चला, "त्या" अनाथांच्या उशाला दीप लावूया...
By किरण अग्रवाल | Published: September 3, 2023 11:04 AM2023-09-03T11:04:02+5:302023-09-03T11:04:27+5:30
Let's light a lamp : आनंद वाटून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे समाधान काही औरच असेल यात शंका नाही.
- किरण अग्रवाल
एकीकडे सोशल मीडियावर सणासुदीला नातेसंबंधातील आपुलकीचे पाट वाहत असताना स्वकीयांनीच घरातून काढून दिलेले वृद्ध अश्रूंना वाट मोकळी करून देत अडगळीत पडले असतील तर संस्काराचा प्रश्न उपस्थित होणारच.
आनंद हा वाटून घेण्यात असतो, त्यातही व्यक्तिगत आनंदाच्या क्षणांचे एकवेळ जाऊ द्या; परंतु सामूहिक पातळीवर आनंद वा उत्सव साजरा करायची वेळ आली असताना आपल्यातीलच एखादा घटक जेव्हा विपन्नतेच्या वावटळीत सापडल्यासारखा हतबल व स्वतःला निराधार समजून अडगळीत पडून असतो तेव्हा त्या परिस्थितीतील आनंदाला आनंद म्हणता येऊ नये.
वरुणराजाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. कसे व्हायचे या पुढच्या काळात, या चिंतेने त्याची झोप उडाली आहे. याही स्थितीत आपली संस्कृती व संस्काराला जपत नुकत्याच होऊन गेलेल्या रक्षाबंधनाला लेकी-बाळींसह आनंदात उत्सव साजरा केला. राखीपौर्णिमा झाली, आता कृष्णाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव त्यानंतर दसरा, दिवाळी असे एकापाठोपाठ एक सणवार येतील. घराघरांत सारा उत्साहाचा व आनंदाचा माहोल असेल. या सणावारानिमित्त सर्वत्र आनंद साजरा करताना आपल्यातीलच एखादा घटक किंबहुना आपलाच कुणी जिवलग, सगासोयरा त्यापासून वंचित तर नाही ना; याचा विचार आपल्याकडून केला जातो का हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर काही ठिकाणी नकारात्मक येते हे दुर्दैवी आहे.
रक्षाबंधनाचेच उदाहरण घेऊया, सोशल मीडियावर भाऊ-बहिणींच्या प्रेमाचे पाटच्या पाट वाहिलेले दिसून आले; या नात्यांमधील हळूवारपणे उलगडणारा हा अनुभव ठरला, मात्र याचवेळी ''लोकमत''ने केलेल्या पाहणीत निराधार म्हणून वृद्धाश्रमात सोडून दिलेल्या काही माता-भगिनींनी ''पोटच्या पोरांनीच पाठ सोडल्यावर पाठीच्या भावांकडून काय अपेक्षा करणार..'' असा हृदय पिळवटून टाकणारा सवाल करीत सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या भ्रामक रांगोळीला जणू विस्कटून ठेवले. अर्थात, अपवादात्मक घटनांकडे सार्वत्रिक अनुभव म्हणून पाहता येऊ नये; परंतु जन्मदात्या मातेचेच असे पांग फेडले जातानाची अपवादात्मक का होईना उदाहरणे समोर येणार असतील तर सामाजिक संवेदनांची हळहळ होणे स्वाभाविक ठरावे.
नात्यांचे बंध हे असेच सैल होत नसतात. परिस्थिती कितीही बेताची असो, त्यातही एकमेकांचा आधार होत व आनंद वाटून घेत जेव्हा कुटुंबाची वाटचाल होते तेव्हा त्यातूनच नाती वर्धिष्णू बनतात. आज नातीच ठिसूळ होत आहेत, कारण त्यातील ओलावा कमी होत चालला आहे. मी व माझ्यातले वैयक्तिक गुरफटलेपण जसजसे वाढत चालले आहे तसे नाते कमकुवत होत आहे. एकट्या अकोला जिल्ह्याचीच आकडेवारी पाहिली तर गेल्या सहा महिन्यांत मुलाकडून व सुनेकडूनही छळ केल्या गेल्याच्या सुमारे ४०० पेक्षा अधिक तक्रारी वृद्धांनी पोलिसांकडे दाखल केल्या आहेत. यावरून नातेसंबंधातील दुरावा किती वाढत चालला आहे हे लक्षात यावे.
महत्त्वाचे म्हणजे, माता-पिता व मुलांमधील नात्यांनाच जिथे अपवादात्मक प्रकरणात का होईना नख लागताना दिसते, तिथे सून व सासू-सासऱ्यांमधील संबंधांत कडवटपणा दिसून आला तर आश्चर्याचे ठरू नये. यात आश्चर्याची बाब अशी की, आतापर्यंत सासरच्या छळामुळे सुनांनी आत्महत्या केल्याचे आपण ऐकत व वाचत आलो; परंतु आता सुनेच्या त्रासामुळे एका सासऱ्याने आत्महत्या केल्याची तक्रार अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात नोंदविली गेली आहे. इतकेच नव्हे, पत्नीने मारहाण करून घरात डांबून ठेवल्याची तक्रारही एका पत्नी पीडित पतीने नोंदविली आहे. कुठे चाललो आहोत आपण, असा प्रश्न यामुळेच निर्माण व्हावा.
अशा प्रकरणांना ज्या कुटुंबांना सामोरे जाण्याची वेळ येते त्यांच्यासाठी सणावाराचा आनंद तो कसला उरणार? बरे, रक्ताची नाती परकी होत असताना अन्य आप्तेष्टांनी किंवा समाजाचे पुढारपण करणाऱ्या मान्यवरांनी यात हस्तक्षेप करावा तर तोही अलीकडे होताना दिसत नाही. त्यामुळे सामाजिक भय नावाचा प्रकार उरला नाही. प्रत्येक जण स्वतः पलीकडे बघायला तयार नसल्यातून हे सारे उद्भवते आहे. शहरा-शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या माणुसकीच्या भिंतीवर कपडे व काही वस्तू ठेवल्या गेल्याचे पाहून अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची प्रचिती एकीकडे येत असताना दुसरीकडे आप्तेष्टांकडूनच छळाचे प्रकार जेव्हा पुढे येतात तेव्हा मन कळवळून गेल्याखेरीज राहत नाही.
सारांशात, सण उत्सवांना आता प्रारंभ झाला आहे. याचा आनंद साजरा करीत असताना ज्यांचा कोणी वाली नाही अशा वंचित, अनाथांच्या उशाला एक दीप लावून आपला आनंद वाटून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे समाधान काही औरच असेल यात शंका नाही.