गंगूबाई काठियावाडीच्या जगण्याची चित्तरकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:35 AM2022-02-23T07:35:27+5:302022-02-23T07:35:54+5:30

गंगूबाई मोठ्या जिद्दीची बाई होती. तिचे जगणे आणि तिचा काळ पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या भोवती उभी केली जाणारी वादाची वादळेही घोंघावत आहेत!

Life story of Gangubai Kathiawadi sanjay leela bhansali new upcoming movie about her life and struggle | गंगूबाई काठियावाडीच्या जगण्याची चित्तरकथा

गंगूबाई काठियावाडीच्या जगण्याची चित्तरकथा

googlenewsNext

राही भिडे, मुक्त पत्रकार
अलीकडच्या काळात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच गाजायला लागले आहेत. चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांचा आपोआप प्रतिसाद मिळतो. पण जाहिरातबाजीवर अमाप खर्च करूनही अनेकदा चित्रपटांना प्रतिसाद मिळेल, याची हमी नसते. त्याऐवजी कशावरून तरी वाद निर्माण करून, चित्रपटाची मोफत प्रसिद्धी करण्याचा ट्रेंडही आता जुना  झाला आहे. यापूर्वी ऐतिहासिक चित्रपटावरून वाद झाले होते, आता त्यात गंगूबाई काठियावाडीची भर पडली आहे.

संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्धीपूर्वीच  वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 
गंगूबाई काठीयावाडी यांना मुंबईच्या इतिहासात काही एक स्थान आहे. त्यांचे वास्तव्य मुंबईतील कामाठीपुऱ्यात होते. दक्षिण मुंबईतील छोट्या घरांच्या दाटीवाटीने बनविलेल्या चाळींचे काही भाग, त्यातील कामाठीपुरा. बदनाम बस्ती अशी ओळख असलेला. दलालांनी भुलवून देहविक्रयासाठी येथे आणून टाकलेल्या मुली, त्यांचे  शोषण हे या जगाचे वास्तव.  देहविक्रयाच्या बाजारात उभ्या केल्या गेलेल्या या स्त्रियांसाठी गंगूबाईंनी मोठे सामाजिक कार्य उभे केले. त्यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी संघर्ष केला. कामाठीपुऱ्यातील १२ व्या गल्लीतील रेशमवाली चाळीत त्यांचा दरबार भरायचा. त्यांच्यावरच्या चित्रपटावरून सुरू झालेला वाद आता उच्च न्यायालयात गेला असला, तरी गंगूबाईंबद्दलच्या काही सुरस कथा आहेत. बबिता ही त्यांची कथित मुलगी. हुसैन झैदी यांनी गंगूबाईंवर लिहिलेल्या पुस्तकातील काही तपशिलाबाबत बबिता आणि अन्य कुटुंबीयांचे आक्षेप आहेत. बबिता म्हणते, ‘गंगूबाईने मला मोठे केले, लग्न करून दिले. आम्ही लहानपणापासून त्यांच्याशी जोडलेलो होतो.’

कामाठीपुरा येथील मुलींना काही अडचण आली की गंगूबाई पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना सोडवत असे. गंगू हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आली होती. पण  इथल्या दलदलीत ती अडकली आणि तिच्या जगण्याला वेगळेच वळण लागले. नववीपर्यंत शिकलेल्या गंगूला वाटले, माझे आयुष्य खराब झाले आहे, पण आता मी सर्वांसाठी जगेन!’ याच भावनेतून तिने अनाथांसाठी काम सुरू केले. वेश्याव्यवसायातील काही मुलींची लग्ने लावून दिली. रेड लाईट एरियातील  सर्व मुलींची ती आई बनली.  करीम लालाच्या टोळीतील लोक कामाठीपुऱ्यातील मुलींची छेड काढत असल्याची तक्रार घेऊन ती करीम लालाला भेटली होती. लालाने गंगूबाईंना आपली बहीण मानले.

त्यावेळेस  कामाठीपुरामधून वेश्याव्यवसाय हटविण्यासाठी आंदोलनही झाले होते. सर्व मुली गंगूबाईकडे आल्या. त्यानंतर गंगूबाईंनी आझाद मैदानावर भाषण केले. परिसरातील मुलींसाठी लाल दिवा उभा राहिला.  गंगूबाई अनेक मुलींसोबत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटायला गेल्या.  असे सांगतात की, पंडितजी त्यांना म्हणाले, लग्न करा आणि या जगातून दूर जा! त्यावर तात्काळ गंगूबाई म्हणाल्या, आपण मला पत्करता का? मी लग्नाला तयार आहे! - हे ऐकून नेहरू स्तब्ध झाले आणि त्यांनी गंगूबाईंच्या विधानाशी असहमती दर्शविली. तेव्हा गंगूबाई म्हणाल्या, पंडितजी, तुम्ही रागावू नका. मला फक्त माझा मुद्दा सिद्ध करायचा होता. उपदेश करणे सोपे आहे, परंतु स्वीकारणे कठीण आहे. 

- बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगूबाईंना वचन दिले, की ते त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देतील. खुद्द पंतप्रधानांनी मध्यस्थी केल्यावर कामाठीपुरा येथील वस्ती वाचली, असे सांगितले जाते. आगामी चित्रपटात गंगूबाईंची व्यक्तिरेखा  चुकीच्या पद्धतीने रंगविल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. बबिता म्हणते, माझी आई समाजसेवक होती. संपूर्ण आयुष्यभर तिने कामाठीपुरा येथील लोकांसाठी काम केले. चित्रपटाचे काम सुरू झाल्यापासून कुटुंब अडचणीत आले आहे!’ गंगूबाईची दत्तक नात भारती सांगते,  चित्रपटाची चर्चा सुरू होताच आम्हाला सतत घर बदलावे लागले. आम्ही समारंभांना जाऊ शकत नाही. हा कुठला न्याय?

गंगूबाईंची दत्तक मुलगी सुशीला शिवराम रेड्डी,  मुलगा बाबूरावजी शहा यांच्या मते, ‘निर्मात्यांनी चित्रपट बनविण्यासाठी गंगूबाईंच्या घरच्यांची संमती घेतलेली नाही! आमच्या आईने  १९४९ मध्ये चार मुले दत्तक घेतली होती. लोक आता त्यांना वेश्येची मुले म्हणू लागले आहेत!’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येते आहे, तशा या चर्चांना अधिक रंग भरू लागला आहे. आलिया भट्ट हिने या चित्रपटात गंगूबाईचे काम केले आहे. ट्रेलरमध्ये आलिया आझाद मैदानावर उभे राहून भाषण देताना दिसते. ते खूप प्रसिद्ध भाषण होते. - एक मात्र खरे की गंगूबाई ही मोठ्या जिद्दीची बाई होती. तिचे जगणे आणि तिचा काळ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: Life story of Gangubai Kathiawadi sanjay leela bhansali new upcoming movie about her life and struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.