ध्यास हिरवाईचा

By admin | Published: May 6, 2015 05:28 AM2015-05-06T05:28:56+5:302015-05-06T05:28:56+5:30

तरुणाईने मनात आणले तर काय होऊ शकते, हे ‘प्रयास’ कामातून स्पष्ट होते. या तरुणांनी हिरवे स्वप्न पाहिले आणि साकारही केले.

Lick | ध्यास हिरवाईचा

ध्यास हिरवाईचा

Next

साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रवि चौधरी नावाचा तरुण प्रजासत्ताक दिनाच्या एनसीसी संचलनासाठी दिल्लीला गेला होता. राष्ट्रपती भवनातील मेजवानीप्रसंगी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाषणातून प्रेरणा घेत त्याने काही तरी वेगळे करण्याचा ध्यास घेतला. वेगळे काय करावे यातून पर्यावरण रक्षणाची कल्पना पुढे आली. सुभाष चव्हाण हा मित्र साथीला होता. औरंगाबाद शहरातील विद्यापीठ परिसरात असलेल्या गोगाबाबा टेकडीवर ट्रेकिंग करीत असताना, त्यांनी तो परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचे काम हाती घेतले आणि हळूहळू मित्रांचा हा कंपू पर्यावरणाची चळवळ बनत गेला, तसा गोगाबाबा विद्यापीठाचा डोंगर प्लास्टिकमुक्त होत गेला. वर्षभर यात गेले आणि पुढे कल्पना सुचली, झाडे लावण्याची. पहिल्या वर्षी २५ झाडे लावली; पण जगले एक. मात्र, यामुळे या तरुणांनी नाउमेद न होता १०० झाडे लावली आणि वर्षभर त्यांची निगा राखली. ९९ झाडे जगली तसा यांचा उत्साह वाढला. त्याच वेळी आपली ओळख असावी म्हणून ‘प्रयास युथ फाउण्डेशन’ असे नामकरण झाले.
‘प्रयास’ने उद्दिष्ट ठेवले हा परिसर पाच वर्षांत हिरवा करण्याचे. याच पाच वर्षांत बाहेरून कोणतीही मदत न घेता ‘प्रयास’च्या युवकांनी या परिसरात थोडीथोडकी नव्हे, तर ७०० झाडे लावली, जगविली आणि वाढविली आहेत. युवक काय करू शकतो याचे हे उदाहरण. आज या चळवळीत ५० जण सक्रिय आहेत. दर रविवारी सकाळी ६ वाजता गोगाबाबा टेकडी परिसरात हे युवक एकत्र येतात आणि या झाडांना पाणी घालणे, त्यांची निगा राखण्याचे काम करतात. यासाठी त्यांना तीन ते साडेतीन हजार लिटर पाणी लागते आणि हे पाणी ते हातपंपाने उपसतात आणि बादली भरून झाडाला टाकतात. हे श्रमदान नियमित चालू असते.
बकऱ्या, जनावरे खाणार नाहीत अशा झाडांची निवड करणे, देशी झाडेच लावणे हा आग्रह असल्याने करंज, काशीद या झाडांची निवड केली; पण वड, पिंपळ अशा झाडांचाही विचार केला. प्रत्येक झाडाला टॅग लावून त्याच्या वाढीचे निरीक्षण करणे, त्याला खतपाणी देत निगा राखणे, या सर्वांची नोंद ठेवण्याचे कामही चालू केले. त्याचे फलित म्हणजे या ओसाड माळरानावर ७०० झाडे जगली असून, येत्या दोन-पाच वर्षांत हा परिसर हिरवागार दिसेल; पण हा प्रवास सोपा नव्हता. या काळात जनावरांनी झाडांचे नुकसान केले, विघ्नसंतोषी मंडळींनी झाडे उपटून फेकली. या सर्व संकटांवर मात करीत हा परिसर हिरवा करण्याचा ध्यास
‘प्रयास’ने घेतला.
‘प्रयास’ची काही मंडळी शिक्षण, नोकरीनिमित्ताने बाहेर गेली; पण मनाने आजही ती झाडांसह सदस्यांशी जोडलेली आहे. अनेकजण ‘आपल्या’ झाडांची चौकशी करतात. ‘प्रयास’मध्ये प्रवेश मिळविणे सोपे नाही. नवीन सदस्य आला तर किमान चार आठवडे त्याच्या सहभागावर निरीक्षण असते. श्रमदान करतो का? येण्याचा उद्देश काय? खरोखरच अशा कामाची आवड आहे का? याची खातरजमा केली जाते. श्रमदानामुळे हौशी मंडळी टिकाव धरीत नाहीत. कारण येथे प्रथम श्रमदान आणि नंतर चर्चा असा नियम आहे. या सर्व कामांसाठी निधी उभारण्याची अनोखी पद्धत आहे. रविवारी १० मिनिटे उशिरा येणाऱ्यांना १० रुपये दंड आकारला जातो. शिवाय वाढदिवस, विवाह अशाप्रसंगी ‘प्रयास’ला देणगी मिळते. यातूनच खर्च चालतो. आज ‘प्रयास’ तरुणांचा असला तरी शाळकरी मुलांपासून ते निवृत्त झालेल्या मंडळींपर्यंत यात सहभागी आहेत. तरी १८ ते २५ वयोगटातील ९० टक्के सदस्य दिसतात. रवि चौधरी, प्रीतेश गवस, सपना कुलकर्णी, ऋचिता वझूरकर, सुमित तीर्थ, ऋषिकेश लोळगे, संदीप इंगळे ही ‘प्रयास’ची कोअर टीम.
याशिवाय हा गट वृक्षतोड रोखण्याचेही काम करतो. शहरात कोठे वृक्षतोड होत असेल तर यांना त्वरित माहिती मिळते. कारण यांनी आपले ‘नेटवर्क’ तयार केले आहे. लगेचच ही माहिती संबंधित खात्याला कळविली जाते. याशिवाय रक्तदान शिबिर आयोजित करणे, शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, पक्षिनिरीक्षण, फटाक्यांविना दिवाळी, पर्यावरणपूरक होळी असेही उपक्रम हाती घेणाऱ्या या तरुणाईने हिरव्या स्वप्नाचा ध्यास घेतला आहे.
- सुधीर महाजन

Web Title: Lick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.