चला, हवा स्वच्छ ठेवूया...

By किरण अग्रवाल | Published: November 12, 2020 09:30 AM2020-11-12T09:30:57+5:302020-11-12T09:31:47+5:30

fire cracker : कोरोना महामारीच्या अनुषंगाने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या विषयाकडे त्याचदृष्टीने बघितले जाणे गरजेचे आहे, कारण पर्यावरण संवर्धनापुरताच नव्हे तर यंदा जीवन रक्षणाशीही त्याचा संबंध अन्योन्यपणे जोडला गेलेला आहे.

Let's keep the air clean ... |  चला, हवा स्वच्छ ठेवूया...

 चला, हवा स्वच्छ ठेवूया...

Next

- किरण अग्रवाल 

सामाजिक शहाणपण हे सार्वत्रिक पातळीवरून प्रदर्शित होते खरे, पण त्याची सुरुवात ही वैयक्तिक स्वरूपातच होत असते. एकाने घेतलेला शहाणपणाचा निर्णय जेव्हा अनेकांसाठी आदर्शाचा, अनुकरणाचा आणि दिशादर्शक विषय ठरून जातो तेव्हा त्यातून आपोआपच सामाजिक शहाणपण प्रस्थापित होते. कोरोना महामारीच्या अनुषंगाने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या विषयाकडे त्याचदृष्टीने बघितले जाणे गरजेचे आहे, कारण पर्यावरण संवर्धनापुरताच नव्हे तर यंदा जीवन रक्षणाशीही त्याचा संबंध अन्योन्यपणे जोडला गेलेला आहे.

कोरोना संसर्ग बाधितांची समस्या ही प्रामुख्याने श्वसन क्रियेशी निगडित असते व त्यातील जटिलता त्यामुळेच आकारास येते. रुग्णास ऑक्सिजन लावण्याची व प्रसंगी व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळही यातूनच उद‌्भवते. श्वसनाची सुलभता कायम राखायची असेल तर त्यासाठी हवेची शुद्धता गरजेची आहे. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. फटाक्यांच्या धुरातून श्वसनाला हानिकारक ठरणारे वायू हवेत मिसळतात व प्रदूषण घडून येते. अस्थमासारखा श्वसनाशी संबंधित विकार असलेल्यांना तर दरवर्षी दिवाळीत या संकटाचा सामना करण्याची वेळ येते.

यंदा तर सर्वांचाच कोरोनाच्या महामारीशी झगडा सुरू आहे, त्यामुळे श्वसनाला बाधा ठरणारे वायुप्रदूषण कटाक्षाने टाळणे गरजेचे बनले आहे. त्याच दृष्टीने शासन-प्रशासन, वैद्यकीय व्यावसायिक व सामाजिक संघटनांकडूनही यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे कळकळीचे आवाहन केले जात आहे. तेव्हा या आवाहनाला आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे, कारण दिवाळीचे फटाके हा आता केवळ आपला वैयक्तिक आनंदाचा भाग उरलेला नसून आपल्या आसपासच्या व आपल्याही जिवलगांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा विषय बनला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, शासन-प्रशासन आपल्यापरीने काम करत असले तरी समाजमन जागृत होते तेव्हा खबरदारीची धुराही समाजाकडूनच वाहिली जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. गेल्या गणेशोत्सवाच्या पर्वातच त्याचा प्रत्यय येऊन गेला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता या उत्सवातील सार्वजनिकता टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. जनतेनेही त्याची निकड लक्षात घेऊन अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा केला. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना यंदा घराघरात मोठ्या प्रमाणावर झालीच शिवाय विसर्जनही घरच्या घरी करण्यात आले. त्यामुळे जलप्रदूषणही कमी झाले. तोच कित्ता दिवाळीत गिरविला गेल्यास वायुप्रदूषण टाळता येणे शक्य होणार आहे, जे कोरोनाबाधितांसाठी तसेच प्रत्येक घरातील वयोवृद्धांसाठीही अत्यंत आवश्यक आहे. आपला आनंद हा इतर कोणाच्या जिवावर उठणार नाही ना याची जाणीव ठेवून दिवाळी साजरी केल्यास त्यातून फटाकेमुक्ती आपोआपच घडून येईल.

विशेष म्हणजे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानेही देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी लागू केली असून, त्यात महाराष्ट्रातील अठरा शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ज्या शहरांमधील हवेची गुणवत्ता घसरलेली किंवा खराब आढळून आली होती तिथे ही बंदी घालण्यात आली असून, ज्या ठिकाणी गुणवत्तेची पातळी माफक प्रमाणात घसरली आहे तिथे ग्रीन फटाक्यांना काही नियमांच्या अधीन परवानगी देण्यात आली आहे. या बंदी असलेल्या शहरांमध्ये आपल्याकडील मुंबई, पुणे, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद आदी शहरे असल्याचे पाहता येथील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे स्पष्ट व्हावे.

तेव्हा या शहरांमधील नागरिकांची जबाबदारी तर अधिक वाढून गेल्याचे म्हणता यावे. मागे 2018 मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण खात्यातर्फेही स्वच्छ हवा अभियान राबविण्यात येऊन त्यात राज्यातील सहा शहरांनी चांगले प्रयत्न केल्याने त्यांना कोट्यवधींचा निधी वितरित केला गेला. यात देशात सर्वाधिक 244 कोटींचा निधी मुंबई शहराला मिळाला तर शुद्ध हवेसाठी सर्वाधिक अनुदान मिळवणारे महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरले होते. यंदा दिवाळी साजरी करताना हाच लौकिक अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने फटाकामुक्ती साधणे अपेक्षित आहे. ते पर्यावरणासाठीच नव्हे, तर कोरोनामुळे अडचणीत आलेले जीव वाचवण्यासाठीदेखील गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येक जण कटिबद्ध होऊया...

Web Title: Let's keep the air clean ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.