अवयवदानाचा संकल्प करूया; गरजूंचे आयुष्य उजळूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 04:33 AM2020-08-13T04:33:29+5:302020-08-13T04:33:43+5:30

- डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ शरीर निरोगी असेल, तर आयुष्य सुखदायक होते; परंतु काही कारणाने शरीराचा एखादा ...

Lets take resolution to donate organs and help needy | अवयवदानाचा संकल्प करूया; गरजूंचे आयुष्य उजळूया!

अवयवदानाचा संकल्प करूया; गरजूंचे आयुष्य उजळूया!

Next

- डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

शरीर निरोगी असेल, तर आयुष्य सुखदायक होते; परंतु काही कारणाने शरीराचा एखादा अवयव बाधीत झाला, तर संबंधिताचे जगणे अवघड होते. एखाद्याची किडनी आजाराने नादुरुस्त झाल्यास त्याला सतत डायलीसीसवर अवलंबून राहावे लागते. त्याला दुसऱ्याची किडनी मिळाली, तर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. आपल्या देशात अवयव प्रत्यारोपणाच्या गरजू रुग्णांची संख्या लाखांमध्ये आहे. कोणाला डोळ्यांची, तर कोणाला किडनी, यकृत, तसेच हृदयाची गरज आहे. मात्र, जनजागृतीअभावी अवयवदात्यांची संख्या तुलनेत खूपच कमी आहे. अपघाती वा नैसर्गिक मृत्यू होणाऱ्यांचे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरात आले, तर एखाद्याची गरज भागू शकते.



आपल्याकडे मृत्यूनंतर विधीवत अंत्यसंस्कार करून पार्थिवाची विल्हेवाट लावली जाते. अंत्यसंस्कारानंतर मानवी शरीरातील जे अवयव गरजूंना पुनर्जन्म देऊ शकतात, असे लाखमोलाचे अवयव पंचतत्त्वात विलीन होतात. यासाठी रुग्णालयात होणाºया मृत्यूनंतर अवयवदानाचे प्रमाण वाढले, तर गरजू रुग्णांचे जीवन सुकर होऊन त्यांना नवसंजीवनी मिळू शकते. संपूर्ण भारतात अवयवदानाचे महत्त्व व तशी चळवळ उभी राहणे काळाची गरज आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात अवयवदानाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. देशात अवयवदानाचे प्रमाण १० लाख लोकांमागे ०.०८ एवढेच आहे. इंग्लंडमध्ये हे प्रमाण १४.८, अमेरिकेत २६.३, तर स्पेनमध्ये जगात सर्वाधिक म्हणजे ३४.२ इतके आहे. हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या भारतात ५०,००० असून, प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपणाचे प्रमाण फक्त १५ टक्केच आहे. ३०,००० यकृत प्रत्यारोपणाची गरज असताना १,५०० जणांना यकृत प्रत्यारोपण केले जाते. २,००,००० मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असताना प्रत्यक्ष प्रत्यारोपण ६,००० आहे, तर ३०,००,००० डोळे प्रत्यारोपणाची गरज असताना प्रत्यक्ष प्रत्यारोपण केवळ १,५०,००० इतके होत असल्याचे वरील आकडेवारीवरून दिसून येते.



मे २०१९ पर्यंत ५,२६८ मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज होती, पैकी २३८ जणांनी जिवंतपणी, तर १११ व्यक्तींनी मृत्यूनंतर मूत्रपिंड दान केले. १,०५४ यकृत प्रत्यारोपणाची गरज असताना ५४ व्यक्तींनी जिवंतपणी, तर ६५ व्यक्तींनी मृत्यूनंतर यकृत दान केले. ५८ हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना मृत्यूनंतर हृदय दान करणाºयांची संख्या १५ आहे. ५ स्वादुपिंड प्रत्यारोपणाची गरज असताना मृत्यूनंतर एकाने स्वादुपिंड फुप्फूस दान केले. अवयवदानाबाबतचा कायदा, त्याच्या तरतुदी व फायदे यांची फारशी माहिती जनमानसात नसल्याने देशात हे प्रमाण अत्यंत कमी आहे. अवयवदानासंबंधी गैरसमज व अज्ञान दूर करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होणे गरजेचे आहे. बहुतांश साक्षर व सुशिक्षित वर्गातसुद्धा याबाबत जागरूकता दिसून येत नाही. एक मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती अवयवदान करून ८ जिवंत व्यक्तींना जीवनदान करू शकते व २१ लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणू शकते. यासाठी जनजागृतीची गरज आहे. मस्तिष्क स्तंभासाठी मृतांच्या नातेवाइकांचे समुपदेशन गरजेचे असते. समाजात विविध स्तरांतील लोकांच्या मनावर अवयवदानाचे महत्त्व बिंबविण्याची गरज आहे. त्यासाठी दूरचित्रवाणी, रेडिओ, वर्तमानपत्रे, शाळा, महाविद्यालये, शासकीय, अशासकीय रुग्णालये व शासकीय कार्यालये यांद्वारे जागृती करणे आवश्यक आहे. पूर्वी रक्तदानाबाबत जनता अनभिज्ञ होती; परंतु रक्तदान किती आवश्यक आहे, यासाठी सर्व स्तरावरून रक्तदान अभियान जनजागृती केल्यामुळे आज रक्ताचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे.



महाराष्ट्रापुरता विचार केल्यास गत काही वर्षांपासून अवयवदानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसून येते. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच शासकीय विभागांमार्फत अवयवदानसंदर्भात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी, मानवी साखळी, चर्चासत्रे, व्याख्याने, पथनाट्ये, यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमांतून जनजागृती केली जात आहे, तसेच शासनाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत सदर उपक्रम निरंतर सुरू आहे. अवयवदान जनजागृतीकरिता उपक्रम राबविलेत. याचा परिपाक म्हणून गत काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा देशात अव्वल क्रमांक आहे. मानवी अवयवांची तस्करी व काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ संमत केला. त्यानव्ये मानवी अवयव प्रत्यारोणास कायदेशीर परवानगी दिली आहे. या कायद्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करून मानवी अवयवांची तस्करी थांबविण्यासाठी कायदेशीर तरतुदींच्या अंतर्भाव केला आहे. या कायद्यात अवयवदान कोण करू शकतो, मस्तिष्क स्तंभ मृत मृत्यू कोण घोषित करू शकतो.
कोणते रुग्णालय अवयव काढण्यासाठी आणि प्रत्यारोपणासाठी सक्षम आहेत. मान्यताप्राप्त रुग्णालयातील शासनमान्य डॉक्टर्स अवयव काढणे व प्रत्यारोपणाचे काम करू शकतात, अशा तरतुदी या कायद्यात आहेत. मस्तिष्क स्तंभ मृत मृत्यू घोषित करण्यापूर्वी शासनमान्य डॉक्टर्सची ४ सदस्यांची समिती संबंधित रुग्णाची ६-६ तासांच्या अंतराने तपासणी करून मस्तिष्क स्तंभ मृत मृत्यूबाबतचा अहवाल सादर करतात. अवयवदानाचा संकल्प करून देशात विज्ञानाच्या साथीने ही चळवळ यशस्वी करूया. गरजूंचे आयुष्य उजळूया...

Web Title: Lets take resolution to donate organs and help needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.