बायडेन यांच्या हाका, जन हो ऐका !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:46 AM2021-04-30T05:46:31+5:302021-04-30T05:50:02+5:30

एरवी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे भाषण म्हणजे नुसत्याच फुशारक्या आणि डरकाळ्या, बायडेन यांनी मात्र वेगळी वाट निवडली आहे.

Listen to Biden's call, Jan Ho! | बायडेन यांच्या हाका, जन हो ऐका !

बायडेन यांच्या हाका, जन हो ऐका !

Next

- नंदकिशोर पाटील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कारकिर्दीचे पहिले शंभर दिवस नुकतेच पूर्ण झाले. त्यांनी महासत्तेची सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक कृतीकडे संपूर्ण जग डोळ्यांत तेल घालून पाहात होते. बायडेन यांची निवडणुकीपूर्वीची आणि निवडून आल्यानंतरची देखील वक्तव्ये पाहिली तर ते लोकशाही मूल्यांचे कट्टर समर्थक आहेत याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. अमेरिकेत बुधवारी रात्री काँग्रेससमोर केलेल्या भाषणातही त्याचे प्रत्यंतर आले. 

बायडेन यांच्या शंभर दिवसातील कारभारावर अमेरिकेतील अनेक संस्थांनी विशेषतः माध्यमांनी केलेल्या जनमत चाचण्यांमध्ये बायडेन यांच्या प्रशासनाला सरासरी ५८ टक्के लोकांनी ‘उत्कृष्ट’ म्हटले आहे. विशेष म्हणजे, यात काही रिपब्लिकन समर्थकही होते.  कदाचित ट्रम्प यांच्या गुलछबू कारभाराच्या पार्श्वभूमीवर  लोकांच्या अपेक्षा बायडेन यांच्याकडून अधिक असाव्यात असे दिसते.  शंभर दिवसानिमित्त त्यांनी काँग्रेससमोर केलेले भाषण ज्यांनी ऐकले असेल त्यांना भलेही दिव्यत्वाचे दर्शन घडले नसेल, पण एक समंजस असे दर्शनिक नेतृत्व कसे असते, याची प्रचिती आली असेल. 

अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचा प्रमुख जेव्हा बेरोजगारी, शिक्षण,  आरोग्य, पेयजल, सामाजिक सदभाव, भेदाभेद अमंगळ, महिलांची सुरक्षा आणि तरूण पिढीच्या हातातील बंदुका या विषयांवर बोलू लागतो तेव्हा ऐकणाऱ्यांचा क्षणभर आपल्या कानावर विश्वासच बसत नाही. बसणार तरी कसा? कारण आजवर अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांचे भाषण नुसत्याच फुशारक्या आणि डरकाळ्यांनी ओतप्रोत भरलेले असायचे. जगाची पाटीलकी आपल्याच खांद्यावर असल्याचा आविर्भाव असायचा. (आठवा ट्रम्प किंवा बुश यांची भाषणे) पण बायडेन यांनी काल समर्थकांची आणि विरोधकांची ही मने जिंकली ! 
   

गेली दोन वर्ष कोरोनामुळे अर्थचक्र थांबले आहे. अमेरिकाही त्यास अपवाद नाही. कोविडमुळे अनेकांचे रोजगार बुडाले, देशोधडीला लागले. ट्रम्प यांच्या धोरण धरसोड  वृत्तीमुळे आरंभ काळात अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. सुमारे दोन लाख नागरिक मृत्यू पावले. बायडेन यांनी सुत्रे हाती घेताच लसीसाठी सुमारे साठ लाख  डॉलर्सचा निधी दिला. शिवाय, सुमारे दोन कोटी डोसची आगावू मागणी नोंदवून  ठेवली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. अमेरिकेत जवळपास ३० टक्के (वय ६० च्या वर तर ऐंशी टक्के) नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आता सोळा वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठीचा रोडमॅप तयार आहे. कुठेही गोंधळ नाही की गडबड.

लस हेच कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी शस्त्र आहे, हे बायडेन यांनी वेळीच ओळखून तशी पावले टाकली. आता त्यांचे पुढचे लक्ष्य आहे रोजगार निर्मिती. त्यासाठी त्यांनी आखलेल्या प्लॅन नुसार येत्या काळात पायाभूत सुविधा उदा. रस्ते, धरणे, इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येईल. तसेच लघु उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल. शिवाय, ‘मेड इन अमेरिका’ आणि ‘बाय अमेरिका’ हे धोरण राबविण्यात येणार आहे. बायडेन यांच्या भाषणात त्यांचे जागतिक धोरण कसे असेल याचे ही सुतोवाच होते. विशेषतः चीन आणि रशियाच्या बाबतीत ते अजिबात मवाळ धोरण स्वीकारण्याची शक्यता दिसत नाही. चीनसोबत स्पर्धा जरूर करू पण अमेरिकेच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही, हे त्यांनी ठासून सांगितले. 

बायडेन यांच्या इतर दोन निर्णयाबाबत मात्र मतमतांतरे आहेत. एक म्हणजे, अफगाणिस्तानातून सैन्य माघारी आणि दुसरे पर्यावरण धोरण. बायडन यांच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही विषयांवर अमेरिकेन नागरिकांचे ध्रुवीकरण केले आहे. क्लायमेट चेंजची थट्टा उडविताना पॅरिस कराराचा कसा अमेरिकेलाच फटका बसतो हे त्यांनी जनतेच्या मनावर चांगलेच बिंबविले आहे. तर ९/११ च्या हल्ल्याने अस्मिता जागृत झालेले अमेरिकन अफगाणिस्तानला अजूनही माफ करण्याच्या मूडमध्ये नाहीत. ओसामा बिन लादेन अफगाणीच होता अशीच त्यांची अजून धारणा आहे.

बायडेन यांच्यासमोर आणखी एक समस्या ती म्हणजे, वांशिक दंगली. पोलिसी अत्याचाराचा बळी ठरलेल्या जाॅर्ज फ्लाॅईडच्या मृत्यूनंतर आफ्रिकन वंशीय नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अमेरिकेत काळे आणि  गोरे वादाची मुळे  घट्ट रूतली आहेत. बायडेन यांनी यावर सर्वानुमते तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. समता, बंधुता आणि  एकता या लोकशाही मूल्यांची जपणूक आपण केली नाही तर जगातून लोकशाहीच हद्दपार होईल आणि त्यास  आपण अमेरिकन जबाबदार असू, असे खडे बोल  बायडेन यांनी आपल्या देशवासीयांना सुनावले, हेही महत्त्वाचे !

 

Web Title: Listen to Biden's call, Jan Ho!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.