झुकोबाचे लिंकिंग...
By पवन देशपांडे | Published: January 19, 2018 03:24 AM2018-01-19T03:24:25+5:302018-01-19T03:24:43+5:30
काय चाल्लंय या जगात राव... माझ्या नावातला ‘ए’ गायब झालाय. काय राव एका ‘ए’ मुळे माझं अकाऊंटच बंद होण्याची भीती आहे.
काय चाल्लंय या जगात राव... माझ्या नावातला ‘ए’ गायब झालाय.
काय राव एका ‘ए’ मुळे माझं अकाऊंटच बंद होण्याची भीती आहे.
सकाळी दारावरचा पेपर काढताना शेजारच्या काकांनी मोठं आभाळ कोसळल्यागत चेहरा करून तक्रार नोंदवली.
आम्ही म्हटलं, काका आज गुड मॉर्निंग सोडून, हे भलतंच काय? तर म्हणाले, अहो आता काय काय बघावं लागणार या वयात काय माहीत.
पन्नाशीच्या पुढे पोहोचलेले काका एवढे वैतागलेले कधी पाहिले नव्हते. पेपर वाचायची उत्सुकता बाजूला ठेवून त्यांना खोलात जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला.
म्हटलं, काका, झालं तरी काय?
या एकाच प्रश्नावर त्यांची गाडी डायरेक्ट सरकारवर घसरली.
‘‘या सरकारला काही कळत नाय, कोणकोणत्या गोष्टी कुठं कुठं लिंक करायच्या तुम्हीच सांगा. हे इथं जोडलं नाही, तर तिथं ते मिळणार नाही आणि तिथं जोडलं नाही तर तुमचं इथं हे चालणार नाही.’’
त्यांचा वैताग सुरूच होता. म्हटलं आधारबद्दल बोलताय का तुम्ही? त्याची डेडलाईन वाढलीय आता, चिंता नका करू एवढी. त्यांना आपलं समजावण्याच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा पारा काही सध्याच्या थंडीसारखा उतरत नव्हता.
म्हणाले, अहो मोदी सरकारनं जिथं जिथं आधार लिंक करायला सांगितलं तिथं तिथं अगदी रांगेत उभं राहून मी ते केलं. बोटांचे ठसे जुळत नसतानाही पुन्हा पुन्हा करून घेतलं. पण, आता नवीनच टूम निघालीय. त्यामुळे गोची होणार.
अस्मादिकांचा चेहरा ‘नोटाबंदी का केली?’ या प्रश्नानंतर जसा झाला होता, तशा मुद्रेत आपोआप गेला. त्याच मुद्रेतून त्यांना विचारलं, अहो नेमकं झालं तरी काय? आधारवर सगळेच घसरताहेत, पण एवढं वैतागलेलं कोणाला पाहिलं नाही.
एवढ्या वैतागण्याच्या मूडमध्येही त्यांनी थेट सवाल केला? तुम्ही फेसबुकवर नाही का? आता तिथंही लिकिंग आलंय.
फेसबुकनं नवीनच प्रयोग सुरू केलेत. म्हणे, तुमचं नाव जसं आधार कार्डवर आहे तसंच फेसबुकवर हवं. माझ्या फेसबुकच्या नावात अन् आधारवरच्या नावात ‘ए’चा फरक आहे. नावात एक ‘ए’ एक्स्ट्रॉ असला तर फेसबुकचं काय बिघडतंय. हीच समस्या कोट्यवधी फेसबुकवासीयांची झालीयं. मोदींनी यावर काही करावं राव.. बसं झालं लिंकिंग आता... लिंक करता करता आम्हीच इथून डी-लिंक होऊ बहुदा.
पुन्हा नोटाबंदीवरून जीएसटीच्या मुद्रेत गेलो अन् कर कमी झाल्यावर जसं सर्वसामान्यांना काहीच फरक पडत नाही तशाच मूडमध्ये त्यांना म्हणालो, अहो काका ते नवीन लोकांसाठी आहे. तुम्ही झुकोबाचे ‘ओल्ड कस्टमर’ आहात. त्यामुळे तुम्हाला नाही तर नव्या लोकांना अकाऊंट ओपन करताना हे सारं करावं लागणारे.
आमचं हे म्हणणं काकांना पटलं, अन् त्यांनी काठावर पूर्ण बहुमत मिळाल्यासारखा सुस्कारा सोडला.
आम्ही मात्र, झुकोबा असे प्रयोग नेमके कुणासाठी करतोय, याच विचारात दिवसभर होतो...
- पवन देशपांडे