पायात चाळ बांधून आणि साडी नेसून अंगविक्षेप, ही लावणी नव्हे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:35 AM2023-03-25T09:35:02+5:302023-03-25T09:35:33+5:30
पारंपरिक वाद्यांसह अदाकारीची नजाकत आणि नजरेचे सूचक इशारे हा लावणीचा आत्मा. अलीकडे मात्र लावणीच्या कनातीत घुसलेल्या ‘पॉर्न’मुळे साराच विरस होतोय.
- मेघा घाडगे
(ख्यातनाम लावणी कलाकार)
मराठी लोककलेचे मानाचे पान म्हणून लावणीकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांत लावणी सादरीकरणात आलेली बीभत्सता चिंतेचा आणि आत्मपरीक्षणाचा विषय आहे. स्वतःला लावणी कलावंत म्हणून घेताना लावणीचा पारंपरिक बाज आणि नटखट अंदाज राखण्याचे तारतम्य अलीकडे दिसत नाही. महिलांनाही आपलीशी वाटेल अशी ही लोककला पुरुषांच्या वासनेच्या शमनासाठी सादर होत असल्याचे चित्र समोर दिसत आहे. त्यामुळे लावणीच्या नावाने नृत्य अदा सादर करणाऱ्यांनी आधी लावणी समजून घ्यावी आणि मगच त्याचे सादरीकरण करावे.
वैविध्यपूर्ण संस्कार आणि संस्कृतीने समृद्ध असलेल्या भारतात नृत्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातही आपल्या तालावर समोरच्याला ठेका धरायला लावण्याचा मान महाराष्ट्रातील लावणीला आहे. बैठकीच्या लावणीसह साजशृंगाराच्या लावणीला पुरुषांसह महिलांचीही पोचपावती मिळाली. पुरुषप्रधान चौकटीत असणारी लावणी महिलांपर्यंत येण्यासाठी बराच मोठा कालावधी लोटावा लागला. अनेक ज्येष्ठ कलावंतांनी लावणीला मान मिळवून देण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून आयुष्य वेचलं. आताशी कुठं ही लावणी सर्वांसाठी खुली झाली असताना त्यात आलेले हिडीस नृत्य महिलांना या लोकधारेपासून दूर नेण्याचे काम करत आहे. पायात चाळ बांधून आणि साडी नेसून अंगविक्षेप करणं म्हणजे लावणी नव्हे! ठसकेबाज पारंपरिक लावणी डीजेच्या तालावर कशी काय सादर होते? पारंपरिक वाद्यांसह अदाकारीची नजाकत आणि नजरेचे सूचक इशारे हा लावणीचा आत्मा आहे. अलीकडे मात्र लावणीच्या कनातीत घुसलेल्या ‘पॉर्न कंटेंट’मुळे साराच विरस व्हायला लागला आहे.
महाराष्ट्राची लोककला असलेली लावणी तमाम मराठी माणसांची अस्मिता आहे. हजारोंच्या गर्दीपुढे या अस्मितेवर हिडीस नृत्याच्या माध्यमातून होणारा अत्याचार असह्य होतो. समृद्ध परंपरा लाभलेली ही लोककला कायमची लोप पावू द्यायची नसेल तर सजग प्रेक्षकांनीही भूमिका घेऊन लावणीच्या नावाखाली हे किळसवाणे प्रकार खपवून घेता कामा नयेत. विशेष म्हणजे ही अशी हिडीस नृत्ये लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमात सर्वाधिक होतात. निदान त्यांनी तरी संयोजनाबाबत अधिक जबाबदार असायला हवे.
ऑर्केस्ट्रासह कोणताही कार्यक्रम जाहीरपणे सादर करायचा असेल तर कार्यक्रमाच्या संहितेसह सादरीकरणातील छोट्या-मोठ्या गोष्टींविषयी पूर्वी शासनाला माहिती देणे बंधनकारक होते.
सादर केलेल्या माहितीच्या आधारे कार्यक्रमाला परवानगी देण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकारही शासनाला होते. गेल्या काही वर्षांमध्ये सादरीकरणासाठी असलेली ही परवानगीची पद्धत लुप्त झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही गलिच्छपणा येऊ लागला आहे. या कार्यक्रमांवर आळा बसवायचा असेल तर अशा जाहीर सादरीकरणासाठी सेन्सॉरशिप असणे आवश्यक आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन अनेक चळवळी यशस्वी केल्या आहेत. दारूबंदी ही त्यातीलच एक मोठी सामाजिक चळवळ. पुरुषांच्या दारूबंदीत अग्रक्रमावर असलेल्या महिला घरातल्या तरुण मुलांवरच्या सार्वजनिक संस्कारांबाबत इतक्या मागे कशा, असाही एक प्रश्न हल्ली मला सतावतो.
(मुलाखत, शब्दांकन : प्रगती पाटील, लोकमत, सातारा)