, प्रतिष्ठा, सामाजिक बंधनाची भीती आहे आणि आपण जगण्यास लायक नाही, असे वाटते आहे.
आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्यलढ्यातील आदर्श मूल्यांचा आग्रह धरत नवा समाज उभा करण्यासाठी राष्ट्रीय आंदोलन उभे करावे लागणार आहे. पन्नास कोटींच्या बाता मारून पक्षांतर करणाऱ्या किंवा पक्ष बदलून सरकार बदलण्यासाठी मदत करणाऱ्यांचा पराभव करण्यासाठी मताचा अधिकार वापरला पाहिजे. त्यांना एकदा भीती वाटली की, आपल्या आड येणार नाहीत. समाजाला जे आवडत नाही, ते नेते करीत नाहीत. कारण ते अभिनेते असतात. पटकथा-संवाद लिहून देणाऱ्याचे वाचन करतात. भ्रष्ट माणसांना जवळ करणार नाही, असा आपण निर्धार केला पाहिजे. एका जिल्हाधिकारी कार्यालयात एका अधिकाऱ्याने एजंट नेमला होता. त्यांच्यात मारामारी झाली. एजंटाने या कार्यालयात अधिकाऱ्याच्या डोक्यात त्याचीच खुर्ची घातली. अधिकाऱ्यास सहा टाके पडले. तरी पोलिसांत तक्रार नाही केली. सारे चोरीचे प्रकरण ! हे सर्व आपल्या आजूबाजूला घडते आहे. आपण काही करू शकत नाही, असे म्हणून चालणार नाही. आवाज तरी दिला पाहिजे.
हा देश तेहतीस कोटी देवांचा आहे, असे म्हटले जाते. दररोज एक राशी असतेच. काही ना काही शुभ-अशुभाचा हिशेब मांडला जातोच. पूजा-अर्चाने दिवस सुरू होतो. दुष्टाचा नायनाटच होतो, अशीदेखील श्रद्धा आहे. तरीदेखील जवळपास प्रत्येक टेबलाखालून व्यवहार होतातच. भिंतीवर लावलेल्या देव-देवतांच्या प्रतिमांनाही कोण घाबरत नाही. देव-धर्म मानणाऱ्या एवढ्या मोठ्या समूहात सद्भावनेचा वास का दिसत नाही. देव-धर्माचा आदर्श बाळगणारे आणि कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आजूबाजूला सुळसुळाट असताना भ्रष्टाचाराची दुर्गंधी कशी वाहत असावी? शिवरायांचे नाव घेऊन सत्ताग्रहण करणारे फितूर कसे होऊ शकतात? हा सर्व विचार करण्याचे कारण अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन आहे. पंच्याहत्तर वर्षांतही दु:ख, दारिद्रय, भ्रष्टाचार, गरिबी, फसवाफसवी संपत नाही. सत्तेवर असणारेच भ्रष्ट वागणारेच असतात. त्यांना सत्तेवर येण्यासाठीचे शिक्षण देशातील उत्तम शिक्षण संस्था, व्यवस्थाच निर्माण करीत असते. पार्थ चटर्जीपासून शशिकलापर्यंत सारे एकजात एकाच माळेचे मणी आहेत. हीच संस्कृती एका मागून एक राज्ये पादाक्रांत करून भ्रष्ट व्यवस्था अधिक बळकट करण्याचे कटकारस्थान करणारे हर घर तिरंगा लावण्याचे आवाहन करीत आहेत. हेतू शुद्ध असेल तर वर्तन अशुद्ध कसे? हा लाखमोलाचा सवाल उपस्थित होतो. तरीदेखील तो स्वातंत्र्याचा आदर्श ही आपली परंपरा आहे. भ्रष्ट व्यवस्थेची नाही. हा काळही जाईल, अनेक लोक उभे राहतील. शेतकरी आत्महत्या कितीही वाईट असली तरी त्या मागील भावना किंवा समाज काय म्हणेल ही आत्मीयता फार मोलाची आहे. लाखो, कोटी रुपये बुडवून युरोपच्या बारमध्ये बसून पेग रिचविणारे ते नाहीत. याची तरी नोंद घ्यायला हवी. मुलांना शाळेला पाठविण्यासाठी पातेल्यांचा वापर करून नदी ओलांडणारे पालकही या देशाचे नागरिक आहेत. त्यांच्यासाठी अश्रू ढाळू नका, निर्धार करा की, त्या मुलांना पुलावरून जाता येईल आणि शिक्षण घेता येईल. केवळ समृद्धी मार्ग म्हणजेच विकास नाही, हे पण समजून घेऊ या !
आपल्याला फार मोठा पडाव पार करायचा आहे. मोठी आशा निर्माण करणे आणि ती विसरून जाणे त्यांना सोपे जाते, कारण आपण भावनिक आवाहनाचे, खोट्या भीतीचे शिकार होतो आणि विसरभोळे तर प्रचंड आहोत. त्यामुळे राजकारणी मंडळी आणि गैरमार्गाने देशाला लुटणाऱ्यांची ती जमेची बाजू ठरते आहे. अजून वेळ गेलेली नाही. आपणास आता कळू लागले आहे. जग बदलते आहे. आपण बदलू आणि ही व्यवस्थाही ! आता स्वतःपासून सुरुवात करु!
(लेखक लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)