नव्या वर्षात नवी नाती, घडवू आपण आता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:56 AM2021-01-01T00:56:35+5:302021-01-01T00:56:58+5:30
- विजय दर्डा विसरून जा कालच्या व्यथा आणि कथा नवीन वर्षात नवी नाती निर्माण करा आता विझलेल्या हृदयांचे दिवे ...
- विजय दर्डा
विसरून जा कालच्या
व्यथा आणि कथा
नवीन वर्षात नवी नाती
निर्माण करा आता
विझलेल्या हृदयांचे दिवे
कोण चेतवणार ?
मनात उठलेल्या घृणेच्या ज्वाळा
कोण विझवणार ?
चारही दिशांत धूरच धूर पसरलाय
या असल्या वातावरणात
कोण कुणाची उरभेट
तरी कशी घेणार?
माझ्या कानाशी आज
हे कुठले गीत घोंघावत आहे
की जे ऐकून माझे मन जळत आहे
ना माझा कुठला धर्म होता
ना माझा कुठला रंग होता
होळी-दिवाळी-ईद हे सारे
ना माझे ना तुझे होते
ते तर सर्वांचे होते
ही आमच्या भारताची
सुंदर कहाणी होती
प्रत्येकजण एक-दुसऱ्याशी
प्रेमाने वागत होता
प्रत्येकाचा परस्परांवर
मन:पूर्वक विश्वास होता
ना कुठे द्वेष होता
ना कुठे द्वेषाची भिंत होती
ना आपसात वाद-विवाद होते
ना राम अयोध्येत
अन् ना रहीम काबात होते
तर ते सर्वांच्या हृदयात
शेत-शिवारांत होते
मंदिर-मस्जिद गिरजाघरात होते
कुठून आणि कशी मिळाली
या वादळाला संधी
त्याला थांबवायला
नव्हता कुणी गांधी
तुम्ही माझ्यापासून
तो क्षण का हिरावला?
हा विचार करताना
मला जगणे कठीण झाले आहे
तो सोनेरी काळ
सर्वांना परत करा
आठवा, तेव्हा कसा दिसायचा
प्रत्येकाचा प्रसन्न चेहरा
आज का आकाशात
नैराश्याचे काळे मेघ अवतरले आहेत
प्रत्येक नेत्रातून पहा
अग्निज्वाळा धगधगताहेत
आपलीच माणसं
आपल्याच माणसांसाठी
कासावीस होताहेत
आता माझा श्वास गुदमरत आहे
सहनशीलतेचा बांध तुटत आहे
शहिदांचा इतिहास मला
स्वातंत्र्याची किंमत पुसत आहे
आता तर मी पूर्णत:
निरुत्तर झालो आहे
मनुष्य असूनसुध्दा
मी पाषाण झालो आहे
जे व्हायचे ते होवो
पण आता धुके हटायला हवीत
आकाश स्वच्छ-निरभ्र व्हायला हवे
ऋतु आनंदी व्हायला हवेत
सर्वांच्या हृदयाचे ठोके
एक व्हायला हवेत
प्रेमाचे उपहार घेऊन
चंद्रतारे धरतीवर उतरायला हवेत
विसरून जा कालच्या चर्वित-चर्चा
नव्या वर्षात साधा नवी नाती,
विसरून ईर्षा
ओढून आणा नवनात्यांचे चंद्रतारे
सजवा घराघराला एक भारतासम सारे
चला या, आपण सर्व मिळून
फडकता तिरंगा हाती धरू
प्रत्येक वेटाळात-गल्ली बोळात
भारतमातेचा जयजयकार करू
विसरा गडे हो,
कालच्या गोष्टी आता
नव्या वर्षात नवी नाती
घडवू आपण आता
(अनुवाद :
सुधाकर गायधनी)