सण - उत्सवांमधील निर्मळ आनंद घेऊया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 08:42 PM2020-08-31T20:42:53+5:302020-08-31T20:43:04+5:30

मिलिंद कुलकर्णी कोरोनाच्या महासाथीने सगळाच बदल झालाय. त्याचे आकलन आपापल्या परीने सगळे करीत आहे. त्याचे चटके प्रत्येक जण वेगवेगळ्या ...

Let's enjoy pure in festivals! | सण - उत्सवांमधील निर्मळ आनंद घेऊया !

सण - उत्सवांमधील निर्मळ आनंद घेऊया !

Next

मिलिंद कुलकर्णी

कोरोनाच्या महासाथीने सगळाच बदल झालाय. त्याचे आकलन आपापल्या परीने सगळे करीत आहे. त्याचे चटके प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे सोसत आहे. पण सण - उत्सवांमधील पावित्र्य, निर्मळ आनंद हा सण हिरावू शकला नाही, हे मात्र निश्चित आहे. भले सण साधेपणाने साजरे झाले असतील, सगे सोयरे येऊ शकले नसतील, पण त्यातही समाधान मानून आम्ही वार्षिक सण साजरे केले. त्याला भव्य दिव्यपण नसेल, पण खंड पडला नाही, याचा आनंद आहे.


आता या टप्प्यावर खरेच विचार करायला हवा की, आम्ही आमची श्रध्दा, दैवत घरापुरतेच ठेवले, त्याचे सार्वजनिक स्वरुप मर्यादित केले तर ? विचार धाडसी आहे, काहींना रुचणार नाही. पण बदलत्या परिस्थितीत हा विचार करायला काय हरकत आहे?
गणेशोत्सवाच्या काळात नेहमी हा प्रश्न विचारला जातो की, लोकमान्यांनी शंभर वर्षांपूर्वी सुरु केलेल्या सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप हरवले आहे काय? मूळ हेतू, उद्देशांना बगल देऊन हे उत्सव साजरे होत आहे काय? त्यावर विचारमंथन होते. वेगवेगळी मते व्यक्त होतात. परंपरावादी मंडळींचा ‘पुनर्विचार’ या शब्दाला आक्षेप असतो. दुसरा एक विचार नेहमी मांडला जातो, या उत्सवांमुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध होते, अनेकांना रोजगार मिळतो. दैनंदिन रहाटगाडा हाकत असताना चार आनंदाचे, मनोरंजनाचे क्षण आले तर काय हरकत आहे, हा सर्वसामान्यांचा विचार असतो. सार्वजनिक उत्सव हे धनिक, राजकीय मंडळींच्या ताब्यात गेले आहेत, सर्वसामान्य माणूस तेथे नावालाही शिल्लक नाही, यावर मात्र सर्वसामान्यांमध्ये एकमत आहे.


यंदा कोरोनामुळे बंधने आली. चार फुटांची मूर्ती, आरतीला पाच जण, स्थापना व विसर्जन मिरवणुका रद्द असे नियम सगळ्यांनी पाळले. त्याचे कौतुक करायला हवेच. रक्तदान, आरोग्य तपासणी, पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीला अर्थसाहाय्य असे उपक्रम राबविले, त्याचे स्वागत करायला हवे. काहींनी नियम मोडून मिरवणूक काढली, त्यांच्यावर कायद्याचा बडगा उचलला गेला. पर्यावरणवादी, विज्ञानवादी मंडळींना घरगुती विसर्जन, मूर्तीदान मोहीम यंदा गांभीर्याने राबविली गेल्याचा आनंद झाला. वेगळा सूर देखील कानावर आला. यंदा खर्चाची बचत झाली, पुढच्यावर्षी धडाका लावू, सगळी कसर काढू...अवघड आहे, नाही का? या महासाथीने आम्हाला चिंतन, मनन व मंथन करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे, ती आम्ही दवडणार असू तर आमच्यासारखे करंटे आम्हीच.
सार्वजनिक उत्सवात पावित्र्य जपण्यासाठी तो भव्यदिव्य असला पाहिजे असे नाही, हे आम्हाला यंदा लक्षात आले आहे. पुढेदेखील आम्ही साधेपणाने, पण तितक्याच श्रध्देने, पावित्र्याने साजरा केला तर नाही का चालणार?
पाच महिन्यांपासून मंदिरे, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशी सगळी धार्मिक स्थळे बंद आहेत. गर्दी होऊ नये, म्हणून ती बंद ठेवली गेली. काहींनी प्रश्न विचारले, धार्मिक स्थळे बंद आहेत, जगाचे काही अडले का? नास्तिकवर्ग पूर्वापार आहे. असे प्रश्न अपेक्षित असतात. पण त्याला समर्पक उत्तरसुध्दा आले. देव, देवळात नाही थांबला. तो डॉक्टर, नर्स, सफाईकामगार, पोलीस कर्मचारी यांच्यारुपाने समाजाची सेवा करीत आहे. किती उदात्त विचार आहे. संत कबीर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या तत्त्वप्रणालीला साजेसे हे उत्तर आहे. आम्ही देवळात गेलो नाही, म्हणून आम्ही देवाचे नामस्मरण थांबवलेले नाही. नित्य देवपूजा थांबवलेली नाही. घरात कृष्णजन्म साजरा केला. मातीच्या बैलांना घरात पूजले. नागदेवतेला वंदन केले. सण - उत्सव कोणतेच चुकले नाही. त्याचे स्वरुप बदलले.
आमच्या संविधानाने तेच तर सांगितले आहे. आमचा धर्म हा घराच्या उंबऱ्याआत असला पाहिजे. घराबाहेर पडताना आम्ही भारतीय आहोत, हीच ओळख असायला हवी. सर्व धर्मांना समान मानण्याची शिकवण महत्त्वाची आहे. गल्लत याच ठिकाणी झाली आणि सगळा गोंधळ उडाला आहे. कोरोनाच्या महासाथीमध्ये धार्मिक भिंती पाडून एकमेकांना सहाय्य करण्याच्या सुखद घटना समोर आल्या. रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत धार्मिक भेद गळून पडले आणि मदतीला धावले. केवढा मोठा माणुसकी धर्म आम्ही आपत्ती काळातही जपला. वाढवला. त्याचे जतन करुया.

Web Title: Let's enjoy pure in festivals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.