द्या लेको तीनशे रुपये एका कपाला आणि प्या बादलीभर कॉफी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:17 AM2022-09-12T11:17:18+5:302022-09-12T11:17:32+5:30

‘‘त्या ‘स्टारबक्स’बद्दल कळलं का काही?’’ ‘स्टारबक्स’चे नवे सीईओ लक्ष्मणराव जन्मले पुण्यात! त्यांचा आताचा पगार दरवर्षी १४० कोटी वगैरे असणार! पण त्यांच्या दुकानात रिकामटेकडे लोक फार येतात म्हणे!

Let's pay three hundred rupees for a head and drink a bucket of coffee! | द्या लेको तीनशे रुपये एका कपाला आणि प्या बादलीभर कॉफी! 

द्या लेको तीनशे रुपये एका कपाला आणि प्या बादलीभर कॉफी! 

Next

शनिवारातल्या अमृततुल्य हॉटेलात चहा पित पेपर वाचत असताना गोडबोले काकांना अमेयनं विचारलंच. कमावलेल्या तुच्छतेनं काकांनी अमेयकडं पाहिलं. ‘‘तेच ना ते! कॉफी देणारे?’’ अमेयच्या होकारानंतर काका सुरू झाले. ‘‘आमची कुठंही शाखा नाही’’, असं गौरवानं सांगण्याऐवजी, ‘‘आमच्या जगभर शाखा आहेत’’, असं मिरविण्यात त्या ‘स्टारबक्स’वाल्यांना कसली धन्यता वाटते, देव जाणे! आमचा अमृततुल्य चहा प्यायला इथं पुण्यात रांगा लागतात. पण, तरी आम्ही नाही कुठं भलतीकडं शाखा काढत बसलो. अमेयला काय बोलावं ते समजेना. एरव्ही शाखेवर प्रेम असणारे काका इथे मात्र शाखांच्या का विरोधात असतात, ते त्याला माहीत नव्हतं. तो म्हणाला, ‘‘अहो काका, तुमची टपरी कुठं आणि हे स्टारबक्स कुठं?’’

‘‘का? तिथं काय वेगळं मिळतं? चहा आणि कॉफीच ना! आलं वगैरे टाकून दिलेल्या चहापेक्षा तुम्हाला ‘कॅपॅचिनो’, ‘अमेरिकनो’, ‘कोल्ड ब्रू कॉफी’ वगैरे म्हटलं की भारी वाटतं. मग द्या लेको तीनशे रुपये एका कपाला आणि प्या बादलीभर कॉफी एकावेळी. तुमच्या त्या कॉफीला पाच-सातशे नावं. पण चव आहे का आपल्या अमृततुल्यची?’’ अमेय म्हणाला, ‘‘अहो पण काका, लोकं जातात तिथं.’’ काका खेकसले, ‘‘कसचे जातात? इथं आम्ही पाटी लावलीय. कामाशिवाय थांबायचं नाही. तू ओळखीचा म्हणून तुला पेपर देतो वाचायला. तिथं त्या ‘स्टारबक्स’मध्ये सगळे रिकामटेकडे लोक येतात आणि तासनतास हलत नाहीत. वाह्यातपणा आहे सगळा.’’ 

अमेयला सांगायचं होतं, ते वेगळंच. पण, काकांनी ‘स्टारबक्स’बद्दल जे काही निरूपण आरंभलं, त्यामुळं अमेयनं कपातलं वादळ वाढू दिलं नाही. ‘स्टारबक्स’ ही जगातली सगळ्यात मोठी ‘कॉफी हाऊस’ची साखळी. कंपनी अमेरिकेची, पण ८४ देशांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. त्यांच्या शाखांची संख्या तीस हजारांहून जास्त आहे. ही कंपनी पन्नास वर्षांपूर्वी सुरू झाली अमेरिकेत. सिएटलला त्यांचं मुख्यालय. या अस्सल अमेरिकी कंपनीचा सीईओ आता भारतीय असणार आहे. अमेयला हे सांगायचं होतं. अर्थात, खरी बातमी वेगळीच होती. हे नवे सीईओ पुणेकर आहेत म्हणून अमेय आनंदात होता. पण, काका काही कौतुकाच्या मूडमध्ये नव्हते. लक्ष्मण नरसिंहन हे पुणेरी गृहस्थ आता ‘स्टारबक्स’चे नवे सीईओ असतील. लक्ष्मणराव जन्मले पुण्यात आणि इथंच लोयला हायस्कूल नि मग ‘सीओईपी’ नावाच्या प्रख्यात इंजिनिअरिंग कॉलेजात त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. ‘मेकेन्झी’, ‘पेप्सिको’सारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी मोठमोठ्या पदांवर काम केलं आहे. त्यांचा आताचा पगार दरवर्षी १४० कोटी वगैरे असणार आहे!

सुंदर पिचाई, सत्या नादेला, पुनीत रंजन, शंतनू नारायण, राज सुब्रमण्यम अशा भारतीय वंशाच्या ‘बिग बॉस क्लब’मध्ये आता लक्ष्मण नरसिंहन असतील. पण, ते भारतीय आहेत, वगैरेपेक्षा पुणेकर आहेत, याचा कोण आनंद झालेला अमेयला!  अखेर, त्याने काकांना ही बातमी सांगितलीच. तेव्हा काका म्हणाले, ‘‘पुणे सोडून बरीच वणवण केलेली दिसते बेट्याने. मोठा झालाय. त्याला आता पुण्यातही जॉब मिळू शकतो. बाकी, ईश्वराची इच्छा. पोटासाठी दाही दिशा धुंडाळाव्या लागतातच माणसाला!’’ अमेय म्हणाला, ‘‘मी त्यांचा मेल शोधतोय. अभिनंदन करतो त्यांचं.’’ त्यावर काका म्हणाले, ‘‘माझ्याकडूनही अभिनंदन सांग हो त्याचं. पण, रिकामटेकड्यांची गर्दी कमी करणारी पाटी लाव म्हणावे आधी त्या ‘स्टारबक्स’मध्ये. आणि...’’‘‘दुपारी एक ते चार उपहारगृह बंद ठेवायला सांग रे त्यास!’’ , काका निरागसपणे म्हणाले!

- जयसूर्या

Web Title: Let's pay three hundred rupees for a head and drink a bucket of coffee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.