ही लाट शेवटची ठरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 11:27 AM2022-01-11T11:27:20+5:302022-01-11T11:27:29+5:30

सार्वजनिक वावरावर मर्यादा आणल्या. सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयांच्या कामकाजाबाबत नियमावली लागू झाली.

Let this wave be the last | ही लाट शेवटची ठरो

ही लाट शेवटची ठरो

Next

नवे वर्ष नव्या आशा, नवी स्वप्ने मनाशी धरून सुरू झाले. मात्र, ओमायक्रॉनमुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत असल्याने नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात नववी आणि दहावीचे वर्ग वगळता शाळा पुन्हा ऑनलाईन झाल्या. त्यानंतर महाविद्यालयेही १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन ठेवण्याचा निर्णय झाला. हे कमी म्हणून की काय, राज्यात रविवारपासून नवे निर्बंध लागू झाले. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली.

सार्वजनिक वावरावर मर्यादा आणल्या. सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयांच्या कामकाजाबाबत नियमावली लागू झाली. त्यात ब्यूटी सलून आणि जिम बंद ठेवण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त झाल्यानंतर ५० टक्के मर्यादांसह ते सुरू ठेवण्याचे सुधारित आदेश आले. एकूणच दोन वर्षांपूर्वीचे निर्बंध आणि कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार पुन्हा आपल्या डोक्यावर आली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नवे वर्ष काहीसे दिलासादायक ठरेल, ही आशा वर्षाच्या सुरुवातीला तरी खरी ठरताना दिसत नाही. त्यातच आरोग्य कर्मचारी, कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस दल, रेल्वे कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यातून सरकारी यंत्रणांवरचा ताण वाढणार आहे.

राज्यात सध्या चारशेहून अधिक डॉक्टर्स आणि पोलीस दलातील एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मंत्रालयातील ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. अनेक मंत्री व आमदारांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. संसदेतील ४०० कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट वेगाने येऊ घातली आहे, याचेच हे दिशादर्शन आहे. त्यातल्या त्यात  दिलासादायक बाब म्हणजे बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. रुग्णांचा पाच सहा दिवसांत अहवाल निगेटिव्ह येत आहे. मात्र, अनेक जण रुग्णालयात दाखल होण्यास तयार नसल्याने हे चित्र फसवेही असू शकते.

लसीकरणाला पुन्हा गती देण्यास सुरुवात झाली आहे. किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्य व फ्रंटलाईन कर्मचारी आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीची बुस्टर मात्रा सोमवारपासून देण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे दुसरा डोस घेण्यास बरेच नागरिक पुढे आलेले नाहीत. त्यातूनच मुंबईत अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांमध्ये लसीचा एकही डोस न घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे लसीकरणावर आपल्याला नव्या वर्षात अधिक भर द्यावा लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते ओमायक्रॉन फेब्रुवारीनंतर उतरणीला लागेल आणि ओमायक्रॉनबरोबर बहुदा कोरोनाची लाट ओसरेल. मात्र, ती पूर्णपणे जाईल, असे नाही. ओमायक्रॉनमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, त्याचा धोका पूर्णपणे दुर्लक्षित करण्यासारखा नाही.

मुंबईत धारावीत पुन्हा रुग्णवाढ होत आहे. पुण्यातही रविवारी एकाच दिवशी ४ हजार जणांना बाधा झाली. देशात काही राज्यांत संसर्ग वाढत आहे. पश्चिम बंगालमध्येही सावधानता म्हणून एकप्रकारे मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यातून लोकांच्या रोजीरोटीवर पाय पडतो. आधीच दोन वर्षांत अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय बुडाले आहेत. ज्यांच्या हातांना काम आहे, त्यांचे उत्पन्न घटले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांचा विचारही नकोसा वाटतो. त्यामुळेच देशातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचे उडालेले धिंडवडे लक्षात घेऊन पंतप्रधानांनीही रविवारी तातडीने ऑनलाईन बैठक घेऊन कोरोनास्थितीचा आढावा घेतला. वेगवान लसीकरण, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्याची सूचना त्यांनी केली.

जिल्हा पातळीवरील यंत्रणा अधिक सुसज्ज करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळही कोरोना स्थितीवर नजर ठेवून आहे. गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे, संसर्ग झाल्यास तातडीने विलगीकरण करणे, योग्य उपचार ही सूत्रीच आपल्याला या संकटावर मात करण्यासाठी शक्ती देणार आहे. त्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आणि इतरांना त्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. कोरोनाची संसर्गक्षमता हळूहळू कमी होत आहे. कोरोना पूर्णपणे हद्दपार होणार नाही. मात्र, तो वेगाने पसरू नये आणि त्याचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी लसीकरण हाच त्यावर उपाय आहे. नव्या वर्षात हे संकट लवकर टळो आणि ही कोरोनाची शेवटची लाट ठरो, हीच सर्वांची इच्छा असणार आहे, यात तूर्त शंका नाही.

Web Title: Let this wave be the last

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.