जिवाला धोका!

By admin | Published: January 18, 2016 12:12 AM2016-01-18T00:12:05+5:302016-01-18T00:12:05+5:30

राजधानी दिल्लीतील सम-विषम प्रयोगासंदर्भात अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रियांचे पेव फुटले असताना, समोर आलेला ग्रीनपीस इंडिया या संघटनेचा एक अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

Life risk! | जिवाला धोका!

जिवाला धोका!

Next

राजधानी दिल्लीतील सम-विषम प्रयोगासंदर्भात अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रियांचे पेव फुटले असताना, समोर आलेला ग्रीनपीस इंडिया या संघटनेचा एक अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. राजधानीत हिवाळ्यात हवेमध्ये कर्करोगाला चालना देणाऱ्या अतिसूक्ष्म धातूकणांचे प्रमाण प्रचंड असल्याचे ग्रीनपीसने केलेल्या शास्त्रीय अभ्यासात आढळून आले आहे. हवेत उडत असलेल्या, २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी जाडीच्या अतिसूक्ष्म कणांना ‘पीएम टू पॉइंट फाइव्ह’ या लघु नावाने ओळखले जाते. या कणांमध्ये नेमके कोणते घटक असतात याचा शोध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. त्यासाठी दिल्लीतील विविध शाळांमधील वर्गखोल्यांमधील संगणकांच्या पडद्यांवरील नमुने घेण्यात आले. अभ्यासाच्या निष्कर्षानुसार वर्गखोल्यांमधील हवा भारतीय सुरक्षा मानकांच्या तुलनेत पाचपट, तर जागतिक आरोग्य संघटनेद्वारा निर्धारित मानकांच्या तुलनेत तब्बल अकरापट घातक आढळली! नमुन्यांमध्ये आर्सेनिक, शिसे, निकेल, मँगनिज, क्रोमियम आणि कॅडमियम या जड धातूंचे प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर असल्याचे या अभ्यासातून निष्पन्न झाले. ‘पीएम टू पॉइंट फाइव्ह’ कण फुफ्फुसांमध्ये शिरतात आणि त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते. एवढेच नव्हे तर हे कण धमन्यांच्या आतमध्ये प्रवेश करून तिथे तळ ठोकतात आणि त्यामुळे धमन्या ताठर होऊन ह्वदयविकाराचा धोका निर्माण होतो, असे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. या कणांपैकी शिसे आणि मँगनिजच्या कणांमुळे मुलांचा विकास खुंटतो, तर आर्सेनिक, निकेल, क्रोमियम आणि कॅडमियमच्या कणांमुळे कर्करोगाला चालना मिळते. या अतिसूक्ष्म कणांमुळे एकट्या अमेरिकेत इसवी सन २००० पासून दरवर्षी किमान २२ हजार ते ५२ हजार नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. भारतातील हा आकडा
निश्चितच किती तरी मोठा असेल. हे कण हवेत मिसळतात तरी कसे, या प्रश्नाचे उत्तर आहे खनिज तेल व कोळशाचे ज्वलन! वीज निर्मितीसाठी भारत विकसित देशांच्या तुलनेत किती तरी जास्त प्रमाणात कोळशाचे ज्वलन करतो आणि प्रचंड लोकसंख्या व कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी भारतातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या खूप मोठी आहे, हे लक्षात घेतले म्हणजे भारतीयांचा जीव किती मोठ्या संकटात आहे, हे सहज ध्यानात यावे!

Web Title: Life risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.