साहित्य अनुभूती-अभिव्यक्ती
By admin | Published: October 13, 2016 01:23 AM2016-10-13T01:23:52+5:302016-10-13T01:23:52+5:30
प्रत्येकाच्या वेगळ्या शैलीतून समाजचित्र उभे राहात आहे. लेखनात लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा उमटलेला ठसा म्हणजे शैली होय
प्रत्येकाच्या वेगळ्या शैलीतून समाजचित्र उभे राहात आहे. लेखनात लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा उमटलेला ठसा म्हणजे शैली होय. आपल्याला उपलब्ध असणाऱ्या गोष्टींनी आपला साहित्यवृक्ष सर्वांगाने फुलायला हवा. बहरायला हवा.
आपली मूळं दूरवर पसरवून जीवनरस मिळवणाऱ्या वृक्षासारखी साहित्यिकांची जीवनदृष्टी असायला हवी. अनुभवाची कलात्मक मांडणी करताना मात्र सत्याच्या विश्वापासून दूर जायला नको. कलेचे विश्व वेगळे आणि सत्याचे विश्व वेगळे असे होत नाही. कलेच्या विश्वाला सत्याच्या विश्वात नेऊन सत्यालाच कलात्मक रितीने मांडणे हीच खरी कल्पकता होय. वाङ्मयीन सत्य हेच अनुभवसत्य असायला हवे. तटस्थ चिंतन, सौंदर्यात्मक कल्पकता, आकृतीनिर्मिती, नवनिर्मिती, प्रतिभा आणि सर्जन हे वाङ्मय निर्मितीचे विविध पैलू आहेत. हे पैलू शब्दाशब्दातून व्यक्त व्हायला हवेत.
प्रसिद्ध विचारवंत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी म्हटले होते की, ‘अभिजित साहित्यिकांच्या एकमुखी आधारावर कलात्मक जीवनभाष्य हेच अमर साहित्याचे लक्षण होय. जीवनावर भाष्य करण्यापूर्वी जीवनाचे यथार्थ आकलन झाले पाहिजे. त्यासाठी जीवनानुभवाच्या कक्षा विस्तीर्ण व्हायला हव्यात’.
जीवन आणि साहित्य याचा निकटचा संबंध आहे, असे साने गुरुजी वारंवार सांगत. ते म्हणत, ‘जीवनातल्या अप्रगट शक्ती वाङ्मयात निर्माण होतात आणि वाङ्मयात वावरणाऱ्या वृत्ती जीवनात उमटतात. म्हणूनच आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटके, बोलपट हे सारे जीवनाच्या ध्येयाला प्रत्यक्षात उमटविण्यासाठी आहेत.
आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य लाभले आहे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुक्तता किती घ्यायची हे आविष्कारभान लेखकाने ठेवायला हवे. इथे अनेक धर्म, पंथ, संप्रदाय, परंपरा आहेत. आपल्या अविष्कार मुक्ततेने कुणाच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या जाऊ नयेत.
वास्तववादाच्या नावाने पुन्हा नवे वाद निर्माण होऊ नयेत. कारण कोणत्याही वादाने वाद निर्माण करणारी मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी समाजऐक्य भंग करीत आहेत. हे वास्तव आहे. समाजात वावरताना आपल्या शब्दाने, लेखणीने कुणी तोडला जाणार नाही याची फार मोठी जबाबदारी साहित्यिकांवर अप्रत्यक्षात येत असते.
खरे तर आपली लेखणी तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी आहे, याचे भान राखणे हाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ असू शकेल.
-डॉ. रामचंद्र देखणे