साहित्य नाैकेचे सुकाणू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 09:16 AM2023-02-06T09:16:01+5:302023-02-06T09:20:40+5:30

दरवर्षी होणारे मराठी भाषेचे हे संमेलन कोणती ना कोणती उणी-दुणी काढून गाजत असते. किंबहुना त्याशिवाय संमेलन झाल्याचा आनंदच जणू मिळत नाही. संमेलनाला आता उत्सवी स्वरूप आले आहे म्हणून अनेक प्रथितयश लेखक तिकडे फिरकत नाहीत. राजकीय नेत्यांनी साहित्यिकांच्या या नौकेचा ताबा घेतला आहे म्हणूनही नाके मुरडणारे खूपजण आहेत.

literature The helm of a boat | साहित्य नाैकेचे सुकाणू

साहित्य नाैकेचे सुकाणू

googlenewsNext

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे साहित्य नौकेचे सुकाणूच आहेत, असे वर्णन विद्यमान संमेलनाध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्याविषयी लिहिलेल्या लेखात एका प्रथितयश लेखकाने म्हटले आहे. मराठी साहित्य संमेलन आता शंभरीजवळ पोहोचत आहे. त्यासाठी कृतिशील आणि नवा विचार मांडणारी नौका घेऊन जाणारे सुकाणू आवश्यक असले पाहिजे. ही अपेक्षा झाली. त्याप्रमाणे हाेत नाही, असे चित्र दिसते. मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली तेव्हाच बंडाचा झेंडा महात्मा जोतिराव फुले यांनी फडकावला होता. तो विविध स्वरूपात आणि रंगात आजदेखील फडकविला जातो. परिणामी, अशा मराठी साहित्य संमेलनाची गरज उरली आहे का, या टोकापर्यंत चर्चा होत राहिली आहे.

दरवर्षी होणारे मराठी भाषेचे हे संमेलन कोणती ना कोणती उणी-दुणी काढून गाजत असते. किंबहुना त्याशिवाय संमेलन झाल्याचा आनंदच जणू मिळत नाही. संमेलनाला आता उत्सवी स्वरूप आले आहे म्हणून अनेक प्रथितयश लेखक तिकडे फिरकत नाहीत. राजकीय नेत्यांनी साहित्यिकांच्या या नौकेचा ताबा घेतला आहे म्हणूनही नाके मुरडणारे खूपजण आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शी नाही, यावरूनदेखील वादविवाद होतात. अलीकडे मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षाची निवडणूक होऊ न देता निवडण्याची पद्धत सुरू केलेली दिसते. एकंदरीत मराठी भाषेच्या इतिहासात एक महत्त्वाचे पाऊल ठरलेली मराठी साहित्य संमेलनाची परंपरा नीट चालविली जात नाही. ती नौका कोठेतरी डळमळते असे वाटते. मराठी वाचक हतबलपणे या नौकेच्या प्रवासाकडे निराशपणे पाहतो आहे. मात्र, त्याला या सर्व प्रवासात कोणतेही स्थान नाही. वाचकाने आता संमेलनाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे.

संमेलनाचा उद्घाटन समारंभ वाजतगाजत केला जातो आणि समारोपाचा कार्यक्रम थोड्या गर्दीने होतो, बाकी सारी बोंबच आहे. संमेलनात अनेक महनीय वक्त्यांचा सहभाग असलेले परिसंवाद आयोजित केले जातात. त्यांना श्रोतेच नसतात. एरवी छोट्या-छोट्या तालुक्याच्या ठिकाणी याच वक्त्यांची व्याख्याने ऐकायला शे-पाचशे श्रोते जमतात. मात्र, एकाच व्यासपीठावर परिसंवादासाठी मराठी साहित्याचे चार-पाच प्रमुख वक्ते असूनही श्रोते येत नाहीत. मराठी साहित्याचे हे अपयश मानायचे का? संमेलन आयोजकांचे हे अपयश की, मराठी साहित्य महामंडळाची दिवाळखोरी? वास्तविक संमेलनाची सुरुवात झाली तेव्हा महात्मा फुले यांनी उपस्थित केलेला मुद्दा बाजूला ठेवूनही बदलत्या समाजाबरोबर माणसाची सांस्कृतिक भूक आणि साहित्यात समाजमनाचे उमटणारे प्रतिबिंब आदींचा विचार करायला तसे साहित्य तरी निर्माण व्हायला हवे ना? परिसंवाद किंवा व्याख्यानाकडे श्रोते येत नाहीत याचा अर्थ मराठी लेखकांकडे नवे काही सांगण्यासारखेच नाही, असा अर्थ काढायचा का? हा आरोप किंवा आक्षेप नाही, मराठी साहित्य, चित्रपट, नाटक, गद्य-पद्य लिखाण आदींचा प्रवास त्या दिशेने निघाला आहे. त्यात नवी काय भर पडते आहे? मराठी साहित्य संवर्धनासाठी तसेच भाषेचा माणसाच्या जगण्यावर कोणता संस्कार होतो, त्याची उपयुक्तता काय, आदी महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा कोणी करायची? यासाठीच मराठी साहित्य महामंडळाला डावलून अनेक नवे प्रवाह मराठी भाषेसाठी संघटित होऊन काही प्रयोग करताहेत.

त्यापैकी विद्रोही साहित्य हा एक प्रवाह आहे. विद्रोह करणे किंवा प्रवाहाविरुद्ध पोहणे काय अन् नौका चालवणे काय, त्याला सुकाणू धरणारा धीरगंभीर मनाचा धीराेदात्त माणूस लागतो. अलीकडे याच साहित्य संमेलनाच्या नगरीत विद्रोही साहित्य संमेलन भरविण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत आहेत. त्याची हेटाळणी करण्यात आली. पण विद्यमान संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी विद्रोही साहित्याच्या नौकेत जाऊन त्यांच्या प्रवाहाची नाेंद घेतली, ही चांगली अन्‌  स्वागतार्ह घटना आहे. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उपयुक्तता कायम राहावी असे वाटत असेल तर सर्वांनीच बदलले पाहिजे. मराठी भाषेचा इतिहास ते वर्तमान तसेच भविष्य याची नाेंद रंजकपणे घेत श्राेत्यांचा सहभाग कसा वाढेल, मराठी भाषा अधिक समृद्ध कशी होईल, याचा विचार करावा. त्यासाठी सुकाणू बदलून पाहण्यास हरकत नाही.

Web Title: literature The helm of a boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.