पोस्टात हरवलेले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 04:03 AM2018-07-31T04:03:29+5:302018-07-31T04:04:46+5:30

परवा तुझा वाढदिवस झाला. पेपरात फोटो पाहिले. इतके वाईट फोटो आजवर मी पाहिले नव्हते. कुणी काढले रे ते? तुझ्यासारख्या फोटोग्राफरचे असले फोटो? वाढदिवस तुझा, पण नेमकं कोण कुणाला शुभेच्छा देतोय हेच कळत नाही!

 Letters lost in the post | पोस्टात हरवलेले पत्र

पोस्टात हरवलेले पत्र

Next
<p>- नंदकिशोर पाटील


प्रिय दादूस,
सप्रेम नमस्कार!
परवा तुझा वाढदिवस झाला. पेपरात फोटो पाहिले. इतके वाईट फोटो आजवर मी पाहिले नव्हते. कुणी काढले रे ते? तुझ्यासारख्या फोटोग्राफरचे असले फोटो? वाढदिवस तुझा, पण नेमकं कोण कुणाला शुभेच्छा देतोय हेच कळत नाही!
मी देखील शुभेच्छा देण्यासाठी बांद्र्याला येणार होतो. पण माहिमला ट्रॅफिक जॅम असल्याने येऊ शकलो नाही. दादर ते बांद्रा तसंही खूप अंतर. त्यात मेट्रोच्या नावाखाली सरकारनं मुंबईतील सगळे रस्ते उखडून टाकलेले. शिवाय, फूटपाथवर जिथं-तिथं भैये पसरलेले. पायी चालणं मुश्कील तिथं गाडी कशी काढणार? मला सांग, कुणी मागितली होती रे यांना मेट्रो? कुणीही येतो अन् मुंबईवर हातोडा मारून जातो. अहमदाबाद, सुरत, गांधीनगरात का नाही खोदत? रस्ते खोदायची एवढीच हौस असेल, तर सीमेवरचे खोदा ना! अतिरेक्यांना घुसता येणार नाही. तुमच्या सोंगासाठी आमची मुंबई कशाला तोडताय? मराठी माणसाला गणपतीसाठी कोकणात जायला धड रस्ता नाही. मुंबई-गोवा महामार्ग कधीपासून उखडून टाकलाय. रोज अपघात होतात. माणसं मरतात. पण त्याचं कुणालाच सोयरसुतक नाही. कोकण रेल्वेत तर परप्रांतीयांचाच भरणा अधिक. पाय ठेवायलाही जागा नसते. मुंबईत तर जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. कधी कोणता पूल कोसळेल याचा नेम नसतो. सगळे कसे मराठी माणसांच्या जीवावर उठले आहेत.
दादू, तुला हे सगळं सांगण्यामागं कारण असं की, आपण आता सावध राहायला हवं. (आपण म्हणजे, फक्त तू अन् मी नव्हे!) गेली पंचवीस एक वर्षे तुझ्याकडे मुंबईची मुनसीपाल्टी आहे. काय दिवे लावले तिथे? मी बघ. अवघ्या पाच वर्षात नाशकाचा चेहरामोहरा बदलून टाकला. शहराच्या विकासासाठी नुसती सत्ता असून चालत नाही व्हिजन असावं लागतं. आता तू म्हणशील-‘नाशकात एवढा मनसे विकास झाला, तर मग लोकांनी का नाकारलं?’ तेच सांगतो. मराठी माणूस इथेच कमी पडतो. तिकडे बघ. गुजरातेत काही न करता तिथले लोक पुन्हा-पुन्हा त्यांना निवडून देतात. आपण सारे कपाळकरंटे. खेकडावृत्तीचे. एकमेकांचे पाय ओढण्यात वाक्बगार! अरे हो. खेकड्यावरून आठवलं. तुझा तो धाकटा चिरंजीव खेकड्यावर संशोधन करतोय म्हणे! धन्य आहे!! कुणी सुचवला रे हा विषय त्याला? स्वत:ला छावा म्हणवून घ्यायचं अन् फावल्या वेळात खेकडे पकडायचे!
जळलं मेलं लक्षण. पंतांची मुलं गगनचुंबी टॉवर उभारताहेत अन् आपली मुलं खेकडे पकडताहेत...बरं दिसतं का हे? स्वर्गातदेखील बाळासाहेबांना वेदना होत असतील... तरी मी सांगत होतो. शिववडा काढू नको. वडापाव खाऊन मराठी तरुणांना भव्यदिव्य स्वप्नं कशी पडणार?
असो. दादू तू वाराणसीला जाणार आहेस म्हणे. मला सांग, कुणी दिली तुला ही आयडिया? जिवंतपणी कुणी काशी करतं का? काय करणार तिथं जाऊन, तर गंगेत डुबकी मारणार! पोहता येतं का? त्यापेक्षा अयोध्येला जा. राममंदिरासाठी जमविलेल्या विटा शाबुत आहेत का ते बघून ये. जमलंच तर एखादी वीट रचून ये. तेवढंच काहीतरी ‘काँक्रिट’ काम लोकांच्या लक्षात राहील.
वाढदिवसाच्या पुन:श्च शुभेच्छा!
तुझा भाऊ
-राज दादरकर


(तिरकस)

Web Title:  Letters lost in the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.