ज्वालामुखीतल्या प्रवासाचा जीवघेणा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:42 AM2021-03-16T04:42:24+5:302021-03-16T04:44:38+5:30
इथियोपिया येथील उकळत्या लाव्हारसाचा तलाव दोरीच्या साहाय्यानं पार करण्याचं एक अतिशय कठीण आणि जीवघेणं साहस तिनं नुकतंच पार पाडलंय. त्याबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिचं नाव नोंदवलं गेलंय.
करिना ओलियानी. ब्राझीलची तरुणी. पेशानं डॉक्टर, पण आव्हानांना अंगावर घेण्याची आणि त्यांच्याशी झुंजायची तिची सवय लहानपणापासूनचीच. साहसी खेळांसाठी ती ब्राझीलमध्ये प्रसिद्ध आहे. कुठलंही आव्हान दिसलं की तिला ते खुणावतंच आणि त्या दिशेनं ती झेपावते. जगावेगळं काही तरी करायचं हा तिचा नेहमीचा सोस आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. ती म्हणते, आव्हानं हीच माझी प्रेरणा आहे. ती जर माझ्या आयुष्यात नसती तर माझं आयुष्यच एकदम मचूळ आणि बेचव झालं असतं. (The life-threatening thrill of a volcanic journey)
इथियोपिया येथील उकळत्या लाव्हारसाचा तलाव दोरीच्या साहाय्यानं पार करण्याचं एक अतिशय कठीण आणि जीवघेणं साहस तिनं नुकतंच पार पाडलंय. त्याबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिचं नाव नोंदवलं गेलंय. साहसांशी खेळणाऱ्या करिनानं यापूर्वी माऊंट एव्हरेस्टवरही दोनदा यशस्वी चढाई केली आहे. तीही एकदा उत्तर बाजूने, तर दुसऱ्यांदा दक्षिण बाजूने. शार्क माशांबरोबर स्वीमिंग केलंय. ॲनाकोंडाबरोबर डाइव्ह केलंय. विमानाच्या पंखांवर स्वार होऊन गरुडभरारीही घेतली आहे. जगातल्या अनेक दुर्गम भागांत जाऊन तिथल्या वाइल्डलाइफच्या संवर्धनाचं काम केलं आहे. वाइल्डलाइफ फिजिशिअन म्हणून ती प्रसिद्ध आहे. स्वत: डॉक्टर आणि स्वत:चं हेलिकॉप्टर तसंच स्वत:ची टीम असल्यानं जगाच्या अतिशय दुर्गम भागात जाऊन तिथल्या लोकांवर तिनं उपचारही केलेत.
पण या वेळी तिनं जो कारनामा केला, तो केवळ खतरनाक, असंभव आणि धाडसीच नव्हता, तर प्राणांशी अक्षरश: गाठ असणारा होता. इथियोपियाच्या अफार प्रांतात एर्टा आले नावाचा जिवंत ज्वालामुखी आहे. या ठिकाणी कायम उकळता लाव्हारस वाहात असतो आणि या ठिकाणचं तापमान कायम ११८७ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक असतं. पृथ्वीवरचा तो सर्वांत उष्ण भाग मानला जातो.
हा ज्वालामुखी दोराच्या सहाय्यानं पार करताना तिनं तब्बल ३२० फुटांचं अंतर कापलं. हा खरोखरच प्राणाशी खेळ होता; कारण एवढ्या उष्णतेत होरपळून आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं जीव जाण्याची शक्यता खूप मोठी होती. अनेकांनी तिला या साहसापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण जिद्दीनं तिनं हे साहस पार केलं आणि असं करणारी ती जगातली पहिली व्यक्ती ठरली. अर्थातच त्यासाठी विशिष्ट प्रकारचा सूट, हेल्मेट, ऑक्सिजन सिलिंडर या साऱ्या गोष्टी तिला जवळ बाळगाव्या लागल्या. त्यापेक्षा आणखी एक मोठं आव्हान होतं ते म्हणजे त्यासाठीचा दोर बांधण्याचं. हा दोरही उष्णतेनं विरघळणारा किंवा वजनामुळे खाली येणारा असा नको होता. त्यासाठी एक्सपर्ट टीमची आवश्यकता होती. त्यातलं इंजिनीअरिंग अचूक हवं होतं. पण, हा सारा प्रकार जीवघेणा असल्यानं या क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांनी त्यासाठी तिला चक्क नकार दिला.
कॅनेडियन विशेषज्ञ फ्रेडरिक श्यूटचा मात्र करिनावर पूर्ण भरोसा होता. हे आव्हान ती कुठल्याही परिस्थितीत पार पाडीलच यावरही त्यांचा विश्वास होता. त्यामुळे श्यूट यांनी करिनाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारं परफेक्ट साहित्य उपलब्ध करून दिलं. हे खतरनाक आव्हान करिनानं फार एन्जॉय केलं. लाव्हारसातून निघणाऱ्या उष्णतेमुळे तेवढ्या प्रचंड तापमानात टिकू शकेल अशा प्रकारचा हिट सूट तिला घालावा लागला. करिना सांगते, “ज्वालामुखीच्या मध्यावर आल्यानंतर मात्र जे दृश्य मला दिसलं ते खरोखर डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. त्या सौंदर्याचं वर्णन मी शब्दांत करू शकत नाही.”
आव्हानांना खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या करिनाचा हा प्रवास थोडा सोपा होतो, कारण अनेक क्षेत्रांत तिला गती आहे. तिच्याकडे हेलिकॉप्टर तर आहेच, पण ते उडवण्याचं लायसन्सही तिच्याकडं आहे. एवढंच नव्हेतर, त्यासंदर्भाचं पायलट ट्रेनिंगही ती देऊ शकते. त्याचाही परवाना तिच्याकडे आहे. त्यामुळे आव्हानांशी भिडायला जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाणं तिला शक्य होतं. तिच्या मते निसर्ग हाच तिच्यासाठी प्रेरणास्थान आहे. करिना सांगते, शहर सोडून मी जेव्हा जेव्हा सागराच्या पोटात शिरते, उंचंच उंच डोंगरमाथ्यांना स्पर्श करण्याच्या प्रयत्न करते, जंगलातल्या अनोख्या वाटा धुंडाळताना दिवसचे दिवस फिरते, जंगली प्राण्यांच्या दर्शनानं स्वत:चं अस्तित्व विसरते, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मला ‘घरी’ आल्यासारखं वाटतं आणि या साऱ्या गोष्टी मला प्रचंड प्रेरणा देऊन जातात.
जगभरातील महिलांच्या स्वप्नांचा प्रवास
वयाच्या बाराव्या वर्षी करिनानं पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंगचा क्लास लावला आणि तेव्हापासून तिच्या साहसांना सुरुवात झाली. त्यात तिनं उत्तम कौशल्य मिळवलं. त्यानंतर जलतरणानं तिला आकर्षित केलं. वयाच्या १७व्या वर्षापर्यंत दोन वेळा ती ब्राझिलियन वेकबोर्ड चॅम्पियन तर तीन वेळा स्नो बोर्ड चॅम्पियन बनली. जंगलं, डोंगर, समुद्र हे तर जणू तिचं घरच होतं. “माझा प्रवास म्हणजे जगभरातील महिलांच्या स्वप्नांचा प्रवास आहे असं मला वाटतं,” असं करिना सांगते.