बेळगाव जिल्हा विभाजनातही भाषिकवाद!

By वसंत भोसले | Published: December 9, 2020 03:29 AM2020-12-09T03:29:57+5:302020-12-09T03:32:09+5:30

Belgaum district division News : कन्नड भाषिक चळवळीच्या नेत्यांच्या आभासी हट्टाला बाजूला ठेवून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्काेडी या नव्या जिल्ह्याची निर्मिती करायला हवी.

Linguisticism in Belgaum district division too! | बेळगाव जिल्हा विभाजनातही भाषिकवाद!

बेळगाव जिल्हा विभाजनातही भाषिकवाद!

googlenewsNext

- वसंत भोसले 
(संपादक,  लोकमत, कोल्हापूर) 

बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र-कर्नाटक वादात नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुपीक जमीन, भरपूर पाणी, उत्तम हवा, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेचे जाळे, उसाचे प्रचंड उत्पादन आणि शैक्षणिक संस्थांचे भले माेठे जाळे असलेला हा जिल्हा आहे. सुमारे २५ टक्के मराठी भाषिक आणि ६५ टक्के कन्नड भाषिकांचा हा जिल्हा क्षेत्रफळाने कर्नाटकात ३१ पैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील ६४० जिल्ह्यांमध्ये २५व्या स्थानावर आहे. जनगणनेच्या २०११ च्या आकडेवारीनुसार ४७ लाख ७९ हजार ६६१ लाेकसंख्या आणि क्षेत्रफळ १३ हजार ४१५ चाैरस किलाेमीटर आहे. 

कर्नाटक राज्याची स्थापना झाली (१९५६) तेव्हा २६ जिल्ह्यांचे राज्य हाेते. आता ३१ जिल्हे आहेत. १९९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे. एच. पटेल हाेते. त्यांनी चार नवे जिल्हे करण्याची घाेषणा केली.  त्यामध्ये बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून उत्तरेच्या भागाचा (महाराष्ट्राच्या सीमेवरील) चिक्काेडी हा नवा जिल्हा करण्याची घाेषणा करण्यात आली. त्याला गाेकाक भागातून प्रचंड विराेध करून नव्या जिल्ह्याचे मुख्यालय गाेकाक करण्याची मागणी करण्यात आली. अत्यंत हिंसक आंदाेलन करण्यात आले. त्याला कन्नड-मराठी भाषिक वादाचीही किनार हाेती. चिक्काेडी जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या माेठी असेल आणि बेळगावचेही तुलनेने प्रमाण अधिक दिसेल, असा अप्‌प्रचार करण्यात आला. चिक्काेडी शहराच्या पश्चिम भागात निपाणी हे मराठी भाषिकांचे माेठे शहर व्यापारी केंद्र ठरले असते. तसेच सीमेवरील सुमारे दीडशे गावे मराठी भाषेचे प्रभुत्व असलेली आहेत. 

वास्तविक नव्याने स्थापन हाेणाऱ्या चिक्काेडी जिल्ह्यात रायबाग, हुक्केरी, गाेकाक, अथणी आणि चिक्काेडी हे तालुके आले असते. यापैकी अथणीपासून सध्याचे बेळगाव जिल्हा केंद्र सरासरी दाेनशे किलाेमीटरवर आहे.  रायबाग दीडशे तर चिक्काेडी शंभर किलाेमीटरवर आहे. या तालुक्यातील जनता प्रशासकीय कामांव्यतिरिक्त इतर व्यवहार, व्यापार, वैद्यकीय सुविधा, खरेदी, आदींसाठी महाराष्ट्रातील काेल्हापूर, इचलकरंजी, सांगली आणि मिरज शहरांचा आधार घेतात. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा निम्म्याहून अधिक शेतमाल या कर्नाटकातील तालुक्यांतील असताे. सांगली आणि काेल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधांसाठी गरीब जनता येते. मराठी भाषिक विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी याच शहरात येतात.

नैसर्गिकदृष्ट्याही हा भाग महाराष्ट्राशी जाेडलेल्या कृष्णा खाेऱ्यातच येताे. सीमेवर अनेक सहकारी साखर कारखाने बहुराज्य आहेत. परिणामी कर्नाटकातून उसाची माेठ्या प्रमाणात आवक हाेते. महाराष्ट्रात तुलनेने उसाला चांगला भाव मिळताे. त्याचादेखील लाभ कर्नाटकाच्या शेतकऱ्यांना हाेतो. दूध पुरवठादेखील महाराष्ट्रातील दूध संघांनाच हाेताे. बेळगाव जिल्ह्याचा प्रचंड विस्तार पाहता विभाजन हाेणे आवश्यक आहे. केवळ मराठी भाषिकांचे प्रभुत्व वाढेल, अशा अभासी तयार केलेल्या वातावरणाने गेली २३ वर्षे झालेला विभाजनाचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे.

 चिक्काेडी येथे जिल्हा प्रशासनाची बहुतेक कार्यालये यापूर्वी स्थापन करण्यात आली आहेत. केवळ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद (कर्नाटकात ‘जिल्हा पंचायत’ म्हणतात) जिल्हा पाेलीस मुख्यालय स्थापन करणे बाकी राहिले आहे.  जिल्ह्यात विधानसभेचे अठरा मतदारसंघ आहेत, दाेन पूर्ण लाेकसभेचे मतदारसंघ आणि कारवार लाेकसभा मतदारसंघाशी दाेन विधानसभा मतदारसंघ जाेडलेले आहेत. ११३८ गावे, सतरा नगरपालिका, एक महापालिका, एकूण वीस शहरे आहेत. चाैदा तालुक्यांच्या या जिल्ह्याचे विभाजन अत्यंत गरजेचे आहे. चिक्काेडी शहराचा विकास हाेईल, निपाणी व्यापारपेठ विस्तारण्यास मदत हाेईल. 

कन्नड भाषिक चळवळीच्या नेत्यांच्या अभासी हट्टाला बाजूला ठेवून चिक्काेडी जिल्ह्याची निर्मिती करायला हवी. त्यामध्ये चिक्काेडी, रायबाग, हुक्केरी, अथणी आणि नव्याने स्थापन झालेल्या निपाणी व कागवाड तालुक्यांचा समावेश करावा, त्यातून कर्नाटकाचाच अधिक लाभ हाेणार आहे. शिवाय सरासरी दीडशे ते दाेनशे किलाेमीटरवर राहणाऱ्या जनतेला जिल्हा प्रशासनाची मदत घेणे साेयीचे ठरणार आहे. मराठी भाषिकांची भीती अनाठायी आहे.

Web Title: Linguisticism in Belgaum district division too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.