आयुष्याची परीक्षा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:16 AM2018-06-05T03:16:28+5:302018-06-05T03:16:28+5:30

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात.

Life test is important | आयुष्याची परीक्षा महत्त्वाची

आयुष्याची परीक्षा महत्त्वाची

Next

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात. आपला मुलगा काही करण्यायोग्यच नाही, असा पालकांचा समज होतो तर अमूक महाविद्यालयातील प्रवेश हुकला म्हणजे स्वप्नांचा मार्ग खुंटला, असा विद्यार्थी विचार करतात. एकेका गुणांसाठी विद्यार्थी झगडताना दिसून येतात. त्यामुळे कमी गुण मिळाल्यानंतर सहाजिकच त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र अशा स्थितीत विद्यार्थ्यांना दूषणं देत बसण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. दुर्दैवाने याचा पालकांना विसर पडतो आणि त्यातूनच खचलेले विद्यार्थी नैराश्यात जातात, तर कुणी जीव संपविण्याचादेखील विचार करतात. आजकाल परीक्षा म्हणजे एक प्रकारची शर्यत झाली आहे. ज्याप्रमाणे शर्यतीत घोडे प्राणपणाने धावतात, अगदी त्याचप्रमाणे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्षभर इकडून तिकडे धावत असतात. मात्र या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. शिक्षणाच्या घोडेबाजारात विद्यार्थी अक्षरश: भरडले जातात. दुसऱ्या अंगाने विचार केला तर काळाचीदेखील ही गरज म्हटल्या जाते. अशा स्थितीत शिक्षणाचे धडे देत असताना पालकांनी विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यासाठीदेखील तयार केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात यश-अपयश, पास-नापास अशी वर्गवारी असते. गुणवंतांच्या कौतुकात नापासांचे अपयश समाजाच्या कुचेष्टेचा, उपेक्षेचा विषय ठरत असते. समाजात त्यांना कुठलीही प्रतिष्ठा मिळत नाही. त्यांच्या प्रतिष्ठेची वर्गवारी समाजच परस्पर ठरवून टाकतो, ही मानसिकता आता बदलायला हवी. यात आई-वडिलांनाही बदलावं लागेल. बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नव्हे हे पालकांनीदेखील समजून घेणे आवश्यक आहे. बारावीत अपयशी ठरल्यानंतरही इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया अशा कितीतरी माणसांची नावे सांगता येतील. अपयशातूनच यशाचा महामार्ग गवसतो. अनेकांनी तो शोधला आहे. त्यामुळे निराश न होता आत्मविश्वासानं सामोरे जाण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. केवळ एका परीक्षेतील अपयश विद्यार्थ्यांमधील कर्तृत्वाला हिरावून घेऊ शकत नाही. स्पर्धेत दुसरा हारतो म्हणूनच पहिला जिंकतो. आयुष्य प्रत्येक वळणावर परीक्षा घेत असते. त्यामुळे दहावी-बारावीपेक्षा आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाणे जास्त महत्त्वाचे ठरते.

Web Title: Life test is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा