गांधीजींच्या वैज्ञानिक दृष्टीच्या प्रकाशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:01 AM2019-02-28T06:01:51+5:302019-02-28T06:01:53+5:30
गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त २८ फेब्रुवारी व १, २ मार्च, २०१९ला सेवाग्राम येथे ‘गांधी-विज्ञान संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. विज्ञान ...
गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त २८ फेब्रुवारी व १, २ मार्च, २०१९ला सेवाग्राम येथे ‘गांधी-विज्ञान संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टी हे आपल्या सहज वापरातले शब्द आहेत, पण विज्ञानाकडे बघण्याचे गांधीजींचे वेगळेपण समजून घेण्याचा आणि कालसुसंगत दृष्टीने त्याचे उपयोजन करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. गांधी-विज्ञान संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, गांधीजी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान आणि भारतीय समाजाचा विकास, याकडे कसे बघते, यावर विवेचन करण्याचा हा प्रयत्न.
गांधीजींनी स्वत:च्या जीवनाला ‘सत्याचे प्रयोग’ म्हटले आहे आणि ते प्रयोग पूर्ण पारदर्शकतेने लोकांसमोर मांडले आहेत. जसजसे सत्याचे स्वरूप त्यांच्यासमोर उलगडले, तसतसे त्यांचे विचार व जीवन बदलत गेल्याचे आपण बघतो. त्यांच्या संपूर्ण जीवनाला व्यापणारे तत्त्व होते ते सर्वोदयाचे. बहुजनांचे नव्हे, तर सर्व मानवांचे कल्याण हेच सनातन तत्त्व त्यांनी बाळगले व त्या दिशेने आयुष्यभर चिंतन व प्रयोग केले, स्वत:च्या व्यक्तिगत जीवनात व सामाजिक जीवनातही. समता व न्यायावर आधारलेला शोषणविहीन नवसमाज घडविण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी गरजा आणि स्वार्थ यात फरक करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्टपणे मांडली. ‘या पृथ्वीकडे सर्वांची गरज भागविण्याएवढी संसाधने नक्कीच आहेत, पण मानवाच्या अमर्याद भोगलालसा पूर्ण करण्याची क्षमता तिच्यात नाही, असे जेव्हा गांधीजी म्हणतात, तेव्हा त्याला संदर्भ असतो, तो युरोपीयन लोकांनी उर्वरित जगावर राज्य करीत तेथील संसाधनांची केलेली लूट, त्याआधारे तेथे निर्माण झालेली समृद्धी आणि यातून आकाराला आलेली औद्योगिक क्रांती, यांचा.
हे खरेच की, या समृद्धीतून मानवी जिज्ञासेला, संशोधकतेला मोठा वाव मिळाला, विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्हीचा वेगाने विकास झाला, पण हेदेखील तेवढेच खरे की, हे वैज्ञानिक संशोधन व वैज्ञानिकांची जिज्ञासावृत्ती अधिकाधिक सत्ता व उपभोगाच्या लालसेतून वापरली गेली. सत्यशोधनाची नैसर्गिक मानवी प्रेरणा व मानवकल्याणाचे जीवनमूल्य यांची फारकत झाली. गांधीजी जीवनाकडे एकात्मतेने बघतात. त्यामुळे ते सर्व मानवजातीच्या कल्याणाच्या नैतिक प्रेरणेपासून राजकारण, अर्थकारण, समाजकारण यासोबतच विज्ञानालाही मुक्त ठेवत नाहीत.
मर्यादित अशा खनिजऊर्जेच्या आधारे होणारे केंद्रिभूत औद्योगीकरण, त्यातून होणारे प्रचंड उत्पादन, नफेखोरी व बाजारव्यवस्था, प्रचंड शहरीकरण ही वैज्ञानिकतेच्या आधारेही अशाश्वततेकडे नेणारी, विषमता निर्माण करणारी आहे, हे सहजपणे समजणे आज शक्य आहे. या भांडवली बाजारव्यवस्थेने मानवी सुखाची कल्पना त्याच्या अधिकाधिक उपभोगाशी जोडली. गांधीजी माणसाची ओळख त्याच्या उपभोगाच्या आधारे होणे नाकारतात, त्याच्या इतर माणसांशी व निसर्गाशी आत्मभावनेने जोडून घेण्यात त्यांना माणुसकीचे दर्शन होते. स्वत:च्या जगण्याच्या इच्छेइतकाच प्रत्येक माणसातील जीजीविषेचा सन्मान करणे, समाजातील सर्वात शेवटच्या माणसासह आत्मीयतेने जोडले जाणे, यात माणसाचे माणूसपण ते बघतात. म्हणूनच सगळ्यांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण होत नसताना उपभोगाची चैन करणे त्यांना अनैतिक वाटते.
जेव्हा मानवी व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करून त्याची सूक्ष्म वीण विस्कटून टाकतात, तेव्हा निसर्गातील या व्यवस्थांचीच हानी होते, असे नाही, तर मानवी अस्तित्वही धोक्यात येते. आज प्रचंड प्रमाणावर माती, पाणी, हवा, अन्न अशा सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या आहेत, आपल्या हव्यासापायी निसर्गातील समृद्ध विविधता बेपर्वाईने संपवायला निघालो आहोत. पृथ्वीच्या तापमान वाढीने तर मानवी अस्तित्वासमोर गंभीर संकटांची मालिकाच उभी झाली आहे. गांधीजींच्या सर्वोदय विचारात सर्वांचे हित व्हावे व सर्वांच्या गरजांची टिकावू पद्धतीने पूर्ती होऊ शकेल, एवढेच निसर्गाचे दोहन स्वीकारार्ह आहे, पण आपल्या अमर्याद हव्यासासाठी निसर्गाच्या विवेकहीन वापराला नकार आहे.
त्यासाठीच गांधीजी विकेंद्रित, छोट्या साधने व यंत्रांच्या साहाय्याने काम करणाऱ्या व बहुतांश मूलभूत गरजांबाबत स्वायत्त असणाऱ्या मर्यादित-साध्या व शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणाºया सहयोगी अहिंसक गाव-समाजाकडे आदर्श रूप म्हणून बघतात. अशा समाजात सरकारकडे मर्यादित सत्ता असावी आणि उत्पादनाची साधने प्रामुख्याने लोकांच्या हातात असावी, अशी त्यांची स्वराज्याची कल्पना आहे. यात काही शहरांनाही स्थान आहे, पण त्यात गावे आणि शहरे यांचा आज असणारा शोषित-शोषक असा संबंध त्यांना अपेक्षित नाही. शहरे ही ग्रामाभिमुख असावी, असे ते बघतात. मोठी लोकसंख्या असणाºया भारतासारख्या राष्ट्रात प्रत्येकाच्या हाताला सन्मानजनक काम देऊन सगळ्यांच्या गरजा नीटपणे पूर्ण करण्याजोगे मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढणे शक्य आहे, अशी त्यांची मांडणी आहे. या व्यवस्थेतील मानवी संबंध निर्भयतेचे, समता व न्यायावर आधारलेले असणे यांना अपेक्षित
आहे. या रचनेत बुद्धीचा उत्तम वापर करणारे, संशोधक वृत्तीने व स्वयंशिस्तीत जगणारे नागरिक गांधीना अपेक्षित आहेत.
- सुषमा शर्मा, संचालिका, नई तालीम,
सेवाग्राम