संवेदनांचे दीप उजळूया...
By किरण अग्रवाल | Published: October 28, 2021 07:00 AM2021-10-28T07:00:00+5:302021-10-28T07:00:02+5:30
Let's light the lamps of Emotions ... निराशेच्या वातावरणात संवेदनांचे दीप उजळून आनंद पसरविण्याची गरज आहे.
- किरण अग्रवाल
आनंद वाटल्याने वाढतो असे म्हणतात, पण आज आनंद कुणी वाटून घेऊ इच्छित नाही; तो ‘मी’ व ‘माझ्या’तच ठेवून दुःख मात्र वाटून घेण्याची अपेक्षा बाळगली जाते. अर्थात सुख असो की दुःख, त्यात एकतर्फी वाटेकरी कधीच लाभत नसतात म्हणून यासंदर्भातील समतोल साधायचा तर अगोदर सुख वाटण्यापासून सुरुवात करायची असते. ते करायचे म्हणजे काय, तर आपल्या आनंदातील वाटेकरी वाढवायचे. यंदाच्या दिवाळीत तेच करता आले तर निराशेचे मळभ दूर सारून उत्साह, ऊर्जेच्या पणतीने प्रत्येक अंगण प्रकाशमान झालेले दिसून येऊ शकेल.
गत वर्षापासून दिवाळीला कोरोनाच्या संकटाची पार्श्वभूमी लाभून गेलेली असल्याने सण साजरा होताना दिसतो; परंतु मनातील अस्वस्थता लपता लपत नाही. यंदाच्या दिवाळीपूर्वीही कोरोनाची दुसरी लाट अनेकांना झळ पोहोचवून गेली आहे. अनेक घरातील कर्ते व कमावते पुरुष कोरोनाने हिरावून घेतले आहेत, तर अनेकांच्या नोकरी, व्यापार-उद्योगांवर गंडांतर आलेले आहे. अशाही स्थितीत मन घट्ट करून सारेजण दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाजारातील गर्दी ओसंडून वाहत असून, संकटावर मात करून आयुष्याच्या मशाली पेटवण्याचा दुर्दम्य आशावाद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत आहे. कोरोनाच्या संकटातून कसे तरी बचावत बाहेर पडून स्थिरस्थावर होत नाही तोच अतिवृष्टीचा फटका बसला. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, तरी नाउमेद न होता ऋण काढून का होईना सण साधण्यासाठी धडपड सुरू आहे. काहीशी निराशा, अस्वस्थता मनात आहे खरी; पण आशेचे दीप लावून आसमंत उजळून काढण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत ही समाधानाची बाब म्हणता यावी.
आशेचे दीप लावण्याच्या या प्रयत्नांना सार्वत्रिक पातळीवर बळ लाभणे गरजेचे आहे. कोरोनामुळे ज्यांच्या वाट्याला जे जे काही दुःख आले ते त्यांना विसरायला लावायचे असेल तर आपला आनंद त्यांच्याशी वाटून घ्यावा लागेल. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे व आपुलकीचे दोन शब्द तसेच दुःखाप्रतिच्या सहवेदनेतून हे होऊ शकणारे आहे. माणुसकीच्या ओलाव्याने ओथंबलेल्या भावना व शब्द असले, की त्रयस्थाच्या मनाशीही आपुलकीच्या तारा जुळतात. आपल्या आनंदात सहभागी करून घेतले की समोरच्याचे दुःख विसरायला मदत होते. दिवाळीला आपण आपल्या दारी आकाशकंदील लावू, आनंदाचे तोरण बांधू, घरात गोडधोड करू, नवीन कपडे लागते घेऊ; यातून जो आनंद आपणास लाभणार आहे तो आपल्या ऐपतीप्रमाणे समाजातील वंचितांसोबत वाटून घेतला तर त्यांचीही दिवाळी आनंदाची होऊ शकेल. यातून जे आत्मिक समाधान लाभेल व आनंद होईल त्याला मोल नसेल. अर्थातच यासाठी हवी संवेदनशीलता. दुर्दैवाने आज लोकांच्या भावना बोथट होत चालल्या आहेत. कोरोनाने गरीब-श्रीमंत, लहान-मोठा या भेदांच्या पलीकडे सर्वांना एका पातळीवर आणून उभे केल्याचे पाहता, निराशेच्या वातावरणात संवेदनांचे दीप उजळून आनंद पसरविण्याची गरज आहे. यंदाच्या दिवाळीत सारे मिळून तेच करूया...