Surya Grahan 2019 : दृष्टिकोन - रहस्य जाणून झुगारूया कंकणाकृती सूर्यग्रहणाची बंधने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 03:37 AM2019-12-26T03:37:35+5:302019-12-26T07:48:14+5:30
Surya Grahan 2019 Time : २६ डिसेंबरच्या कंकणाकृती सूर्यग्रहणाने सकाळी ८.०४ पासून (स्पर्श) आकाशाच्या विशाल
किरण गवळी
सुमारे नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतातून २६ डिसेंबर २०१९ रोजी ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ पाहण्याची संधी मिळत आहे. १६ फेब्रुवारी १९८०, २४ आॅक्टोबर १९९५, ११ ऑगस्ट १९९९, २२ जुलै २००९ रोजी काही भागांतून खग्रास सूर्यग्रहण स्पष्ट दिसले, तर काही भागांतून ढगाळ वातावरणामुळे अस्पष्ट व अजिबात दिसले नव्हते. १५ जानेवारी २०१० रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण कन्याकुमारी, थिरूवनंतपुरम व रामेश्वरम या भागांतून दिसले होते. ११ आॅगस्ट १९९९ रोजी गुजरातमधील भाचाऊ व २२ जुलै २००९ रोजी वाराणसी येथे जाऊन खग्रास सूर्यग्रहण तसेच १५ जानेवारी २०१० रोजी थिरूवनंतपुरम येथे जाऊन मी कंकणाकृती ग्रहणांचे निरीक्षण केले. त्यानंतर नऊ वर्षांनंतर म्हणजे २६ डिसेंबर २०१९ रोजी दक्षिण भारतातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.
पडद्यावर चंद्र-सूर्यामधील लपंडावाचा महासोहळा चालू होईल. त्याचे ‘मध्यांतर’ म्हणजे चंद्राने सूर्याला जास्तीतजास्त झाकण्याची अवस्था सकाळी ९.२२ ला, तर शेवट (मोक्ष) सकाळी १०.५५ ला होणार आहे. हा खेळ सावल्यांचा दोन तास ५१ मिनिटे रंगणार आहे. सांगली, कोल्हापूरमधून हे ग्रहण ८४ टक्क्यांपर्यंत दिसेल. केरळ, कर्नाटक व तामिळनाडूतील काही भागांमधून ते पूर्णत: दिसेल. उर्वरित भारताच्या ग्रहणपट्ट्याच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील भागांतून मात्र ते ‘खंडग्रास’ दिसणार आहे. सौदी अरेबिया, कतार, दक्षिण भारत व इंडोनेशिया येथील भूप्रदेशावरून ११८ रुंदीचा प्रतिछायेचा पट्टा जात असल्याने येथून सूर्यबिंब कंकणाकृती दिसेल. सूर्यग्रहणासाठी अमावास्येची तिथी (सूर्य-पृथ्वीच्या मध्ये चंद्र अशी स्थिती); शिवाय तीनही आकाशस्थ गोल सरळ रेषेत येणे गरजेचे असते. पृथ्वी-चंद्र हे गोल स्वयंप्रकाशित नसल्याने, सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या मोठ्या सावल्या अंतराळात सदोदित पडलेल्या असतात. जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, तेव्हा गडद सावलीच्या पट्ट्यातील लोकांना चंद्रबिंबाच्या आड सूर्य पूर्ण झाकलेला (खग्रास) दिसतो; तर विरळ पट्ट्यातून त्याचा काही भागच ग्रासलेला (खंडग्रास) दिसतो.
चंद्र पृथ्वीपासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावास्येची तिथी व हे तीनही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण’ घडते; पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. या खगोलीय घटनेस ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात.
‘खग्रास’ व ‘खंडग्रास’ असे चंद्रग्रहणाचे दोन प्रकार असतात आणि खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती असे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार. पृथ्वी आणि सूर्यामध्ये चंद्र आला तर ‘सूर्यग्रहण’ घडते. चंद्र पृथ्वीपासून जवळ असेल तर ‘खग्रास’ सूर्यग्रहण घडते व चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ घडते. चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी जर सरळ रेषेत आली, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडून ‘चंद्रग्रहण’ घडते. चंद्राचा प्रकाश शीतल असल्याने चंद्रग्रहण थेट पाहिले तर डोळ्यांचे नुकसान होत नाही. दर अमावास्येला ‘सूर्यग्रहण’ घडत नाही आणि दर पौर्णिमेला ‘चंद्रग्रहण’ घडत नाही. सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण, कोणत्याही ग्रहणात अज्ञानापोटी व भीतीपोटी वेध पाळण्याची गरज नाही व धार्मिक विधीचीही गरज नाही. हल्लीच्या काळात ग्रहण व कुंडलीच्या गैरसमजुतींबाबत प्रबोधनाची गरज आहे. गेल्या ४०-५० वर्षांत एक्स-रे फिल्म व इलेक्ट्रिक वेल्डिंगची काच यांचा वापर काही हौशी सूर्यग्रहण निरीक्षकांनी केला होता; परंतु ही उपकरणेसुद्धा धोक्याची आहेत. अलीकडे सौरचष्मे मिळतात. सौरचष्मे कागदी पुठ्ठ्यांचे असतात व काचेच्या ठिकाणी उच्च दर्जाची संशोधित व पूर्णत: सुरक्षित मायलर फिल्म बसविलेली असते, असे सौरचष्मे वापरावेत. सौरचष्मे उपलब्ध नसल्यास एक रुपयाच्या नाण्याएवढ्या आकाराच्या आरशाच्या तुकड्याच्या साहाय्याने घरातील भिंतीवर सूर्याचे प्रतिबिंब घेऊन भिंतीवरील ग्रहण काळातील सूर्याची प्रतिमा पाहावी.
कंकणाकृती सूर्यग्रहण अंतराळात खूप दूरवर घडणार आहे. सुमारे ३,८४ लाख कि.मी.वरील चंद्राच्या आड १५ कोटी कि.मी.वरील सूर्य अत्यल्पकाळ झाकला जाणार आहे. यापुढे असा आविष्कार १५ वर्षांनंतर म्हणजे २०३४ मध्ये घडणार आहे; त्यामुळे २६ डिसेंबरच्या ‘कंकणाकृती सूर्यग्रहणा’वेळी दिशाभूल करणारी बंधने झुगारण्यासाठी सर्वांनी अन्न, पाणी ग्रहण करता-करता ज्ञान ग्रहण करण्यासाठी ‘सूर्यग्रहणा’चे निरीक्षण व अभ्यास सामुदायिकरीत्या करावा.
( लेखक खगोल अभ्यासक आहेत )