धर्म अन् राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 10:18 AM2019-06-12T10:18:34+5:302019-06-12T10:26:53+5:30

उदारमतवादी विचाराने आधुनिक समाजाचा पाया घातला आहे. पण अलीकडे इंग्लंड, युरोप, अमेरिका, चीन, मुस्लीम राष्ट्रे आणि भारत यातील सामाजिक आणि राजकीय चित्र उदारमतवादी विचारांच्या विरुद्ध असल्याचे दिसून येते.

liberalism is a philosophy about the meaning of humanity and society | धर्म अन् राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला अमान्य

धर्म अन् राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला अमान्य

googlenewsNext

- दत्ता दामोदर नायक

उदारमतवादी विचाराने (ज्याला इंग्रजीत Liberal thought असे म्हटले जाते) आधुनिक समाजाचा पाया घातला आहे. पण अलीकडे इंग्लंड, युरोप, अमेरिका, चीन, मुस्लीम राष्ट्रे आणि भारत यातील सामाजिक आणि राजकीय चित्र उदारमतवादी विचारांच्या विरुद्ध असल्याचे दिसून येते. अशावेळी उदारमतवादी विचारसरणी म्हणजे नेमके काय याचा ऊहापोह करणे गरजेचे ठरते.

उदारमतवादी विचारसरणी स्वातंत्र्य हे सर्वोच्च मानवी मूल्य मानते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला वैयक्तिक जीवनात हवे ते निर्णय घेण्याचे निर्णय स्वातंत्र्य, नागरी जीवनातले नागरी स्वातंत्र्य, राजकीय जीवनातले राजकीय स्वातंत्र्य, सांस्कृतिक जीवनातले अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला उदारमतवादी विचार प्राधान्य देतो. याचमुळे राजकारणात हुकूमशाही, फॅसिस्ट राजवटीचा उदारमतवादी विचारसरणी तिरस्कार करते आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करणाऱ्या लोकशाही राजवटीचे स्वागत करते. स्वातंत्र्याखालोखाल मानवी हक्क (human rights) आणि मानवी प्रतिष्ठा ((human dignity) ही मूल्ये उदारमतवादाला महत्त्वाची वाटतात.

समता हे मूल्य मानवांना उदारमतवाद, त्यात दर्जाची समता (equality of status) आणि संधीची समता (equality of opportunity) यांचा समावेश करते. विषम समाजाला संधीची समता उपलब्ध करण्यासाठी शिक्षणात आणि रोजगारात आरक्षणाचे तत्त्व उदारमतवादाने पुरस्कृत केलेले आहे. अमेरिकेत त्याला  Affirmative action असे म्हणतात.

उदारमतवादी तत्त्वज्ञान समाजातल्या कोणत्याही प्रतिगामी, मूलतत्त्ववादी (fundamentalist), जातीयवादी, अंधश्रद्धा, धर्मवादी विचारांच्या विरोधात असते. या तत्त्वज्ञानाचा पाया विज्ञाननिष्ठ, विवेकी व शास्त्रशुद्ध असतो. तो पुरोगामी व प्रगमनशील असतो. भूतकाळाच्या स्मृतिरंजनात हे तत्त्वज्ञान अडकून पडत नाही, त्याची दृष्टी मानवी समाजाच्या भविष्यकालीन क्षितिजाचा वेध घेते.
उदारमतवादी विचार सरकारी हुकूमशाहीकडे झुकणाऱ्या अति डाव्या आणि सरकारी हस्तक्षेपाला गैर मानणाऱ्या अति उजव्या अशा दोन्ही टोकांच्या आर्थिक तत्त्वज्ञानापासून दूर राहाते. अर्थव्यवस्थेत सरकारने कमीतकमी हस्तक्षेप करावा असे उदारमतवादी तत्त्वज्ञानाला वाटते.

उदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाला नागरिकांच्या खासगी मालमत्तेचा हक्क अबाधित राहावा असे वाटते. ग्राहकाला बाजारात निवडीचे स्वातंत्र्य असावे. त्यामुळे कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंवर अवास्तव सरकारी बंधने व कर असू नयेत.

आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्र्न हे हिंसेतून, युद्धांतून किंवा क्रांतीतून सोडविले जाऊ नयेत तर ते संवादांतून, चर्चेतून, सुधारणांतून, प्रागतिक कायद्यांतून व प्रबोधनांतून सोडविले जावेत, असे उदारमतवादाला वाटते. उदारमतवाद व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य मान्य करतो. पण धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला मान्य नाही. त्या दृष्टीने उदारमतवादी तत्त्वज्ञान ईहवादी (सेम्पलर) आहे.
धर्मावर आधारलेले राजकारण जसे उदारमतवादी विचाराला पसंत नाही तसेच जात, पंथ, भाषा, अस्मिता या भावनिक प्रश्र्नावर राजकारण केले जाऊ नये असे उदारमतवादाला वाटते. राजकीय पथांनी विशेषत: निवडणुकांत प्रामुख्याने आर्थिक प्रश्र्नच हाताळले पाहिजेत, असे उदारमतवादी विचार मानतो.

एखाद्या देशात, प्रदेशात किंवा आस्थापनात कणखर नेतृत्व असले म्हणून त्या देशाची किंवा आस्थापनाची प्रगती होत नाही. त्या देशातील नागरिक किंवा त्या आस्थापनातील कर्मचारी किती कार्यक्षम आहेत त्यावर त्या देशाचे भवितव्य अधिक अवलंबून असते, असे उदारमतवाद मानतो.

उदारमतवादी विचार प्रागतिक करप्रणालीचा पुरस्कार करतो. उदाहरणार्थ जमिनीवर कर असावेत असे त्याला वाटते. म्हणजे जमिनी विकसित होतील. भूखंडावर घरे बांधली जातील. घरांची समस्या कमी होईल याचप्रमाणे वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीवर व मालमत्तेवर कर (इस्टेट ड्युटी) असावा, असे उदारमतवादाला वाटते.

मानवी बुद्धिमत्ता, कल्पकता, उद्योजकता, सामूहिक पुरुषार्थ यांच्या बळावर जागतिक प्रश्र्न सोडविणे कठीण नाही असा आशावाद उदारमतवादी विचार जोपासतो.
 

Web Title: liberalism is a philosophy about the meaning of humanity and society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.