आरोग्यदायी वसुंधरेसाठी निसर्गाचा समतोल राखूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:36 AM2020-04-07T05:36:41+5:302020-04-07T05:37:46+5:30

विज्ञानाच्या तसेच वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीची घोडदौड करूनही माणूस कोरोनाच्या अतिसूक्ष्म विषाणूपुढे किती हतबल आहे, हेच या महामारीने दाखवून दिले आहे.

Let's balance nature for a healthy lifestyle! | आरोग्यदायी वसुंधरेसाठी निसर्गाचा समतोल राखूया!

आरोग्यदायी वसुंधरेसाठी निसर्गाचा समतोल राखूया!

Next

हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या अभूतपूर्व अशा कोरोना महामारीशी संपूर्ण जग झुंजत असताना आजचा जागतिक आरोग्यदिन साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजिवाच्या शाश्वत आणि आरोग्यसंपन्न जीवनाची खात्री व्हावी, यासाठी व्यक्तिगत पातळीवर स्वच्छता पाळणेच नव्हे, तर निसर्ग आणि पर्यावरणाशी प्रतारणा न करण्याचे स्मरण करून देण्याची ही वेळ आहे. यंदाचा जागतिक आरोग्यदिन मुख्यत: परिचर्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणारा आहे. सध्या याच परिचारिका कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.


विज्ञानाच्या तसेच वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीची घोडदौड करूनही माणूस कोरोनाच्या अतिसूक्ष्म विषाणूपुढे किती हतबल आहे, हेच या महामारीने दाखवून दिले आहे. बाधित झालेल्यांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थ करत आहेत व या विषाणूवर प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी वैज्ञानिक जिवाचे रान करत आहेत. हा प्राणघातक विषाणू राजा आणि रंक असा भेदभाव करीत नाही की, देश आणि धर्माचे भेदही पाळत नाही. त्याचा प्रसार रोखण्यासाठी एकापाठोपाठ अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ करावे लागत आहे. एकीकडे माहितीच्या महाजालाने जगभरातील लोक पूर्वी कधी नव्हते एवढे परस्परांशी जोडले गेलेले असतानाच देशांना सीमा बंद करायला लागाव्यात आणि देशातील नागरिकांनाही एकमेकांत अंतर ठेवण्यास सांगावे लागावे हा केवळ विरोधाभासच नाही तर कटू वास्तवही आहे.


संपूर्ण मानवी समाजासाठी ही परीक्षेची घडी आहे. या लढ्यातून बाहेर पडल्यावर बदललेल्या वास्तवाचे, आर्थिक मंदीचे व व्यक्तिगत आयुष्याच्याही झालेल्या मोठ्या विस्फोटाची आपल्याला जाणीव होईल. अशा विनाशकालाची पुनरावृत्ती टाळता येईल का, यावर गांभीर्याने विचार करून त्यावर उपाय शोधावे लागतील. आपण अनुसरलेली विकासाची मॉडेल्स, आपल्या पर्यावरणाची नाजूक अवस्था व आपल्या उत्पादन-उपभोगाच्या अशाश्वत पद्धतींवर आपल्याला प्रश्नचिन्हे उभी करावी लागतील. माणसाच्या हव्यासाने अन्य सजीवांचे अधिवास नष्ट होण्याचा हा भयावह परिणाम आहे, हे अनेक विचारवंतांचे मत खरे तर नाही ना, याचाही आपल्याला विचार करावा लागेल.
पर्यावरण संतुलनाचा सन्मान करून ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्राचीन भारतीय दृष्टिकोन मार्गदर्शक ठरू शकेल, ज्यात सर्व सजीवांना सारखेच महत्त्व असेल अशा विश्वाची कल्पना वैदिक ऋषींनी दोन हजार वर्षांपूर्वी मांडली होती. तशा अनेक प्रार्थना ऋग्वेदात आहेत. वृक्षांसह सर्व सजीवांमध्ये देवत्वाचा अंश मानणारी निसर्गरक्षण व पर्यावरण संतुलनाची आपली प्राचीन परंपरा आहे. पृथ्वी, त्यावरील माणसासह सर्व सजीव आरोग्यसंपन्न राहावेत यासाठी सर्व भारतीयांसह जगातील नागरिकांना निसर्गरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सैनिकाची भूमिका बजावावी लागेल. आरोग्याच्या अनेक निकषांमध्ये भारताने स्वातंत्र्यानंतर खूप प्रगती केली आहे. अनेक संसर्र्गजन्य रोगांचे उच्चाटन झाले आहे. सरासरी अपेक्षित आयुष्यमान ६९ वर्षांपर्यंत वाढले आहे. गेल्या ३० वर्षांत साथ रोगांमुळे, बाळंतपणात, बाल्यावस्थेत व कुपोषणामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण ६१ वरून ३३ टक्क्यांवर आले आहे.


मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे साथींखेरीज अन्य आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. काही वर्षांपूर्वीची जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते की, आपल्याकडे ६१ टक्के मृत्यू हृदयरोग, कर्करोग व मधुमेह यांसारख्या साथींखेरीजच्या आजारांमुळे होत आहेत. हे रोखण्यासाठी शरीराला अजिबात व्यायाम न देणारी जीवनशैली व कदान्नाच्या सेवनाचा त्याग करून आरोग्यसंपन्न जीवन जगण्याची राष्ट्रीय महामोहीम हाती घ्यावी लागेल. योग, ध्यानधारणा व खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवई बालवयातच बाणवाव्या लागतील. शालेय अभ्यासक्रमांत याचा समावेश व्हायला हवा. इंडियन मेडिकल असोसिएशन व अन्य वैद्यकीय संस्थांनी या लोकशिक्षणात पुढाकार घेऊन माध्यमांनीही यात सक्रियेतने सहभागी व्हायला हवे.


ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्धांना रोगाची लागण चटकन होण्याचा संभव असल्याने त्यांची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. ‘कोराना’च्या निमित्ताने आरोग्यसेवांच्या बाबतील शहरी व ग्रामीण भागांतील मोठी तफावत समोर आली आहे व सार्वजनिक आरोग्यासाठी अधिक निधी देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. ५० कोटींहून अधिक लाभार्थींना आरोग्य विम्याचे संरक्षण देणारी व दीड लाख आरोग्यकल्याण केंद्रातून आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरविणारी ‘आयुष्यमान भारत’ योजना काही प्रमाणात याचे निराकरण करणारी आहे. उपचारांएवढेच रोगप्रतिबंधांवर आणि नागरिकांचे जीवन समग्रपणे आरोग्यसंपन्न करण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल.
या जागतिक साथीने माणूस व निसर्ग यांच्यातील अतूट नात्याकडे नव्याने पाहणे भाग पाडले आहे. ही वसुंधरा फक्त मानवासाठी नाही तर वनस्पतींसह सर्व सजीवांसाठीही आहे याचे भान ठेवावे लागेल. आपले हे एकमेव जग एकमेकांशी घट्ट निगडित व परस्परावलंबी आहे. आरोग्यदायी आयुष्यासाठी हे संतुलन जपणे अपरिहार्य आहे. आपल्याला पुस्तकी ज्ञानाला प्रज्ञेची जोड द्यावी लागेल. पर्यावरणाचा ºहास होऊ न देता माणसासह सर्वच सजीवसृष्टीला बहरता येईल, अशी सुरक्षित पृथ्वी साकार करावी लागेल.


एम. व्यंकय्या नायडू
उपराष्ट्रपती

Web Title: Let's balance nature for a healthy lifestyle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.