प्रापंचिकाची जीवननिष्ठा
By admin | Published: January 26, 2015 03:40 AM2015-01-26T03:40:31+5:302015-01-26T03:40:31+5:30
आज मानवी जीवन कितीतरी दिशांनी विखुरलं आहे. नाना रूपांनी, नाना रंगांनी नि नाना ढंगांनीही! एकदा एका साधूनं आपल्या शिष्यांना सांगितलं
डॉ. कुमुद गोसावी -
आज मानवी जीवन कितीतरी दिशांनी विखुरलं आहे. नाना रूपांनी, नाना रंगांनी नि नाना ढंगांनीही!
एकदा एका साधूनं आपल्या शिष्यांना सांगितलं की, ‘यावर्षी गुरु-पूजनाचा भव्य सोहळा करायचा आहे. तेव्हा त्यासाठी जो जेवढं अधिक दान देईल त्याच्या दहापटीनं देव तुम्हाला फळ देईल नि सर्वाधिक दान देणा-याच्या हातून गुरुपूजन होईल.’
गुरुपूजनाच्या मुहूर्तापूर्वी प्रत्येकाने अधिकाधिक दान सोन्या-चांदीसह साधूंना दिलं! सर्वात शेवटी एक वृद्धा काठी टेकत टेकत आली. तिनं ओंजळभर फुलं त्यांना दिली. आपल्या फाटक्या-तुटक्या लुगड्याच्या कनवटीतून काढलेली चुरगळलेली दहा रुपयांची नोट त्यावर ठेवून ती अर्पण करताना म्हणाली, ‘‘साधुबाबा! एवढंच होतं माझ्यापाशी! ते दिलं या म्हातारीनं!’’
भरल्या डोळ्यांनी तिनं साधूंच्या चरणी माथा टेकला! सर्व जण उत्सुक होते आता गुरुपूजनाचा मान कोणाला मिळणार? साधू म्हणाले, ‘‘आजीबाई ! मला जे हवे होते, जेवढे हवे होते, तेवढे मिळाले! तेव्हा लोकहो! गुरुपूजन या आजीबार्इंच्या हातून होणार! दात्यांनो! तुम्ही तुमच्याकडे जे होतं त्यातील काही भागाचं दान दिलं! मात्र या आजीबार्इंनी तर त्यांच्याकडे जे होतं ते निष्काम भावानं सगळंच देऊन टाकलं. आता तुम्हीच सांगा श्रेष्ठ दान कोणाचं!’’ लोक निरुत्तर झाले.
प्रापंचिकांना काय वा पारमार्थिकांना काय, अध्यात्माची भाषा आधी कळायलाच हवी. मनाची भाषाच देवाची मातृभाषा असल्यानं देवाला वा साधूला हृदयाची भाषाच कळते. वृक्ष जसे कुऱ्हाडीचे घाव सोसूनही बदला वा सुडाची भावना न राखता आपल्याला सर्वार्थानं उपयोगी पडत दातृत्वाचा वस्तुपाठ देतात, तसे आपण त्यांना काय देतो?
विश्व हेच माणसाचं खरं श्रद्धास्थान आहे. त्याला आपण जे जे देऊ ते
ते दुपटीनं आपल्याला देत असतं.
आपले गोड शब्द, प्रेम, ममता याचं
जे एक चराचराशी नातं जडतं, तेच
तर आपल्याला आयुष्यभर कामी
येतं. नशिबाच्या कडवेपणातही आयुष्याचं मधुर गाणं गुणगुणणं बळ देत राहतं..
सांगे कुमुद दळाचेनि ताटे।
जो जेविला चंद्रकिरणे चोखटे।
तो चकोरू काई वाळवंटे।
चुंबितु आहे (ज्ञाने. ५.१०७)
असं संत ज्ञानदेव माउलीनेही सांगून ठेवलंय ते ध्यानी घ्यायला हवं, नाही का? चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राचंच चांदणं पिऊन जगतो; पण त्यानं कोजागरीच्या पौर्णिमेला पूर्ण चंद्रविकासी कमळाच्या पाकळीत बसून भोजन घ्यायचं सोडून वाळूचे कण चाटण्यात काय आनंद मिळणार?