सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया!
By विजय दर्डा | Published: August 10, 2020 04:28 AM2020-08-10T04:28:44+5:302020-08-10T04:35:59+5:30
जात, धर्म व आर्थिक भेदभावविरहित समाजरचना म्हणजे ‘रामराज्य’
- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
अयोध्येचा वाद अखेर मिटला ही सर्वांसाठीच समाधानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन केले. लवकरच हे भव्य मंदिर उभे राहील. अयोध्येतच नव्या मशिदीचे बांधकामही लवकरच सुरू होईल. मशीद बांधण्यासही यथायोग्य सहकार्य दिले जाणार आहे. मंदिर-मशिदीचा जुनाट वाद कायमचा सोडविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायला हवेत. न्यायालयाचा निर्णय दोन्ही पक्षांनी मान्य केला, ही त्याहूनही चांगली गोष्ट आहे.
कोरोना महामारीचे संकट टळलेले नसूनही पंतप्रधानांनी मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येला जाण्याचे ठरविले. यामागचा मोदींचा हेतू स्पष्ट होता : हा वाद कायमचा मिटावा व देशात सांप्रदायिक सौहार्दाचे वातावरण नांदावे. या वादाने देशाचे खूप नुकसान केले आहे. आता पुन्हा असा वाद निर्माण व्हायला नको. अयोध्येत जे झाले, त्यात कोणाचीही हार नाही व कोणाचीही जीत नाही. दोन्ही पक्षांनी जो संयम दाखविला, तोही प्रशंसनीय आहे. देशात लोकसंख्येच्या दृष्टीने हिंदूंची ताकद जास्त आहे हे खरे; पण आपले संविधान धर्म, जात, आस्था वा आर्थिक कुवतीच्या आधारावर कोणाचाही भेदभाव करीत नाही. हिंदू वा मुसलमान, शिख वा बौद्ध, जैन अथवा ख्रिश्चन वा पारशी किंवा नास्तिक असलेल्यांनाही आपले संविधान समान अधिकार देते. कोणीही घाबरण्याची बिलकूल गरज नाही. हा देश प्रत्येकाचा आहे. म्हणूनच आपण गर्वाने म्हणतोही... ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा.’ परंतु, काही लोक वातावरण कलुषित करतात व त्याचे परिणाम देशाला निष्कारण भोगावे लागतात. झुंडशाहीने होणाऱ्या हत्या, अफवा पसरविणे व लोकांना चिथावणे बंद व्हायला हवे. कोणत्याही बाहेरच्या शक्तींना कुरापती काढण्यास बिलकूल वाव मिळणार नाही, याची काळजी दोन्ही बाजूंनी घ्यायला हवी. मी इक्बाल अन्सारी यांची मनापासून प्रशंसा करीन. ते शेवटपर्यंत न्यायालयात लढले; पण तेवढ्याच मोठ्या मनाने राम मंदिराच्या भूमिपूजनासही हजर राहिले. अयोध्येतील मुस्लिम महिलांनी आपल्या परंपरा बाजूला ठेवून रामलल्लाची आरती केली, याहून सौहार्दाचे उत्तम उदाहरण कोणते?
सर्वांना सोबत घेऊन भविष्यात वाटचाल करण्याची जबाबदारी नक्कीच आपणा सर्वांवर आहे; पण जे सरकारमध्ये असतात, त्यांची जबाबदारी आणखी मोठी असते. कुरापती उकरून काढणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेची जराही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट आणि खंबीर संदेश पंतप्रधानांकडून देशात जायला हवा. जुन्या गोष्टींचा त्याग करून नवा शांतता व सलोख्याचा अध्याय आपल्याला सुरू करायला हवा. यानेच देश प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकेल. गरिबी, निरक्षरता व भूकमारीच्या जुन्या समस्या आहेत. त्यात कोरोनाच्या भीषण संकटाची भर पडली आहे. यातून उज्ज्वल भविष्याची वाट धरायची असेल, तर आपल्याला एकजुटीनेच वाटचाल करावी लागेल.
पंतप्रधानांनी ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’ची घोषणा केली आहे. आता देशात खऱ्या अर्थाने रामराज्य यायला हवे, असा माझा आग्रह आहे. मला हे स्पष्ट करायला हवे की, माझ्या रामराज्याचा कोणत्याही विशिष्ट धर्माशी किंवा रामाच्या पूजा-आराधनेशी संबंध नाही. रामराज्याचा अर्थ आहे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांप्रमाणे आदर्श शासनव्यवस्था स्थापन करणे, ज्यात कोणी भुकेला असू नये, कोणाचाही छळ होऊ नये, सर्वजण निडर असतील, भयमुक्त जीवन जगता यावे आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सुखसमृद्धी झिरपणे. महामारीच्या परिस्थितीने रोजगाराची समस्या गंभीर झाली आहे. पंतप्रधानांना याकडेही खास लक्ष द्यावे लागेल. सर्वसामान्य नागरिक दु:खी असेल व तो कष्टप्रद आयुष्य जगत असेल, तर रामराज्य कधी साकार होणार नाही व त्याने प्रभू रामचंद्रही खूश होणार नाहीत.
रामराज्याची कल्पना काही नवी नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वतंत्र भारताचे रामराज्याचेच स्वप्न पाहिले होते. त्यांचे संपूर्ण आचरणही त्यानुरूपच होते. समाजातील अंतिम व्यक्तीचीही त्यांना आत्मीयता होती. १९८९ मध्ये फैजाबादमध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना स्व. राजीव गांधी रामराज्याविषयी बोलले होते. त्याने काँग्रेसच्या कंपूत खळबळ माजली होती. त्यांच्या मूळ भाषणात ‘रामराज्य’ हा शब्दही नव्हता. त्यांचे विशेष सहकारी मणिशंकर अय्यर यांनी तो त्यात घातला होता! त्यावेळी पंतप्रधान राजीवजींशी भेट झाली तेव्हा काश्मीर, बोडो समस्या व स्वतंत्र विदर्भावर चर्चा करताना मी त्यांच्याशी हा रामराज्याचा विषयही काढला होता. खरं तर भाषणात राजीव गांधींनी चुकून रामराज्य हा शब्द उच्चारला नव्हता. त्यांनी पूर्ण विचार करून तो शब्द वापरला होता. जेथे कोणताही भेदभाव असणार नाही व सर्व विचार-धर्मांचे लोक निर्भयतेने राहू शकतील, अशा देशाच्या उभारणीचा संदेश त्यांना त्यातून द्यायचा होता.
राजीव गांधींची धर्मनिरपेक्षता व लोकशाहीवरील त्यांच्या श्रद्धेविषयी कोणीही शंंका घेऊ शकणार नाही. त्यांना सर्व धार्मिक भावनांची कदर होती. खरे तर काँग्रेसने हिंदूंची उपेक्षा केली, असा आरोप करणे चुकीचे आहे. काँग्रेस समभावावर विश्वास असलेला पक्ष आहे. काँग्रेसला हिंदूंच्या भावनांचीही चांगली जाण आहे. रामानंद सागर यांना ‘रामायण’ ही दूरदर्शन मालिका तयार करण्यास राजीव गांधींनीच प्रेरित केले होते. १९८७-८८ मध्ये प्रसारित झालेली मालिका ५५ देशांंतील २५० कोटी लोकांनी त्यावेळी पाहिली. संपूर्ण देशाने श्रीराम नीट समजून घ्यावा, अशी राजीव गांधींची इच्छा होती. अयोध्येत १९८९ मध्ये शिलान्यास करण्यास त्यांनीच विश्व हिंदू परिषदेस अनुमती दिली होती. तसेच त्या कार्यक्रमात सहभागासाठी त्यांनी गृहमंत्री बुटासिंग यांनाही अयोध्येला पाठविले होते. यात त्यांचा कोणताही राजकीय फायदा घेण्याचा हेतू नव्हता. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ची कल्पना साकार होण्यासाठी देशात रामराज्यासारखी आदर्श शासनव्यवस्था स्थापन व्हावी, अशी त्यांची मनोमन इच्छा होती.