महाराष्ट्राचे दीपस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 04:06 PM2020-03-16T16:06:39+5:302020-03-16T16:12:34+5:30
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. रफिक झकेरिया या चार थोर नेत्यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे.या सर्वांनी विविध क्षेत्रात राजकीय नेता, सहकार चळवळीतील मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील जाणकार म्हणून भरीव कामगिरी केली आहे. या चारही नेत्यांच्या कार्याविषयी...
वसंत भोसले
महाराष्ट्र विधानमंडळाने स्थापन केलेल्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राने नुकताच एक आगळावेगळा कार्यक्रम घेतला. महाराष्ट्राच्या वाटचालीत भरीव योगदान दिलेल्या चार महनीय व्यक्तींच्या जन्मशताब्दीनिमित्त गौरव करणारा तो कार्यक्रम होता. चालू वर्ष हे महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात सदस्य राहिलेले तसेच अनेकवेळा मंत्रिपद भूषवून ऐतिहासिक निर्णय घेतलेल्या चार व्यक्तींचा हा गौरव होता. त्यात माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. रफिक झकेरिया यांचा समावेश होता. या सर्वांनी विविध क्षेत्रात राजकीय नेता, सहकार चळवळीतील मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील जाणकार म्हणून भरीव कामगिरी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ भवनात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वाटचालीचा आणि या ज्येष्ठांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यात आला.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासाला अनेक संदर्भ आहेत. शिवाय मराठी भाषकांच्या या राज्याच्या समाजजीवनाचे प्रतिबिंबदेखील विधिमंडळाच्या इतिहासात उमटलेले दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केलेले छोटेखानी भाषण खूप चांगले होते. ते म्हणतात की, ‘‘हा महाराष्ट्र घडला कसा आणि कोणी घडविला, हा वारसा आम्हाला कोणी दिला याचे सातत्याने विचारमंथन व्हायला हवे. कारण महाराष्ट्र घडविणारी ही माणसं मोठी होती आणि त्यांचे नेतृत्व हे दीपस्तंभासारखे होते. हीरकमहोत्सवानिमित्त आणि या चार नेत्यांच्या जन्मशताब्दीवेळी महाराष्ट्राच्या वाटचालीचा आढावा घ्यायला हवा आहे.’’ शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजारामबापू पाटील आणि डॉ. रफिक झकेरिया ही चारही माणसं उच्चविद्याविभूषित होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू अभ्यास करण्यासारखी आहेत. शरद पवार यांनी आपल्या भाषणात याचा छान आढावा घेतला आहे.
खरं तर या समारंभानिमित्त जमलेल्यांमध्ये चारही नेत्यांना जवळून पाहण्याचा तसेच त्यांच्याबरोबर राजकारण करण्याचा अनुभव शरद पवार यांच्या गाठीशी आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा शरद पवार वीस वर्षांचे होते आणि हे चारही नेते चाळीस वर्षांचे होते. याचा अर्थ सर्व जाणकार होते. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा नैतिक अधिकार शरद पवार यांचाच सर्वाधिक आहे. त्यांनी चारही नेत्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितलीच शिवाय त्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकांमुळे महाराष्ट्राच्या जडणघडणीत पडलेल्या मोलाच्या भरीचाही उल्लेख केला. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, श्रीपाद अृमत डांगे, आचार्य प्र.के.अत्रे, उत्तमराव पाटील, रामभाऊ म्हाळगी, बापूसाहेब काळदाते, वसंतराव नाईक, एस. एम. जोशी, आदी एकापेक्षा एक धारदार वक्तव्ये करणाऱ्या नेतेमंडळींनी महाराष्ट्राचे विधिमंडळ गाजविलेले आहे. अलीकडच्या काळातदेखील ही परंपरा चालविणारे काही नेते तयार झाले; पण एक गुणात्मक फरक आहे की, ही सर्व जुनी नेतेमंडळी शिक्षणाने भरीव कामगिरी करीत होती किंवा अनुभवाने तरी त्यांची उंची दीपस्तंभासारखी होती.
- शंकरराव चव्हाण
महाराष्ट्राच्या दोनवेळा मुख्यमंत्रिपदावर राहिलेले शंकरराव भाऊराव चव्हाण यांचे राजकारण नांदेडमधून सुरू झाले. १४ जुलै १९२० रोजी त्यांचा जन्म झाला. मराठवाडा हैदराबाद संस्थानमध्ये होता. त्याची मुक्तता १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाली. १९४८ ते १९५६ पर्यंत मराठवाडा हैदराबाद प्रांत विधानसभेच्या अंतर्गतच होता. मुंबई प्रांताची १९५६ मध्ये प्रथम फेररचना झाली आणि विदर्भासह मराठवाडा मुंबई प्रांतात समाविष्ट झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण काँग्रेसकडून निवडून आले. तेव्हापासून ते चार दशके विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा आदींवर प्रतिनिधित्व करीत होते. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. अनेक वर्षे ते राज्यात मंत्री होते. वसंतराव नाईक यांच्या सव्वा-अकरा वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडानंतर १९७५ मध्ये ते प्रथम मुख्यमंत्री झाले. १९८६मध्ये त्यांना पुन्हा नेतृत्व करण्यास संधी मिळाली.
कडक शिस्तीचे भोक्ते, असा त्यांचा लौकिक होता. परिणामी, त्यांना हेडमास्तर म्हटले जायचे. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच त्यांनी मंत्रालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामे करता यावीत, लोकांचा त्रास होऊ नये म्हणून दुपारी दोन वाजेपर्यंत कोणालाही आत न सोडण्याचा निर्णय घेतला होता. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून खर्च वाढविण्यास त्यांनी अटकाव केला होता. झिरो बजेटची संकल्पना त्यांनी राबविली होती. त्यांचा एक मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय वादळ निर्माण करून गेला होता. त्यांनी शेतीला आठमाहीच पाणी द्यावे असा आग्रह धरून बारमाही पाणी देऊन उसासारखे पीक वाढू देऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली होती. त्यावर प्रचंड गदारोळ माजला होता शिवाय काँग्रेसमधील साखर कारखानदार राजकीय लॉबीने त्यांच्याविरोधात मोहीम चालविली होती. जून १९८६ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर जून १९८८ मध्ये या लॉबीमुळेच पद सोडावे लागले होते. मात्र, त्यांनी भूमिका बदलली नाही. त्यानंतर त्यांना केंद्रात अर्थखात्याची जबाबदारी मिळाली. दोन वर्षे त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता. अनेक वर्षे ते राज्यसभेचे सदस्य राहिले. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पाच वर्षे गृहखात्याची जबाबदारी मिळाली. अयोध्याचे बाबरी मशीद प्रकरण त्यांच्या काळातच घडले होते.
शरद पवार यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. मात्र, मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांनी अडतीस वर्षीय शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण यांनी अर्थखात्याची जबाबदारी सांभाळली होती. शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणेच त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण दोनवेळा मुख्यमंत्रिपदावर राहिले आणि आता वडिलांप्रमाणेच कॅबिनेट मंत्री झाले आहेत. शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्याच्या प्रश्नांकडे नेहमीच अधिक लक्ष दिले. गोदावरी नदीवर पैठणला त्यांनी आग्रहाने जायकवाडी धरणाची उभारणी केली. नांदेड जिल्ह्यात विष्णूपुरी ही मोठी उपसा जलसिंचन योजना राबविली. जायकवाडी धरणासाठी शंकरराव चव्हाण यांचे मराठवाड्यात नेहमीच स्मरण केले जाते. त्यांचे राजकारण नांदेड जिल्ह्यात झाले असले तरी चव्हाण घराणे मूळचे पैठणचे आहे. तेथे आजही त्यांची शेतीवाडी आहे. पैठणकर यासाठी त्यांचे स्मरण करतात.
- यशवंतराव मोहिते
सातारा जिल्ह्यातील क-हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावच्या मोहिते कुटुंबीयातील अत्यंत बुद्धिमान तरुण यशवंतराव मोहिते ऊर्फ भाऊ यांनी शेतकरी कामगार पक्षातून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. १९५२ ते १९८४ पर्यंत बत्तीस वर्षे ते विधिमंडळ तसेच लोकसभेत सदस्य होते. त्यापैकी अठरा वर्षे राज्य मंत्रिमंडळात त्यांनी वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, आदींच्या बरोबर काम केले. १९५२ मध्ये प्रथम ते शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आले. तेव्हा त्यांनी कोयना नदीवर धरण बांधणीच्या मागणीचा ठराव विधानसभेत मांडला होता. ७ नोव्हेंबर १९२० रोजी जन्मलेले मोहिते भाऊ बी.ए. एलएल.बी. होते. त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले होते. प्रचंड वाचन, अभ्यास आणि उत्तम मांडणी करणारे वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. डाव्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर कायम होता. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि अखेरपर्यंत ते काँग्रेसमध्ये राहिले. सहकार मंत्री असताना त्यांनी सहकार कायद्याद्वारे या चळवळीला बळ प्राप्त करून दिले. रेठरे बुद्रुक येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची त्यांनी स्थापना केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेतृत्व पण संधी न मिळालेल्यामध्ये त्यांचा वरचा क्रमांक लागतो. १९७८ मध्ये त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या विरोधात या पदासाठी निवडणूक लढविली होती. वसंतदादा पाटील यांची बहुमताने निवड झाली. त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.त्यांना १९८० मध्ये लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली.
१९५२ ते १९८० पर्यंत अठ्ठावीस वर्षे विधिमंडळ सदस्य त्यापैकी अठरा वर्षे मंत्रिमंडळाचे सदस्य असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळात मात्र त्यांना स्थान मिळाले नाही. १९८४ नंतर त्यांनी राजकीय संन्यास घेऊन प्रबोधनाचे कार्य केले. त्याचवेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील अयोग्य निर्णयाविरुद्ध संघर्ष उभा केला. त्यासाठी रयत आघाडी स्थापन केली. तो लढा जिंकले आणि सहकाराच्या शुद्धिकरणासाठी त्यांनी दिलेला लढा कायम स्मरणात राहिला. सतत वाचन, चिंतन, लिखाण करीत आणि व्याख्यानेद्वारे लोकप्रबोधन करीत राहिले. त्यांचे चिरंजीव डॉ. इंद्रजित मोहिते आणि त्यांच्या पत्नी सविता मोहिते हे निष्णात डॉक्टर आहेत. त्यांनी भाऊंचा संघर्ष चालू ठेवला, पण त्यांना राजकीय संधी मिळाली नाही.
- राजारामबापू पाटील
सांगली जिल्ह्यातील राजकारण नेहमीच राज्याच्या नेतृत्वाला गवसणी घालणारे राहिले आहे. त्यात वाळवा तालुक्याचे सुपुत्र राजाराम अनंत पाटील यांचाही समावेश आहे. त्यांचा जन्म १९२० मध्ये १ आॅगस्ट रोजी झाला आहे. काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी राजकारण करताना सहकार आणि शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी केली. १९६२ पासून १९७८ पर्यंत विधानसभेचे सदस्य होते. या काळात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उत्तम काम केले. १९६५ मध्ये ते महसूलमंत्री होईपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात पूर्वाश्रमीच्या प्रांताचे महसुली कायदे लागू होते. राजारामबापू पाटील यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महसुली कायदा करून संयुक्त महाराष्ट्राचे आणखीन एक पाऊल टाकले. उद्योग, महसूल, नगरविकास, ग्रामीण विकास, आदी मंत्रिपदे त्यांनी भूषविली होती. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. दूध संघ, बँक, शिक्षण संस्था, आदी उत्तम चालविल्या. राजकीय कार्यकर्ते घडविले आणि त्यांना सातत्याने बळ देत राहणे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.
शेतीच्या पाण्यासाठी त्यांनी नेहमी आग्रह धरला. वारणा नदीवरील चांदोली धरणासाठी त्यांचा लढा महाराष्ट्राच्या सिंचन धोरणाला आव्हान देणारा होता. पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वभागातील दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळावे यासाठीही ते आग्रही होते. त्यांना दीर्घायुष्य मिळाले नाही. त्यांचा राजकीय वारसा जलसंपदामंत्री जयंत पाटील चालवित आहेत. त्यांनीही पाणी, शेती, शेतकरी यांच्यासाठी बापूंच्या विचाराने पुढे जात उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नऊवेळा मांडला. गृहमंत्री, ग्रामीण विकासमंत्री पदही भूषविले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेतृत्व असतानाही संधी न मिळालेल्यांमध्ये यशवंतराव मोहिते यांच्याप्रमाणेच राजारामबापू यांचेही नाव घ्यावे लागेल.
- डॉ. रफिक झकेरिया
जन्माने कोकणी मुस्लिम. नालासोपारामध्ये ५ एप्रिल १९२० रोजी जन्म. शिक्षण मुंबई आणि इंग्लंडमध्ये झाले. भारतीय मुस्लिम राजकीय विश्लेषण या विषयावर पीएच.डी.चा प्रबंध सादर करणारे विद्वान गृहस्थ डॉ. रफिक झकेरिया यांचे राजकीय जीवन मात्र औरंगाबादमध्ये घडले. १९६२ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून औरंगाबाद पश्चिममधून निवडून लढविली आणि प्रथमच आमदार होताच मंत्रीही झाले. राजकीय जीवनाबरोबरच उच्चशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. अनेक पुस्तके लिहिली. इंग्लंडमध्ये शिक्षण झालेले रफिक झकेरिया यांचा धर्मनिरपेक्षतेवर गाढा विश्वास होता आणि ते मुस्लिम धार्मिक परंपरांपासून दूर होते.
कट्टर नेहरूवादी विचारांचे डॉ. झकेरिया यांनी औरंगाबादमध्ये शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि उत्तम नावारूपास आणल्या. नगरविकासमंत्री असताना त्यांनी नव्या औद्योगिक औरंगाबाद शहराची रचना तयार केली. सिडकोला ती जबाबदारी सोपविली. सध्याचे विस्तारलेले, विकसित झालेले मराठवाड्यातील एकमेव शहर दिसते, ती डॉ. रफिक झकेरिया यांची देणं आहे. त्यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्नी फातिमा झकेरिया या संडे टाइम्स आॅफ इंडियाच्या संपादक होत्या. फरीद झकेरिया हे त्यांचे चिरंजीव अमेरिकेत पत्रकार म्हणून काम करतात.
अशा या चार मोठ्या नेत्यांचे जन्मशताब्दी वर्ष यावर्षी चालू आहे. त्यांचा काळ १९२० ते २००९ पर्यंत होता. शंकरराव चव्हाण यांचे निधन २००४ मध्ये, डॉ. रफिक झकेरिया यांचे २००५ मध्ये आणि यशवंतराव मोहिते यांचे २००९ मध्ये निधन झाले. राजारामबापू पाटील यांचे निधन १९८४ मध्ये झाले. त्यांना दुर्दैवाने दीर्घायुष्य लाभले नाही. महाराष्ट्र घडविणाºया या दीपस्तंभांना विनम्र अभिवादन!